आजच्या स्त्रीला जिजाऊ होण्याची गरज आहे का?
लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी
हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवरायांच्या माता अर्थात भारताच्या राष्ट्रमाता जिजाऊ या प्रेरणेचा जिवंत आणि सार्वकालिक स्रोत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवबाला जन्म दिला आणि दोघांनी मिळून स्वातंत्र्याला जन्म दिला.. त्यांच्यामुळे स्वातंत्र्याची धगधगती मशाल नव्हे तर यज्ञकुंड अवघ्या हिंदुस्तानात पेटले.
राष्ट्रमाता जिजाऊंनी त्याकाळच्या शतकानुशतके परकीय आक्रमकांच्या विरुद्ध स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटवण्यासाठी स्वतःच्या मुलाला नव्हे… नव्हे संपूर्ण हिंदुस्तानला प्रेरणा दिली. आज आपल्याला वाटते कि छत्रपती शिवराय पुन्हा जन्माला यावेत. तर मला असे वाटते की यासाठी पहिल्यांदा राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला येणे गरजेचे आहे.
राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिवनेरीवर जन्म दिला. शिवरायांच्या कर्तृत्वाला फुलवण्यासाठी स्वातंत्र्याचे संस्कार त्यांच्यावर केले. सतराव्या शतकात सर्वत्र गुलामगिरीची अमंगळ दुर्गंधी येत असताना स्वातंत्र्याचा सुगंध निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवरायांना खऱ्या अर्थाने गुरुमंत्र दिला. शिवरायांच्या त्या केवळ माताच नव्हत्या तर गुरुही होत्या. शिवरायांना त्यांनी प्रत्येक प्रकारचे शिक्षण घरातच दिले. आज आपण आपल्या मुलांना एखादा चाकू हातात घेतला; तर त्याला लागेल म्हणून कळवळतो. परंतु त्याच वयामध्ये शिवबाच्या हाती ढाल, तलवार, दांडपट्टा अशी शस्त्रे दिली आणि त्यात प्रवीण केले.
छत्रपती शिवराय म्हणजे जिजाऊंच्या विचारांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार होता. केवळ शिवरायांना नव्हे तर त्या काळातील स्वातंत्र्यासाठी म्हणजे स्वराज्यासाठी तळमळणार्या प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषाला जिजाऊंनी प्रेरणा देऊन उभे केले. मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, सिद्दी,इंग्रज अशा परकीय आक्रमकांच्या विरुद्ध महाराष्ट्र उभा ठाकला. तो केवळ जिजाऊंच्या प्रेरणेनेच त्यामुळे मला असे म्हणावे वाटते कि जिजाऊ या खऱ्या अर्थाने प्रेरणेचा जिवंत स्त्रोत आहेत.
एतद्देशीयांचे हिंदवी स्वराज्य निर्माण करणे ही त्या काळातली अतिशय कठीण आणि खडतर गोष्ट होती. जिथे पावलोपावली मृत्यूचा सामना होण्याची शक्यता होती अशा ठिकाणी आपल्या मुलाला त्यांनी उभे केले. अफजलखानाच्या संकटावर मात करताना जिजाऊंनी थोरले महाराज शहाजी राजे आणि छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना अफजलखानाने दिलेल्या त्रासाचा बदला घेण्यासाठी प्रेरित केले. शिवरायांच्या बरोबर लढणाऱ्या बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, सुभेदार तानाजी, कोंडाजी फर्जंद अशा हजारो लोकांना सुद्धा त्यांनी प्रेरणा दिली. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार मोठ्या धीरोदात्तपणे अखंड सुरू ठेवला. केवळ शिवरायांना नाही तर छत्रपती संभाजी महाराजानाही उत्तम असे संस्कार देऊन स्वराज्याचा युवराज कसा असावा याचा वस्तुपाठ दिला. छत्रपती शिवरायांच्या निर्वाणानंतर स्वराज्याचा लढा पराभूत न होता धीरोदात्तपणे संभाजीराजे लढले ते जिजाऊंच्या प्रेरणेनेच. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या वीर मरणानंतर स्वराज्यातील प्रत्येक माणूस या भूमीमध्ये औरंग्याच्या आक्रमणाविरुद्ध जोरकसपणे लढला तो जिजाऊंच्या प्रेरणेमुळेच.
जिजाऊंनी आपल्याला शिकवलेल्या गोष्ट ज्या आजच्या स्त्रीने आपल्या मुलांना व स्वतःला घडवतांना लक्षात ठेवाव्या-
स्वाभिमानाने उभे कसे राहावे? परक्यांशी कसे लढावे? स्वातंत्र्याचे यज्ञकुंड पेटते कसे ठेवावे? शत्रूशी लढताना कोणती आणि कशी नीती वापरावी? जीवनामध्ये आलेल्या संकटांचा सामना कसा करावा? आपण स्री असलो तरी ताठ मानेने कसे जगावे? स्वराज्यातील प्रत्येक माणसाला स्वातंत्र्याची फळे कशी मिळतील आणि तो सुखाने समाधानाने कसा राहील याची काळजी कशी घ्यावी?
जिजाऊंची न्यायनिष्ठा,ज्वलंत हिंदूत्वाची भूमिका, शिस्तप्रियता,स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, राम व कृष्णांविषयी असलेली प्रगाढ निष्ठा व भक्ती, समाजाविषयी आंतरीक कळवळा, अन्यायाविरूद्ध लढण्याची वृत्ती, बालशिवाजीवर केलेले डोळस प्रेम, धडाडी, स्त्री असुनही जगण्यातले तेज व शौर्य ह्या अतिशय दुर्मिळ गुणांमुळे त्या स्त्रीयांसाठी कायमच प्रेरणास्थान आहेत.आजच्या जगात ह्या सर्व गुणांची स्त्रीयांना प्रचंड आवश्यकता आहे.आजच्या काळात घडणारे गुन्हे, हिंसाचार,बलात्कार या सर्वांवर जिजाऊंची विचारधारा व शिकवण फार महत्वाची आहे.तसेच ती प्रभावीही आहे.
धन्य तो शिवाजी व धन्य त्याला घडवणारी ती माय जिजाऊ!!
Comments
Post a Comment