जादूचा चष्मा


सौ.स्वरूपा कुलकर्णी


      श्रीरामपूर नावाचं एक गाव होतं.त्या गावात एक तुकाराम नावाचा शेतकरी राहायचा.त्याला २ मुले व पत्नी असे कुटूंबं होतं.तो अतिशय मेहनती व कष्टाळू शेतकरी म्हणून गावात प्रसिद्ध होता.त्याची गावाबाहेर ५ एकर शेती होती.तो दिवसभर मेहनत करून नांगरणी,खूरपणी, बी पेरणी अशी कष्टाची कामे  करत असे.

      एक दिवस नांगरणी करत असतांना त्याच्या नांगराच्या फाळाला एक कठिण वस्तू लागली.तुकाराम आश्चर्यचकित झाला.


मनात म्हणाला ,' अरेच्चा,एव्हड्या दिवसांत तर कधी माझा नांगर कधिही थांबला नाही.आज इथेच का रूतला?'


त्याने नांगर जेथे रूतला तेथे खूप वेळ कुदळ मारून जागा उकरली.त्याला तिथे एक जुनी बंद पेटी सापडली.तुकारामचे डोळे चमकले.


'अरे , पुर्वजांचे काही गुप्तधन तर यात नाही?'


 त्याने उत्सुकतेने पेटी उघडली.पण 'हाय रे दैव' त्याचा भ्रमनिरास झाला.कारण त्या पेटीत एक जुना चष्मा होता.त्या वाईट वाटले.नशीबाला दोष देत त्याने तो चष्मा आपल्या कनवटीला बांधला व पुढिल कामाला लागला.थोड्या वेळाने त्याचा मुलगा सुरज तेथे आला.त्याने तुकारामसाठी जेवणाचा डबा आणला होता.


तो म्हणाला,' बाबा, जेवण करून घ्या.मी शेताकडे लक्ष देतो.' 


तुकाराम बराच थकला होता.जेवण करून तो झाडाखाली विश्राम करू लागला.इकडे सुरज शेताकडे निट लक्ष देऊन होता.थोड्यावेळाने तुकाराम जागा झाला.त्याने त्या पेटीतील चष्म्याकडे नजर टाकली व हळूच तो चष्मा डोळ्यावर चढवला..त्याला समोर सुरज दिसत होता.आणि क्षणार्धात त्याच्यादिशेने एक साप वळवळत येतांना त्याला दिसला.त्याने घाबरून चष्मा काढला पहातो तर सुरज कोणत्याही संकटात नव्हता.मग तुकारामला वाटलं कदाचित हा पुढिल संकेत तर देत नसेल.म्हणून त्याने सुरजला जवळ बोलावले व स्वतः राखण बसला.आणि थोड्याच वेळात एक काळाकुट्ट सर्प त्याच्या दिशेने येतांना त्याने पाहिला.तुकारामने सापाला मारून फेकून दिले.सुरज आज खूप मोठ्या संकटातून वाचला होता.तुकारामने देवाचे आभार मानले.नंतर तुकारामने सुरजला जवळ बोलावले व चष्म्याची हकिकत सांगितली.


सुरज म्हणाला,' बाबा, मला तर वाटतंय हा जादूचा चष्मा आहे जे भविष्यकाळ जाणू शकतो'..

ते दोघेही आश्चर्याने चष्म्याकडे पाहून विचार करू लागले.

त्या दिवसापासून तुकाराम मेहनत कमी व श्रीमंत होण्याची स्वप्ने रंगवू लागला.

त्याला एक दिवस रस्त्याने जातांना एक संशयित इसम दिसला.तुकारामने झटकन डोळ्यावर जादूचा चष्मा चढवला.त्याला दिसले की तो चोर मोठी सोन्याची मूर्ती घेऊन सोनाराकडे चालला आहे.तुकारामने रस्त्यातच चोराला पकडले व त्याला फटके मारून ती वस्तू त्याच्याकडून घेतली.पण तो पुढे जात असतांनाच राजाच्या शिपायांनी तुकारामला पकडले.


तुकाराम गयावया करू लागला.

' अहो मला सोडा मी नाही चोरी केली' .

त्यावर शिपायांनी काहीच न बोलता त्याची रवानगी राजासमोर केली..


राजा म्हणाला,'सांग ही मुर्ती तुझ्याकडे कशी आली?'


तुकाराम म्हणाला,'महाराज,मी चोर नाही.ही सगळी करामत या चष्म्याची आहे.' 



मग त्याने सविस्तर सगळी हकिकत सांगितली.


राजा म्हणाला,' अरे तुला त्या चष्म्यामुळे लोभ उत्पन्न झाला हीच तुझी चूक.तूला याची शिक्षा मिळणारच'.



मग राजाने तुकारामला २५ फटक्यांची शिक्षा सुनावली.

आता त्या दिवसापासून तुकाराम मेहनत करूनच पोट भरतोय.त्याने तो चष्मा राजाला देऊन टाकलाय.

तात्पर्य- मनुष्याला लोभ उत्पन्न झाला की त्याची हानी होतेच.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न