#_जागर_आदिशक्तीचा
विषय क्र ६- नवरात्रकाळातील विशिष्ट पद्धती किंवा प्रथा
लेखिका-सौ.स्वरूपा कुलकर्णी
मी माहेरची दिक्षीत व सासरची कोऱ्हाळकर- कुलकर्णी.माझं माहेर संभाजीनगर व सासर राहाता तालुका,जिल्हा अहमदनगर.माझं सासरचं कुलदैवत सप्तश्रृंगी देवी.आमचं मुळ गाव कोऱ्हाळा.राहात्यापासून अगदी जवळ.तिथे पुर्वी आमची शेती व वाडा होता.आज तिथे देवीचं मंदिर आहे.मंदिर खूप जुनं व साधंच आहे.मंदिराच्या गाभाऱ्यात महालक्ष्मी,महासरस्वती व महाकालीच्या मुर्त्या आहेत.नवरात्रीत इथे उत्सव करतात.देवीच्या मंदिराला सजवले जाते.नवरात्रीत ९ दिवस देवीची पूजा आरती यथासांग केली जाते.आम्ही सगळे एक दिवस देवीच्या दर्शनाला जातो.
आम्ही कोऱ्हाळकर ९ दिवस देवीचा उपवास करतो.९ दिवस घरात पलित्याने आरती होते.देवीसमोर अखंड दिवा ठेवला जातो.देवीची सकाळ संध्याकाळ आरती होते. रामदास स्वामी रचित "अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो" ही पारंपारीक आरती म्हंटली जाते.या ९ दिवसात कुंकूमार्चन, श्री सुक्त पठण,सप्तशती पठण केलं जातं. अष्टमीला फराळाची सवाष्ण घातली जाते.तसेच कुमारीका पुजनही असते.दशमीला म्हणजे दसऱ्याला मेव्हण जेऊ घालतात.सवाष्णीला हळद कुंकू लावून साडी,नारळ व ओटी भरली जाते.ब्राह्मणाला दक्षिणा दिली जाते.मेव्हण जेऊन गेल्यावर आमचे उपवास सुटतात.
हे दहाही दिवस आम्ही गावातल्या मैत्रिणी देवीची सामुहीक उपासनाही करतो.तेथे भोंडला,कुमारीका पुजन,दांडिया खेळतात.अशाप्रकारे यथामती यथाशक्ती उपासना करून देवीची आराधना केली जाते.
या नगर विभागात काही घरांमध्ये घट स्थापन करून देवीची पुजा करतात.९ धान्य व घट स्थापला जातो.झेंडूच्या पानांची किंवा विड्याच्या पानांची माळ लावली जाते.घटावर देवीच्या मुर्तीची स्थापना केली जाते.शक्यतो सगळीकडे ९ दिवस उपवास केला जातो.सप्तशती पठण केले जाते.सकाळ- संध्याकाळ आरती होते.नगर विभागात सगळीकडेच ९ दिवसांचे उत्सव देवीची मुर्ती मंडळांमार्फत स्थापन करून साजरा होतो.अनेक मंदिरात देवीची पुजा अर्चा जोरदार केली जाते.हे ९ दिवस शक्ती उपासनेचे असल्याने वातावरण उल्हासीत असते.देवीचा जयघोष,आरती यांनी वातावरण दुमदुमून जाते.
Comments
Post a Comment