निर्माल्य


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी



     आबांची पुजा केंव्हाच झाली.पहाटेच उठून सगळं उरकून आधी देवपूजा करण्याचा त्यांचा परिपाठ अनेक वर्षांचा.आनंदी या घरात सून म्हणून आली नी घरात सर्वांशी एकरूप झाली.आनंदीला सुरूवातीपासूनच आबांच्या या देवपूजेचं भारी कौतूक व कुतूहल होतं.का ते या उतारवयातही देवपूजा इतक्या आवडीने करत असतील?तिला प्रश्नच पडायचा.माधव त्यांचा मुलगा पण तो मात्र देवाधर्मापासून लांबच.म्हणजे गणपती उत्सव हा त्याचा लाडका सोहळा पण एरवी मात्र देवासमोर नमस्कार करण्या पलिकडे तो जात नसे.आबा मात्र स्वभावाने धार्मिक.रोज सत्संग ऐकणारे.नामस्मरण करणारे.सत्तरीतही तरूणाला लाजवतील अशी अनेक कामं शिताफीने करणारे.घरी गाई-गोठा..परसात अनेक जातीची फुलं त्यांनी स्वतःहून जोपासलेली.गावातली सारी लहान थोर मंडळी आबांच्या शब्दाबाहेर नसे.त्यांचा एक वेगळाच रूबाब व थाट पहाणाऱ्याला जाणवत राही.मनाने अतिशय स्वच्छ,दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सुप्रसिद्ध..

          आज पहाटेच नित्याप्रमाणे आबांना जाग आली.झुंजूमुंजू झालं होतं.कोंबडा आरवला.बंबात पाणी टाकण्याचा आवाज त्यांना आला.ह्या आनंदीचं कौतूक त्यांना नेहमीच वाटे."खरंच गुणाची पोर.घरात सासू नाही पण सगळं घर किती आनंदी करून टाकते आपल्या असण्याने..अगदी नावाप्रमाणेच.."आबा तीच्याकडे कौतूकाने पहात होते.  "आनंदी बाळा, किती करशील.." आनंदीच्या कानावर शब्द आले.तिने मागे वळून पाहिलं.

" आबा,तुमच्या मुलीसारखीच ना मी तुम्हाला..मग का एव्हडा विचार करता..मला पहाटे उठायला उलट खूप आवडतं .का सांगू?" 

आबा हसत म्हणाले,"का?"  "कारण तुम्ही सकाळी जी देवपूजा करता नं ती पहाण्यासाठी.किती सुंदर सुंदर फुलं वाहाता देवाला.नी तोही खूश होतो तुमची पूजा घेऊन.मला तर वाटतं रोज तो देव तुमची वाट पहात असणार पूजेसाठी".

ते ऐकून आबा म्हणाले, "हे बाकी खरं बोलली हा आनंदी.मला देवच रोज पहाटे उठवतो व माझ्याकडून अगदी साग्रसंगित पूजा करून घेतो.त्याची कृपा आहे तोपर्यंत करीन ही पूजा.देवाला सगूणाची पूजा प्रियच आहे".

  ते ऐकतांना आनंदीने तोपर्यंत चहा बनवला.आबा आन्हीक उरकून चहा घेऊन देवपूजेला बसले.अत्यंत तल्लिन होत त्यांनी सहनेवर चंदन उगाळला.देव ताम्हनात काढले.आज एकादशी म्हणून उद्वार्चन केले.पितळी मुर्त्या लख्ख केल्या.देवाला पुरूषसुक्ताचा  अभिषेक केला.पंचामृताने आंघोळ घातली. एकएक करत मुर्त्या वस्त्राने पुसल्या.देवाला कपाळी चंदन लावले.पांडूरंगाला बुक्का लावला.सप्तश्रृंगीला कुंकू लावले.गणपतीला जास्वंद,दुर्वा वाहिल्या.सर्व देवांना चाफा,जाई,गोकर्णाची फुले वाहिली.मन कसं प्रसन्न झालं.आबांनी आनंदीने केलेला नैवेद्य दाखवला.धूप दीप आरती झाली.आबा त्या चंदनी देव्हाऱ्यातल्या हसऱ्या मुर्त्यांकडे बघतच राहीले.जणू मुर्त्या प्रसन्न होऊन आशिर्वाद देत होत्या.इतक्यात पांडूरंगाच्या डोक्यावर वाहिलेलं जाईचं फुल टपकन खाली पडलं.अन् आबा पहातच राहिले.जणू हाच ईश्वरी संकेत समजून आबांनी ते फुल हुंगलं,मस्तकी धारण केलं.

त्यांच्या मनात विचार आला

" पांडूरंगा तुला मागणं काहीच नाही.बस्स तुझी पूजा करता करताच मरण येऊ देत हेच मागणं "

त्यांच्या डोळ्यात घळाघळा अश्रू आले.ते सद्गतीत झाले.कंठ अवरूद्ध झाला.आबा शिरसाष्टांग नमस्कार घालत" पांडूरंग" "पांडूरंग"म्हणत निःशब्द झाले.नी क्षणात त्यांची प्राणज्योत पांडूरंगाशी एकरूप झाली.

आनंदी पूजा करतांना नेहमी आबांभोवतीच असे.पण आज नकळत ती जरा जास्तवेळ घरकामात गुंतली.इतका वेळ झाला आबा बाहेर कसे नाही आले म्हणून पहाते तर आबा जमिनीवर निपचीत पडलेले.तिला शंका आली तिने हात लावला तर आबांचे सगळे शरीर थंड पडलेले.श्वास बंद होता.आनंदी किंचाळलीच.मट्कन खाली बसली.धायमोकलून रडली.आबा आत्ता तर इथे होते नी आत्ता नाही हे दुःख तिला सहन होईना.तिला देवघराकडे बघवेना.हळूहळू बातमी सगळीकडे पोहोचली.आबा आपल्याला सोडून गेले ही धक्कादायक बातमी वायूवेगाने पोहोचली.माधव व आनंदी कोलमडून गेले.आबांची शांत,सात्विक मूर्ती आठवून ते दोघेही हमसून हमसून रडले.

कधी नव्हेते माधव देवघरातल्या देवाकडे पाहून हात जोडून म्हणत राहिला,"देवा, माझ्या आबांना मुक्ती दिलीस.पण आमच्यापासून काढून घेतलंस.पांडुरंगा,आज एकादशी.तू त्यांना सद्गती दिलीस.आबांची देवपूजा सफल झाली.."

शेवटी आबांच्या हातात जाईचं सुकूमार फुल अर्धवट सुकलेलं सापडलं.जणू देवाने प्रार्थना ऐकली.त्यांची अवस्था

"धन्य निर्माल्याची कळा,मृत्यू सर्वांगसोहळा"अशीच झाली.मरणाचाही सोहळा झाला.आबा पांडूरंगाशी एकरूप झाले.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न