एक पैशाची कथा


सौ.स्वरूपा कुलकर्णी


    मध्यरात्र उलटून गेली.गडाचे दरवाजे बंद झाले.किल्लेदार जनार्दस्वामी गडाच्या टेहळणीसाठी गडावर पहाणी करू लागले.त्यांना सर्वत्र सामसूम अढळली.फक्त एका खोलीत मिणमिण प्रकाश दिसला.स्वामी तिकडे वळले.ते तिथे येताच..

    

    " सापडली, चूक सापडली" स्वामींचा शिष्य आनंदात नाचू लागला.

     स्वामी खोलीत आले.तो वरमला.आपले गुरूजी समोर पाहून शांत झाला.


   स्वामी म्हणाले," बाळा, एव्हड्या मध्यरात्री हिशेबाची चोपडी घेऊन तू काय करतोयस?"


 बाळ म्हणाला,"महाराज,तुम्हीच शिकवलंय चूक सापडेपर्यंत प्रयत्न करायचा. ही चूक सापडत नव्हती म्हणून अस्वस्थ होतो.हिशेबात एक पैशाची चूक राहीली होती.ती सापडली.म्हणून जागा होतो."


       जनार्दनस्वामींनी शिष्याला पोटाशी कवटाळले.त्या पोरसवदा लेकराला आशिर्वाद देत म्हणाले," नाथा, धन्य तुझी कामातील प्रामाणिकपणा व गुरूनिष्ठा...एक दिवस तू खूप मोठा होशिल व गुरूंचही नाव मोठं करशील".

   

 मंडळी, ते पोरसवदा लेकरू म्हणजेच संतश्रेष्ठ एकनाथ महाराज!..नाथांनी लहान वयातच मिळवलेली गुरूकृपा त्यांना थोर अधिकारी पदावर घेऊन गेली.धन्य ते गुरूशिष्य!!


तात्पर्य- एक पैशाची चूक सापडत नव्हती म्हणून तळमळणारे शिष्य ही खऱ्या गुरूनिष्ठेची प्रचिती आहे.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न