विषय -लता मंगेशकर
" मेरी आवाजही पहचान है।...."
भारत सरकारने लतादीदींना ‘भारतरत्न’ हा किताब दिला, तेव्हा मनात आले की, या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली? लता मंगेशकर यांना आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर ‘स्वरभारती’, ‘कलाप्रवीण’, ‘सूरश्री’, ‘स्वरलता’ व ‘डी. लिट.’ असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे अथक परिश्रम आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यांतून जातो. अनेक कसोट्यांतून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते – या उक्तीनुसारच आज साऱ्या दिक्कालाच्या मर्यादा ओलांडून लतादीदी या कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य करतात. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे.
दीदींच्या गळ्यात ‘गंधार’ आहे, याची कल्पना त्यांच्या बाबांना-दीनानाथांना होती. ते दीदींना सांगत, “लता, तुझ्यावर ईश्वराने कृपा केली आहे, गळ्यातला गंधार सांभाळ.’ लतादीदींनी आपल्या पित्याचे वचन आयुष्यभर सांभाळले. आज त्या गंधाराने आम्हा रसिकांचे जीवनही तृप्त केले आहे. अनेक ख्यातनाम संगीतकारांची १८०० च्या वर चित्रपटांतील विविध रंगढंगांची सुमारे बावीस भाषांतील गाणी लतादीदींनी गायली असून त्यांची संख्या तीस हजारांच्या घरात सहज जाते.
लतादीदींच्या स्वर्गीय मधुर आवाजाने असंख्य गाणी चिरंजीव झाली आहेत. मराठी माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दीदींच्या आवाजातील ओळी आपल्याला साथ देत असतात. ‘आनंदघन’ या नावाने त्यांनी संगीत-दिग्दर्शनही केले. त्यांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गीत ऐकून पं. नेहरूंच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले होते. आजही हे गीत भारतीयांचे डोळे ओले करते.
अगदी लहान वयात दीदींनी आपल्या बाबांबरोबर नारदाची भूमिका केली होती..’सौभद्र’, ‘भावबंधन’ अशा नाटकांतूनही त्यांनी कामे केली. ‘गजाभाऊ’ व ‘पहिली मंगळागौर’ अशा काही मराठी चित्रपटांतूनही छोट्या भूमिका केल्या. कारण साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
लतादीदींच्या अतीव सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून दिले. त्यांच्या आवाजाच्या विलक्षण लवचीकपणामुळे, अलौकिक फिरतीमुळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करणे शक्य झाले. ‘तीन मिनिटांच्या तबकडीतून लोकांपर्यंत संगीत पोहोचवण्याचे अवघड काम लताने केले,’ असा त्यांचा गौरव प्रत्यक्ष कुमार गंधर्वांनी केला होता.
अत्युच्च पदावर पोहोचूनही या थोर कलावतीने विनम्रपणा सोडला नाही. आपली सामाजिक जबाबदारीही ती विसरली नाही. पुण्याचे ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालय’ हे त्याचेच दयोतक आहे. या एवढ्या यशस्वी जीवनातही शास्त्रीय संगीताला आणि आपल्या इतर छंदांना आपण पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, ही खंत दीदींना होती.
खरंच त्या होत्या असं म्हणनं अत्यंत अवघड वाटते आहे. ६ फेब्रुवारी २०२२ मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्या गेल्या असं न म्हणता त्या त्यांच्या दैवी आवाजाने आजही आपल्यात आहेत असे म्हणावे वाटते.अशी ही गानकोकिळा भारतवर्षाचे अक्षय वैभव आहेच आहे.ती परमेश्वराने निर्माण केलेली साधी सात्विक दैवी सूर लाभलेली गानकोकीळा होती.तिला कोणतीही उपमा कमीच पडते.तिला कोटी कोटी प्रणाम!!
तिच्याच गाण्यातल्या ओळी आठवतात,
रहे ना रहे हम,मेहका करेंगे।
बनके कली,बनके सबा।
बागे वफा में।।
Comments
Post a Comment