सण

सौ. स्वरूपा कुलकर्णी


भारतात कोणताही सण मग तो दिवाळी असो की दसरा, मकर संक्रांत असो की होळी तसेच ईद असो की ख्रिसमस सगळ्या सणांचा उद्देश हा परस्परांतील सौहार्द, प्रेम, आपुलकी वाढावी हा असतो.या सणांमुळे समाजात एकोपा निर्माण होण्यासाठी खूप मदत होते.मानवी मन हे मुळातच उत्सवप्रिय असतं त्यामुळे असे सण उत्सव समाजात आनंद,उत्साह आणतात.त्यातुन नवनवीन कलांना प्रोत्साहन मिळते.ईश्वराप्रती आदरभाव वाढीस लागतो.

       सण ही संकल्पनाच मुळात घरातील,गावातील व पर्यायाने राष्ट्रातील संस्कृती संवर्धनासाठी उपयोगाची ठरतात.सणवारातील रूढी व परंपरा नात्यातील गोडवा अखंडपणे जोडून ठेवतात.

    हिंदूंच्या काही प्रमुख सणांची माहीती घेऊया.हिंदू संस्कृतीत गुढीपाडवा हा नविन वर्षाचा पहिला सण असतो.त्यादिवशी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. त्यामागे पुराणातील कथा प्रसिद्ध आहेत.प्रभू श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले तो दिवस गुढिपाडव्याचा दिवस मानला जातो.वर्षभरात हिंदूंमध्ये अनेक सण उत्सव साजरे होतात.दसरा हा सण प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला म्हणून साजरा केला जातो.या दिवशी आपट्याची पाने सोन्याची पाने म्हणून वाटली जातात.दिवाळी हा सण तर अनेक सणांचा समुदाय आहे.वसुबारस- गायी-वासराप्रती कृतज्ञभाव जपण्याचा दिवस, धनत्रयोदशी- धन्वंतरी यांची पूजा करण्याचा दिवस,नरकचतुर्दशी- वाईटावर चांगल्याचा विजय , लक्ष्मीपुजन- माता लक्ष्मी ही संपूर्ण जगाची स्वामिनी असल्याने तिची पुजा व रोषणाई करण्याचा दिवस, बलिप्रतिपदा- वडिलांना व पतीला ओवाळण्याचा दिवस ,भाऊबीज- हा बहिण भाऊ नात्याला घट्ट करणारा दिवस !अशाप्रकारे दिवाळी सारखा सण अनेक नात्यांवर प्रकाश टाकतो व ती अधिक दृढ करतो.या दिवसात खूप दिवे लावतात. त्याचा काळोखावर प्रकाशाचा विजय असा होतो.तसेच दिवा हे ज्ञानाचे प्रतिक मानले जाते.अनेक खाद्यपदार्थांची रेलचेल असते.नविन कपडे, फटाके घेतले जातात. पौषात मकर संक्रांत हा सण सगळे रागलोभ सोडून नात्यातील गोडवा वाढावा यासाठी 'तिळगुळ घ्या ,गोड बोला'असं सांगत तिळगुळ खाण्याचा असतो.पतंग उडवण्याचाही असतो. त्यानंतर होळीसारख्या सणात होलिकादहन केले जाते.दुष्ट शक्तींवर दैवी शक्तीचा विजय साजरा होतो.पुरणाची पोळी केली जाते.रंगपंचमीला रंग उडवले जातात.अशाप्रकारे सर्व सणवार वर्षभर आनंद,उत्साह ठेऊन आपले मन प्रसन्न ठेवतात.त्यामुळे घराची,गावाची स्वच्छता, साफसफाई केली जाते.मुलेबाळे आनंदी रहातात.स्त्रीया माहेरी जातात.धंदे तेजीत येतात.म्हणूनच सण साजरे करणे ही मानवी संकल्पना ईश्वर-मानव एकतेची गुढी  उभारते.त्यातून मनुष्याचा सर्वांगिण विकास साधतो.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न