कारागिराचे यश
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
राजापूर नावाच्या गावात एक केशव नावाचा लाकूडकाम करणारा कारागिर रहात होता.त्याच्या हातात दैवी कला होती.त्याने बनवलेल्या वस्तूंना खूप मागणी होती.पिढ्यान् पिढ्या त्याचे पुर्वज हीच कला पूढे नेत आले होते.केशवला एक मुलगी होती.तिचं नाव राधा!..ती लहानपणापासून केशवला लाकडाचे उत्तम शिल्प बनवतांना पहात आली होती.तीला नेहमीच तिच्या बाबांचा अभिमान वाटत असे.हळूहळू राधा मोठी झाली.तिलाही लाकडावरती कोरीवकाम करणे तसेच वस्तू बनवणे शिकावेसे वाटू लागले.
एक दिवस ती केशवला म्हणाली,
"बाबा, मलाही ही कला शिकवा नं..किती सफाईने तुम्ही इतक्या सुंदर वस्तू बनवता".
त्यावर केशव म्हणाला,"राधा,आत्ता नाही.तू आधी उच्च शिक्षण घे.मगच या गोष्टीचा विचार करू."
राधा नाखूशीने तयार झाली.पुढे ती मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी शहरात गेली.४ वर्षाच्या कोर्ससाठी ती होस्टेलवर रहाणार होती.पहिल्या वर्षी सुट्ट्यांमध्ये ती गावी आली.बाबा व तिथले कारागिर चर्चा करत बसले होते.तीने सहज चर्चा ऐकली.
केशव- " अरे असं खचून कसं चालेल.हेही दिवस जातील..आपले दिवस येतिल.काळजी करू नका".
राघव- अरे केशव तू म्हणतोस ते खरंय.पण पुर्वीचे दिवस नाही राहिले.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लाकडी कला कुठपर्यंत तग धरणार.आपले पूर्वज भाग्यवान होते.त्यांना गिऱ्हाईक होता.पण या काही दिवसात मागणी खूपच कमी होत चाललीये.कसं होणार आपल्या मुलांचं?"
केशवही चिंतेत पडला.कारण वस्तूस्थितीच तशी होती.राधाने हे ऐकले.तिने मनाशी एक निश्चय केला.तिने आपल्या बाबांनी केलेली जहाजाची,राजवाड्याची काष्टशिल्पे कॅमेराने टिपली.ते फोटो मित्र मैत्रीणींना पाठवली.त्यांना सर्वांनाच ती शिल्पे प्रचंड आवडली.सगळे फोन करून राधाशी त्या शिल्पांची तारीफ करू लागले.कॉन्फर्नस कॉलवर सगळे बोलत होते.इतकी सुंदर कला नामशेष होत असल्याबद्दल ती व तिचे मित्र काळजीत पडले.त्यापैकी सुधिरने नवा विचार मांडला." आपण या शिल्पांचं शहरात प्रदर्शन भरवलं तर?" सर्वांनीच त्या गोष्टीला संमती दर्शवली.
मग राधाने केशवला ही कल्पना सांगितली.त्यानेही या गोष्टीला सहमती दर्शवली.
एका महिन्यातच केशव व त्याच्या मित्रांचे भव्य काष्टशिल्प प्रदर्शन भरले.अनेक पत्रकारही तेथे जमले.सर्वांनाच ती शिल्पे अजोड वाटली.असे शिल्प त्यांनी पुर्वी कधी बघितलेच नव्हते.एका रात्रीतच केशव व त्यांच्या शिल्पांची मोठी जाहिरात झाली.त्यांच्या मुलाखती टिव्हीवर झळकू लागल्या.छोट्या राजापूरचा केशव व मित्रमंडळ प्रसिद्धी झोतात आले.त्यांना अनेक मोठ्या लोकांकडून ऑर्डर मिळाल्या व त्यांचा धंदा तेजित आला.
अशाप्रकारे आधुनिक काळातही त्यांची पिढ्यानपिढ्या जपलेली कला यशस्वीरित्या समाजात नावलौकीक मिळवून गेली.केशवने राधेला जवळ घेऊन तिचे खूप कौतूक केले.तिनेही बाबांचे आशिर्वाद घेतले व म्हणाली," बाबा, आता मलाही ही कला शिकवा.म्हणजे आपली परंपरागत कला अशिच जिवंत राहिल" केशवच्या डोळ्यात पाणी आले व देवाचे आभार मानले.
तात्पर्य- प्रयत्नांनीच यश साध्य होते.
Comments
Post a Comment