मुलांचे विश्व
सौ.स्वरूपा कुलकर्णी
बच्चे मन के सच्चे...।
हे गीत आपल्या सर्वांच्या आवडीचं..किती सुंदर ओळी आहेत ह्या..लहान मुलं कधीच खोटं बोलत नाहीत.सगळं खरं सांगतात.बऱ्याचदा मोठ्यांचीही खरं बोलून फजिती करतात.त्यांचं सुंदर विश्व जर समजावून घेतलं तर खऱ्या अर्थाने रोजच बालदिन साजरा होईल.
लहान मुल जन्माला यायच्या आधी आईच्या पोटात असतं.नऊ महिन्यांच्या त्या जडणघडणीच्या काळात ते दिवसागणीक बदलत असतं.त्याचं निश्चित रंग,रूप,आकार हे ठरायचं असतं.त्याला आई-वडिलांकडून मिळालेले जनुके त्याचे पुढचे व्यक्तिमत्व कसे असेल हे ठरवत असतात.Inheritence हा शब्द आपण वापरतो.ही निसर्गाची प्रजनन क्रिया पार पाडल्यानंतर आई बाळाला जन्म देते.किती निरागस डोळ्यांचं, निष्पाप पिल्लू ती माता या जगात आणते.नैसर्गिक असो अथवा सीझर पद्धतीने ते बाळ अनेक संघर्ष करतच जन्मलेलं असतं.या जगात आल्यानंतर त्याला त्याचं नाव, गाव, ओळख असं काही बोलता सांगता येत नाही.पण ते आपल्या जन्मदात्रीला -आईला ओळखतं.तीने सहन केलेले ते दिवस जणू बाळही विसरलेलं नसतं.त्यालाही तीच सुरक्षित जागा वाटते.मग ते रडतं,चिडतं, अंथरूणातच सु शी करतं..पण आई जवळ आली की एकदम शांत होतं..हळूहळू हे बंध दृढ होत जातात..मग ते बाळ आईला पहात पहातच दूध पितं,पुढे पुढे खाऊ पिऊ लागतं..पण सगळीकडे तिच हवी असते.मुल मोठं होतांना आई व नंतर हळूहळू बाबा त्याच्या मुग्ध-निरागस विश्वात प्रवेश करतात.त्यानंतर आजी,आजोबा,इतर नातेवाईक व पाहूणे..मुल त्यातून खूप काही शिकत असतं व त्याचं व्यक्तिमत्व घडत असतं.त्याच्या व्यक्तिमत्वाचं उत्तम समायोजन होण्यासाठी आई व नंतर बाबा हे फार महत्वाचे घटक असतात.ते बाळाचे पहिले गुरू(Mentor) मार्गदर्शक...त्यांना पहातच ते चांगलं वाईट समजतं व वागतं..त्याला सुरवातीला स्वतःचं मत नसतं पण आई व नंतर समाज त्याला शिकवतो.मग त्याला स्वतंत्र आकार मिळतो.मातीच्या गोळ्यासारखी लहान मुलाची अवस्था असते.जसा आकार देऊ तसे ते घडते.
म्हणूनच पालकांनी आपल्या निरागस बाळांना घडवतांना प्रथम पासूनच जागरूक रहावे.ही काळाचीही गरज आहे.इंटरनेट,मोबाईलच्या जगात ही मुलं त्यांचं बालपण हरवून बसता कामा नये.त्यांनी मोकळं जगावं,जग अनुभवावं,निर्धास्त फुलावं हीच नैसर्गिक वाढीची लक्षणे आहेत.धाक दाखवून,दडपशाही करून मुल विकास व वाढीत मागे रहातं.गरज पडेल तर रागवावं पण अमानुष शिक्षा,मारहाण टाळावी.नाहीतर मुल हातातच येणार नाही व मग हतबल व्हायची वेळ येईल.त्या कोवळ्या अश्राप बाळांना जपा व व्यक्त होऊ द्या.हेच त्यांचं पडण्याझडण्याचं वय आहे.अति काळजीनेही वाईट परिणाम होतात.ते टाळा.नैसर्गिक फुलनं हेच खरं फुलनं व तोच विकास..संस्कारांनी मोठं करा.तीच तुमची पुढच्या पिढीतली ओळख आहे.तीला शिकवा , मोठं करा.नवे पंख द्या.हरली तर नवचेतना द्या.या विशाल अवकाशात मुक्तपणे उडू द्या.अनुभवानेच माणूस शिकतो हे बिंबवा..जोपासा हे फुल जे उद्याचं भविष्य आहे..मग रोजचा दिवस बालकदिनच असेल,हो ना?
Comments
Post a Comment