❤️लेखणीतून उलगडत गेलेली स्वरूपा

        प्रिय स्वरूपा, तुला वाढदिवसाच्या वाचनालयातील  भरपूर अजरामर  पुस्तकांइतक्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!!🌹

आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तू मला कशी उलगडत गेलीस ह्याचा सखोल विचार मनात आला.साधारण दोन वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवात माझ्या शेजारी एक उंच, गोरीपान, सडपातळ, सुंदर, हसतमुख व्यक्तिमत्व असलेली एक स्त्री येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज झळकत होते,गोऱ्यापान देहावर गडद रंगाची साडी खूप शोभून दिसत होती. चेहऱ्यावरचा हलकासा मेकअप तिच्या शालिनतेची साक्ष देत होता. सगळ्यांशी गोड आणि शांतपणे बोलण्याने तिचे पावित्र्य आणि निर्मळ मन डोकावताना दिसत होते. तिथे आमची ओळख झाली. हीच ती स्वरूपा कुलकर्णी.

इथूनच तुझ्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडायला सुरवात झाली असे म्हणण्यास हरकत नाही. त्यानंतर "शब्दसोहळा" च्या स्वलिखित महिलांच्या लेख वाचनाचा कार्यक्रम गुगल मीट द्वारे घेण्यात आला,त्यात मी सहभागी होते. तिथे तुझा स्मार्ट फोनचे महत्व सांगणारा लेख ऐकला. खरं सांगायचं तर ह्या स्मार्टफोनमुळे आणि त्यावर केलेल्या लिखाणामुळे तूझी व माझी मैत्री बहरत गेली.

शब्दसोहळा समूहाच्या मैत्रिणींच्या साथीने आपले लेखनकौशल्य वाढीस लागले. तुझ्या सुंदर आणि प्रतिभावान लेखनाने तुझे पैलू उलगडत गेले. अभिवाचनस्पर्धेतील सहभागाने एकमेकींच्या पुस्तक प्रेमाची आवड समजली. तुझा वाचनीय अभ्यास खूप चांगला आहे. ते तुझ्या लेखनातून स्पष्ट होते. तुला मोबाईल वर केल्या जाणाऱ्या तांत्रिक गोष्टीचे व्यवस्थित आकलन होते. त्यामुळे लिंक send करणे, किंवा स्पर्धांची माहिती, निरनिराळ्या अभिवाचनाची तंत्र तुझ्याकडे शिकायला मिळाली. ह्याच स्मार्ट फोनच्या स्टेटस मुळे तुझ्या माहेरच्या, सासरच्या लोकांची ओळख झाली. तू जतन केलेली सुंदर नाती उलगडली. तू खूप निर्मळ मनाची असल्यामुळे मनात कोणताही किंतु न आणता तुला मिळालेली बक्षिसे, तुला झालेल्या आनंदाबरोबर सगळ्यांशी share करतेस ना, ती तुझी अदा पण मला खूप आवडते.त्यानंतर तू आपल्या मंगळागौरीच्या गार्गीसमूहात गोड आणि आदरार्थी बोलण्याने साखरेसारखी विरघळीस,अन भावलीस मनाला.तुझी कॉटन कपड्यांबद्दलची आवड,रंगाची निवड ही सुद्धा वाखाणण्या सारखी आहे, हेही मी जवळून अनुभवलं.तुझे वाचन आणि लेखन दोन्हीही खूप उत्कृष्ट आहे. "माझिया मना" ह्यातून तुझी सोज्वळता झळकली. "मी कशी घडले" ह्या लेखनातून तुझा लग्नाआधीचा प्रवास सुखावून गेला. "पहिलं प्रेम" ह्यातून तुझी रसिकता तरळली, "एका लग्नाची गोष्टीतून" तुझी निरागसता आढळली. सौंदर्य ह्या विषयाच्या लेखनातून पावसाच्या सौंदर्यात चिंब भिजणारी स्वरूपा मला आवडली. जणू पाऊस आला की स्वरूपा आठवल्याशिवाय राहत नाही.हुरहूरमध्ये उमटलेले मातृत्वाचे वात्सल्य अवर्णनीय आहे.आर्या आणि ओवी भाग्यवान आहेत. साहित्यिकांच्या मैफिलित  शांता शेळकेंच्या रूपात आवाजाचे माधुर्य तरारले. सुंदर ते ध्यान ह्या अभंगाचे निरूपण ऐकताना खरंच सांगते, तुझ्यासाठी त्या ओळी म्हणाव्यासा वाटल्या "सुंदर ते ध्यान "जे मला मैत्रीण म्हणून लाभले."निर्माल्य" ही कथा हृदयाला स्पर्शून गेली. एवढ्यात तुझ्याकडून लिहिल्या जात असलेल्या कविता अप्रतिम आहेत. स्वरूपा, तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यात असलेल्या मैत्रिणींच्या श्रीमंतीत मोलाची भर पडली. अजून खूप लिहिण्यासाठी शब्द थांबत नाही,पण आवर घालते. अशी  तू माझ्या प्रत्येक लेखनाची,माझ्यातल्या अस्मितेला जे अभिप्राय देतेस तेही मला प्रेरणात्मक वाटतात.आता मात्र जुने आणि घट्ट ऋणानुबंध अन वर्षनुवर्षाची मैत्री असावी असे वाटते.तुझ्यातले प्रत्येक कौशल्य उत्तरोत्तर वाढत राहो, तुला भरपूर यश, कीर्ती, दीर्घायुष्य मिळो,ही देवापुढे विनम्र प्रार्थना करते 🙏🏻. आणि पुन्हा एकदा माझ्या  मैत्रिणींच्या श्रीमंतीत भर घालणाऱ्या स्वरूपाला वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा देते.🌹🍫❤️

 तुझीच मैत्रीण -सौ नम्रता संजय कोरडे.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न