रजनी


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी




पश्चिमेचा आला गार वारा,

घेऊनी खगांचा थवा सावळा,

रंग होती गडद खास ते,

अवकाशीच्या पटावरचे


संध्येच्या हाती हात देऊनी,

आली रजनी सुखद शांत ती,

माळूनी गजरा नक्षत्रांचा,

चंद्र रेखूनी भालावरती


तीने चंदेरी घालूनी पैंजण,

हाती गोंदले चांदण सुंदर,

स्वैर अलगद टाकूनी पाऊल,

जणू मिटले स्वर्गधरेचे अंतर


ती शोडष नवयुवती सुंदर,

मधुचंद्रही लाजे क्षणभर,

पाहूनी लावण्य तिचे अलौकीक,

वायू पोहोचवी सुगंध दरवळ


ती अस्मानी परी लाजरी,

करूनी श्रृंगार नववधूपरी,

सहज हालवी बटा हलके,

डहूळले पाणी डोहावरचे


सुगंधी रात्रीत त्या घडते,

स्वप्न अनोखे युगुलांचे ते,

प्रेम करूनी अती दंगले,

रजनीच्या भव्य महाली ते


कृष्ण रंगी रजनीचा पसारा,

चोहिकडे दरवळ तो रातराणीचा,

मुक्त केश कलापा वरती,

दिसे चांदणी चमचमणारी


दिशा सभोवती घालूनी पिंगा,

चंद्र दुधी समुद्रास खेळवी,

जमुनी सारे ग्रहगोल देखणे,

करिती क्रिडा स्वैर सुखाने


अलगद दस्तक प्राची देई,

अरूणाचा निरोप घेऊनी,

झरझर तिच्या चेहऱ्यावरती,

फुले गुलाबी लाली साजिरी


अशा रितीने होते पहाट,

रजनी लाजूनी पळते दूर,

हलकेच पाऊल पडले मग ते,

उषाराणीची चाहूल लागते

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न