प्रवासवर्णन


-सौ.स्वरूपा कुलकर्णी



      मला लहानपणापासूनच प्रवास करायची खूप आवड आहे.प्रवासात केलेली गम्मत जम्मत तसेच अनुभवाला येणारी मनोरंजक घटना मनात घर करून जाते.जग किती सुंदर आहे ते उघड्या डोळ्यांनी पहावं असं माझं मत आहे.सुंदर सुंदर माणसं त्यांचे संवादकौशल्य, वेगळ्या राज्यातील वेगळ्या भाषा, ती ऐकून वाटणारी मजा लहान मुलासारखी एखाद्या परडीत जमा केलेल्या फुलासारखी जमा करावीत.तीच परडी आयुष्यभर जपावी.त्या फुलांचा सुगंध दीर्घ काळ पर्यंत टिकतो.नाश पावत नाही.

        मी कॉलेजला असतांना हैद्राबाद,तिरूपती असा प्रवास करण्याची सुसंधी चालून आली.मी तर आनंदाने फुलून गेले होते.ती सहल आयोजित केली होती माझ्या आजोबांनी(आईच्या वडिलांनी),त्यांचा औरंगाबादमध्ये ज्येष्ठ मंडळींचा हास्य क्लब होता.ही सहल चौधरी यात्रा कंपनीकडे सोपवली होती.मी , माझी मावशी, आज्जी-आजोबा व इतर ज्येष्ठ व काही तरूण मंडळी या सहलीसाठी एकत्र जमली.आमचा प्रवास औरंगाबाद-हैद्राबाद-तिरूपती असा असणार होता.ट्रॅव्हल्सची बस असल्याने व सोबतची मंडळी अतिशय उत्साही असल्याने गाणी म्हणत,भेंड्या खेळत आमचा प्रवास सुरू झाला.प्रवासात चहापाण्याची,जेवणाची व राहाण्याची सोय यात्रा कंपनीच करणार होती.मजेत चाललेला तो प्रवास अविस्मरणीय ठरला.हैद्राबादला उतरल्यानंतर तिथली रस्त्यांची स्वच्छता,खूप झाडी,दुतर्फा फुलांची रोपटी,मी तर पहिल्या भेटीतच हैद्राबादच्या प्रेमात पडले.बिर्ला टेंपल, नेहरू झुऑलॉजिकल गार्डन, प्लॅनिटोरियम, म्युझिअम या गोष्टींना भेट देतांनाचा अनुभव केवळ अविश्वसनिय.बिर्ला टेंपलमध्ये झालेले विष्णूंचे दर्शन फार सुंदर होते.तिथला मंदिराचा सफेद रंग फार भाऊन गेला.मन प्रसन्न करणारी स्वच्छता, पावित्र्य,  श्रीमंती वेगळाच अनुभव देऊन गेली. नेहरू गार्डन मधिल प्रथमच पाहिलेला पांढरा मोर आजही स्मरणात राहिला.म्यझियम मधिल विविध वस्तुंचा अफाट खजिना पहातांना मनं भारावून गेली.मी पाहिलेले तिथले जुने घड्याळ व त्याची घंटा, विविध तलवारी, पेंटींगचे प्रदर्शन, विविध लढाईत वापरल्या जाणाऱ्या वस्तू, कप बशांचे विविध आकर्षक नमुने फारच सुंदर इतिहास सांगून जात होते.ते राजवैभवी ऐश्वर्य मनाचा ठाव घेऊन गेले.त्यानंतरची सफर अधिक स्फुर्तिदायक व रोमांचक ठरली.आम्ही रामोजी फिल्म सिटी पाहिली.हिंदी,तमिळ,तेलुगू चित्रपटांची शुटींग येथे नेहमी होते.डोळ्यांची पारणं फेडणारी इथली दुनिया नजरबंदी करते.किती सुंदर सुंदर झाडी तसेच चित्रपटांसाठी उभारलेले कट आऊट्स मनोवेधक आहेत.तिथे आतमधिल परिसर बघायला बसची सोय आहे.त्या उघड्या बसमधून आजूबाजूच्या गमती जमतीचा आनंद घेत दिवस कोठे जातो कळतच नाही.मुलांसाठी, तरूणांसाठी व ज्येष्ठांसाठीही विविध खेळ, बगिचे हे येथिल प्रमूख आकर्षण आहे.

           या चित्तवेधक प्रवासात आम्ही गेलो तिरूमला-तिरूपती डोंगरावर.तिथली अद्भूत चढण व चित्तथरारक प्रवास आजही आठवतो.त्या रोमहर्षक प्रवासात तिरूपतीचे ४ तासांनी झालेले दर्शन हा दुग्धशर्करा योग होता.तिथल्या मोठमोठ्या मंदिरांचे व्यावस्थापन फार वाखाणन्यासारखे आहे.तिथली स्वच्छता स्पष्ट जाणवते व मन अधिक प्रसन्न करते.गोविंदा गोविंदाचा जयघोष करतच आम्ही दर्शरांगेत चालू लागलो.किती सुंदर शिल्पकाम त्या मंदिरावर आहे याची जाणीव झाली.तिथले मोठं गंध लावणारे पुजारी लक्षात राहिले.एकंदरीत गजबजलेल्या त्या रांगेत विलक्षण भक्तीभाव व गोविंदाला पहाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.किती न कसे सांगावे तेथिल ऐश्वर्य?..सोन्याचा कळस, सोनेरी खांब ..देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असल्याचा अनुभव तेथे आला.त्या गर्दितून एकदाचे देवासमोर आलो...गाभाऱ्यात रत्नमंडित बालाजी भगवंताची मुर्ती शांत व प्रसन्न दिसत होती.आत प्रकाश कमी होता पण रत्न,हिरे,माणिक चमकत होते..तो एक क्षण... बस्स...सारी यात्रा सफल झाल्याचा अनुभव देऊन गेली.तिथून बाहेर पडल्यावर मन भक्तीरसात चिंब झालेले होते.तिथे मिळालेला प्रसादाचा लाडू म्हणजे भगवंताच्या कृपेचा प्रसादच होता..गोवंद गोविंद!!...

   परतीचा प्रवास तसाच उत्सैहवर्धक व सुंदर झाला...मी वारंवार परत एकदा ते बालाजीचे दर्शन परत व्हावे म्हणून आस लावून आहे..न जाणे कधी तो देव बोलवेल व कधी मी कृतकृत्य होईल?...

        वेंकटरमणा गोविंदा!गोविंदा!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न