एलियन्स


-सौ.स्वरूपा कुलकर्णी



आपल्या भोवताली असलेल्या संपूर्ण विश्वात किंवा ब्रह्मांडामध्ये पृथ्वीशिवाय इतरही कुठं जीवन आहे का? असेल तर कसं असेल? हे प्रश्न आतापर्यंत शास्त्रज्ञांसाठी अत्यंत गंभीर ठरले आहेत.

1960 च्या दशकात तरुण वैज्ञानिक फ्रैंक ड्रेक यांनी म्हटलं की, एका सूर्यमालेतून दुसऱ्या सूर्यमालेत संदेश पाठवण्यासाठी महायुद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या रेडिओ तंत्राचा वापर करता येऊ शकतो. एलियन्सही तसं करत असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना शोधण्यासाठी आपल्याला केवळ त्यांचं सिग्नल शोधायचं आहे.


सेथ शोस्टॅक सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटलिजन्स (सेटी) मध्ये ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आहेत. गेल्या चार दशकांपासून ते एलियन्सचे असेच सिग्नल ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत.


"फ्रँक यांनी वेस्ट व्हर्जिनियाच्या वेधशाळेत सध्या असलेल्या अँटिनाची दिशा जवळच्या तारांकडे केली. एलियन्स सिग्नल पाठवत असतील तर ते त्यांना कॅच करू शकतात, असा त्यांचा प्रयत्न होता. ते दोन तारांवर लक्ष ठेवून होते. मजेशीर बाब म्हणजे, एका तारेतून त्यांना काहीही संदेश किंवा सिग्नल मिळाले नाहीत. मात्र दुसऱ्या तारेतून त्यांना काही आवाज ऐकायला आले. त्यामुळं त्यांनी एलियन्सला शोधलं आहे, असं त्यांना वाटलं. मात्र ते लष्कराचं एखादं विमान असण्याचीही शक्यता होती," असं ते म्हणाले.


काही काळातच जगभरातील शास्त्रज्ञ एलियन्सचा शोध घेऊ लागले होते. 1980 च्या दशकात अमेरिकेच्या सरकारनं एलियन्सच्या शोधासाठी सेटी इन्स्टिट्यूटला आर्थिक मदत देणं सुरू केलं.

रेडिओ तरंग अंतराळात सहजपणे जाऊ शकतात आणि सेथ यांना रेडिओ रिसिव्हरवर जे आवाज ऐकायचे होते, ते सामान्य आवाजांपेक्षा वेगळे होते. सेथ यांनी सिम्यूलेशनद्वारे एक असा आवाज तयार केला जो ऐकायला एखाद्या एलियन सिग्नलसारखा वाटेल. ते काय शोधत आहेत हे समजण्यासाठी त्यांनी तसं केलं.


"ते ऐकल्यावर कोणीतरी नायगरा फॉल्सजवळ उभं राहून बासरी वाजवत असावं असं वाटतं. रिसिव्हरवर नायगरा फॉल्सचा आवाज अंतराळाच्या रिकामेपणाच्या आवाजासारखा असेल, मात्र ते एखाद्या गाण्याच्या चालीसारखं नव्हे तर, आवाजासारखं ऐकू येईल," असं ते म्हणाले.


सेथ आणि त्यांच्या टीमला ते काय शोधत आहेत? हे माहिती होतं. पण त्यासाठी त्यांना लाखो रेडिओ फ्रिक्वेन्सीचा अभ्यास करावा लागणार होता. त्यापैकी आधी काय पाहायचा हे त्यांना कसं समजणार?


"ही मोठी समस्या होती. एलियन्सनं मला कोणत्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून करायचं हा संदेश पाठवला नाही. त्यामुळं मला प्रत्येक फ्रिक्वन्सी चेक करावी लागणार होती. पण तसं करणं म्हणजे वेळ वाया घालवणं होतं. आम्हाला सगळे चॅनल एकाचवेळी ऐकता येतील, असे रिसिव्हर हवे."

1990 पर्यंत हेदेखील शक्य झालं आणि एकाचवेळी लाखो फ्रिक्वेन्सी ऐकता येतील अशा कंप्युटर्सची निर्मिती झाली.


ओहायो युनिव्हर्सिटीच्या एका खगोल तज्ज्ञांनी जेव्हा रेडिओ टेलिस्कोपचा डेटा पाहिला तेव्हा त्यांना अत्यंत जास्त तीव्रता असलेले आणि फ्रिक्वेन्सीचे सिग्नल आढळले. त्यांना वाटलं हे एलियन्सचेच सिग्नल आहेत.


"ते अत्यंत आनंदी होतं. त्यांनी डेटाजवळ 'वाओ' असं लिहिलं. पण त्यांना नेमकं काय मिळालं, ते आम्हाला माहिती नाही. आकाशाच्या त्याच भागात इतर अनेक लोकांनी शोध घेतला. पण त्यांना असं काहीही मिळालं नाही. अशा परस्थितीत दोन शक्यता होत्या. एक तर ते एलियन्स होते किंवा पृथ्वीवरचाच कशाचा तरी तो आवाज होता," असं सेथ म्हणाले.


अनेक लोकांसाठी हे एलियन्सच्या सिग्नलचं उत्तम उदाहरण होतं. पण प्रत्यक्षात अनेक वर्षांच्या शोधानंतरही एलियन्सबाबत काही ठोस माहिती मिळालेली नाही.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न