"आई, मी येतिये गं पाडव्याला.." इति मी. 

"हो हो ,आम्ही वाटंच पहातोय..सगळे या.." तिकडून आई फोनवर बोलत होती..

माहेरी जायला मिळणार म्हणून माझा आनंद नुसता ओसंडून वहात होता..बच्चेकंपनी तर नाचूच लागली..एकूणच काय सगळं वातावरण खूश्श!!

दिवाळीतले हे संवाद सर्वत्र ऐकायला मिळतातच..कारण ही पर्वणी दर वर्षात एकदाच येणारी पण वर्षभर आठवणीत रहाणारी..

दिवाळीचा आनंद माहेरी जायला मिळणार म्हणून वाढलेला असतो😀तसं पाहिलं तर दिवाळी चा आनंद १ महिना आधिच दिवाळी येणार म्हणून जाणवत असतो..कसा नि किती ते सांगता मात्र येत नाही..सुख सुख म्हणतात ते काय असतं ते दिवाळीतच कळते...एक स्त्री म्हणून नविन साडी घेण्यातलं सुख..पिल्लांना नविन कपडे आणन्यातलं सुख..नवऱ्याला दिवाळी गिफ्ट मागण्यातलं सुख..दिवाळी येणार म्हणून सगळं घर आवरण्यातलं व नंतर निवांत चहा घेण्यातलं सुख.. फराळाच्या नवनविन रेसिपी बनवून सगळ्यांची वाहवा मिळवण्यातलं सुख...ही यादी न संपणारी...😍..

   लक्ष्मीपुजनाला उजळणाऱ्या लक्ष लक्ष दिव्यांना पाहून हसणारी दिवाळी मनात चांदणं गोंदणं करते ..जणू सुखांच्या राशी लक्ष्मी भरभरून देत असते.आपण फक्त साठवून घ्यायचं..तिची कृपा..तिचं प्रेम...तिची वत्सल नजर..सगळंच आश्वासक...सुंदर..मनमोहक..

दिवाळीचा तो मंगलमय दिवस सगळ्या घरादाराला प्रसन्न करतो...अंधाराच्या साम्राज्यावर दिव्यांच्या प्रकाशाची रांगोळी अधिकच ठसठशीत दिसते...फटाक्यांची आतिषबाजी ..आसमंताला नवी उंची मिळवून देते..

    पाडव्याला नवऱ्याला औक्षण करतांना त्याच्या डोळ्यात उजळलेले तेजस्वी आनंदाचे दिप मन फार सुखावून टाकतात..किती नी काय बोलतात नवरा बायको एकमेकांशी.हो नं?🥰..हीच खरी समाधानाची दिवाळी..

माहेरी आल्यावर भरलेलं घर अनुभवतांना मिळणारा आनंद शब्दातीत..

बाबांना ओवाळतांना वाटणारे तृप्त आनंदाचे क्षण कसे नी किती वर्णन करावे..त्यात सामावलेले आशिर्वादाचे व आपल्या लाडक्या लेकीला आनंदात पाहून भरून आलेले डोळे...हीच समाधानाची दिवाळी..

   भाऊबीज येते ती भावाबहिणीच्या मायाळू, प्रेमळ नात्यातील रेशीमबंध दृढ करण्यासाठी..किती अवखळ, खोडकर,तरीही जिव्हाळा असलेलं ते रक्ताचं नातं ...ही खरी आपुलकीची दिवाळी..

  खरंच हा सोहळा प्रेमाचा, आनंदाचा व नात्यातील गोडवा वाढवणारा...सौख्य समृद्धी देणारा..आपल्या रक्ताच्या,प्रेमाच्या माणसांजवळ राहून मिळणारे सौख्याचे क्षण अनुभवायला खरंच भाग्य लागतं..ते क्षण वारंवार यावेत हीच मनामनांतली दिवाळी..

दिवाळीचा सण ही सासर माहेरची रेशीमगाठ अधिक दृढ करतो..म्हणूनच ह्या सणाला सर्व सणांचा राजा म्हणतात..

आज माहेरी आल्यावर या नात्यातली उत्कटता अधिक जाणवतीये.

 ईश्वर करो प्रत्येकाच्या वाटेला आनंदाची दिवाळी येवो व सुख समृद्धी सर्वत्र नांदो.. 


उजळू दे दिप सौख्याचा,

नांदू दे प्रकाश नवचैतन्याचा,

लाभो प्रत्येकाला सौख्य समाधानं,

लाविला हा " *शब्ददिप* " अंतरीचा..

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न