खेळ



सौ.स्वरूपा कुलकर्णी


सूर पारंब्या, आट्या-पाट्या, गोट्या, सागरगोट्या, लगोरी, मंगळागौरीचे खेळ, झब्बू, बदाम सात, कबड्डी, खो-खो, विटी-दांडू, गलोल, भातुकली – एक एक आठवायला बसलं की असे कितीतरी खेळ आठवतात. काही खेळ साधे, रंजन करणारे, तर काही स्पर्धात्मक , चढा-ओढीचे, जिंकण्याची इर्षा निर्माण करणारे. या प्रत्येक खेळाबरोबर महाराष्ट्राचा, मराठी माणसाच्या संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे. हे खेळ जिथे खेळले जायचे तिथल्या समाजाचा, परिसराचा इतिहास त्या त्या खेळात आपण पाहू शकतो.


हे खेळ त्या त्या गावच्या संस्कृतीचे आणि तिथल्या रूढी-परंपरांचे प्रतिकं आहेत. सूर पारंब्या जिथे वडाची झाडे होती तिथे खेळला जात होता, गोट्या तर मुले घरोघरी खेळत होती. अख्ख्या महाराष्ट्रात मंगळागौरीचे खेळ बायका श्रावण महिन्यात खेळत असत. पूर्वीच्या काळी जेव्हा बायकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी नसे तेव्हा हे खेळ खेळणं बायकांनी एकत्र येण्यामागचं निमित्त होतं. अख्खी रात्र खेळ खेळण्यात जागवली जायची. काही खेळ तर प्राण्यांशी संबधित आहेत. जसे सांगली जिल्ह्यातील समडोली गावात कबूतर पालन हा एक पारंपारिक खेळ आहे. भातुकलीचा खेळ तर प्रत्येक लहान मुलांना येणार्‍या प्रौढ वयातल्या जबाबदार्‍यांची तयारीच करून घेत असे१ . असे अनेक खेळ महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावात प्रचलित असतील पण आपल्याला त्याबद्दल काहीच माहिती नाही.


आज हे सर्व खेळ आपण विसरलो आहोत. अशा प्रकारचे अगदी महाराष्ट्रातल्या भूमीतले काही खेळ होते हे आज सांगितले तर अनेकांना आश्चर्यच वाटेल. हे खेळ नेमके कुठले, पहिल्यांदा कधी खेळले गेले? आज कुठे खेळले जातात का? आपल्याकडे आज या प्रश्नांची उत्तरे नाहीत. महाराष्ट्राच्या या क्रिडा संस्कृतीचे वर्णन कुठेही लिहीलेले नाही. हा इतिहास कोणाला अवगत आहे का हे ही सांगता येणार नाही.


आपली जीवनसरणी बदलली आणि आपण हे खेळ खेळायचे थांबलो. फारसे काही साहित्य न लागणार्‍या अशा या खेळांमधून उत्तम व्यायाम तर होतोच पण आपल्यातले उपजत कला-कौशल्य पणाला लागते. सध्याच्या मोबाइल आणि कॉम्प्युटर 'गेम्स' च्या युगात लोकांनी एकत्र येऊन खेळायला अनन्यसाधारण महत्व आहे.तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दुसरी बाजू ही की लोकांमधील तुटत चालेला संवाद… या खेळांमुळे रोजच्या कामांमधून वेळ काढून लोक एकत्र येतात, खेळतात, करमणूक होते, संवाद वाढतो आणि मन प्रसन्न राहते. आपल्या संस्कृतीची आठवण म्हणून आपण येत्या पिढीला हे खेळ शिकवायला हवे.


आज जगभर पारंपारिक आणि स्थानिक खेळ पर्यटनाचे एक आकर्षण असताना महाराष्ट्रात मात्र आपण त्याचा ह्या दृष्टीने विचार केलेला नाही. आपल्या खेळांमुळे जगभरातले पर्यटक आकर्षित होऊ शकतात; ही संधी आपण घेतली पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न