चित्रपट
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
चित्रपट हे एक दृकश्राव्य माध्यम आहे.यातून एकाचवेळी डोळे व कान तृप्त होतात.माणसाच्या भावभावनांना मिळालेला सुंदर प्लॅटफॉर्म म्हणजे चित्रपट.पुर्वी लोक चित्रपट पडद्यावर पहायचे..पण जसा काळ बदलला चित्रपट सिनेमागृहात बघितली जाऊ लागली.त्यातही बदल होऊन ती डिजीटल युगाकडे सरकली.आज OTT प्लॅटफॉर्मवर घरबसल्या मोबाईलवर नवनविन चित्रपट पहायला मिळतात.ही खरी डिजीटल क्रांतीच आहे.चित्रपटांचा हा मनोवेधक प्रवास अतिशय रंजक आहे.आज आपण टिव्हीमुळे जुने चित्रपट पाहू शकतो.
चित्रपट हे एक तंत्र आहे.या तंत्राच्या माध्यमातून अतिशय सुंदर,तरल,भयावह,सजिव चित्रकथा सादर केल्या जातात.त्याला संगिताची अप्रतिम जोड देऊन चित्रपट अधिक भारदस्त बनतो.त्यातून माणसाच्या जीवनाला जवळून स्पर्श होतो.चित्रपटांमुळे सहज सुंदर कलाविष्कार सादर केले जातात.लहानांपासून मोठ्यांपर्यंतचे सर्व प्रेक्षक चित्रपट पाहू शकतात.काही चित्रपट लहानांसाठी असतात तर काही फक्त मोठ्यांसाठी.चित्रपटात काही विषय मोठ्याप्रमाणावर चोखाळलेले आहेत.प्रेम, स्त्री, नाती,ईश्वर, भक्ती, पुरूष, मानवी भावभावना असे विषय प्रामुख्याने येतात.भावप्रधान चित्रपट ही हिंदी चित्रपटांची खासियत.मराठी तसेच इतर प्रादेशिक चित्रपट हेही अतिशय सुंदर कलात्मक विषयांची हाताळणी करतात.हम आपके है कौन,ताल, परदेस असे अनेक हिंदी चित्रपट गाजले.खर तर त्यांची संख्या अगणित आहे.मराठीतही श्वास सारखे चित्रपट राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.चित्रपट हे नुसते करमणूकीचे माध्यम न बनता ज्ञानविज्ञानाचे माध्यम बनावे असेही प्रयत्न होतांना दिसतात.परदेशात तर आधुनिक तंत्रज्ञान अतिप्रगत असल्याने चित्रपटही नवनविन व वैविध्यपूर्ण असतात.त्यात रोबोट, कल्पनाविश्व, अॅनिमेशन यांचा भरपूर वापर होतो.नवनविन वैज्ञानिक शोधांवर आधारीत शॉर्टफिल्म(लघूपट),व्हिडीओ यांची रेलचेल असते.त्यांचे चित्रपट आधुनिक जीवनशैलीचे प्रतिनीधित्व करतात.भारतात असे प्रयोग होतात परंतू त्याचे प्रमाण अल्प आहे.आपल्याकडे स्त्री पुरूषातील रोमान्स या गोष्टीवर शेकड्याने चित्रपट बनतात.अलिकडे वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत.ती नव्या युगाची नांदीच आहे.चित्रपटांचे सिक्वलही काढले जातात.क्रिश,धूम यांचे सिक्वल काढले गेले.तेही बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरले.भारतात बॉलिवूड तर परदेशात हॉलिवूड चित्रपट इंडस्ट्री आहे.चित्रपट ही कमाई करणारी मोठी कला मानली जाते.अनेक चित्रपट नट नट्या काम करून पैसे कमवतात.यामुळे खूप मोठा रोजगार उपलब्ध होतो.तसेच कमी अवधित ग्लॅमर मिळवून देणारे हे माध्यम आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, संगितकार, लेखक, गीतकार, तंत्रज्ञ, कलाकार अशा अनेक जणांच्या टीमने एक कलाकृती घडते त्यालाच चित्रपट म्हणतात.
या माध्यमाने तरूण वर्गाला फार प्रभावित केले आहे.जुनी नवी हिंदी गाणी, मराठी गाणी सर्वांना पाठ असतात.चित्रपटातील कपड्यांची,रहाण्याची फॅशन तरूणवर्गाला आकर्षित करते.समाजावर याचा सकारात्मक व नकारात्मक दोन्ही परिणाम होतात.उत्तम व दर्जेदार चित्रपट समाजावर चांगला परिणाम साधतात.मुघल-ए-आझम सारखे चित्रपट कला,इतिहास, उत्कृष्ट रोमान्स तसेच अभिनय या सर्व बाजूंनी पाहिल्यास अतिशय सुंदर परिणाम साधतो.ते कसब सर्वांनाच जमते असे नाही.परंतू तसे प्रयत्न नक्कीच मैलाचा दगड ठरतात.चित्रपट पाहिल्यानंतर त्यातिल कथानक, गीत,संगित कलाकार बऱ्याचदा लक्षात रहातात.तेच जर वाचून कथा तितकीशी कळत नाही.हेच चित्रपटाचे यश आहे.अलिकडे चित्रपट फक्त पैसा कमवायचे माध्यम न राहाता उत्तम कलाविष्काराचे माध्यम बनावे हीच सदिच्छा!
Comments
Post a Comment