#_जागर_आदिशक्तिचा

लेखिका- सौ.स्वरूपा कुलकर्णी


विषय क्र.१- स्त्री जन्म एक आव्हान


      ' स्त्री जन्मा तुझी कहाणी,

       ह्रदयी पान्हा नयनी पाणी....'


     ह्या गीतात स्त्रीची मनोव्यथाच व्यक्त झालीये..किती खरीये ती...आजच्या आधुनिक काळातही ही व्यथा लागू पडते हेच दुर्दैव..

     मला असं वाटतं भारतासारख्या सुसंस्कृत विचारधारा व संस्कृती असणाऱ्या देशातही स्त्री ही कधी देवी म्हणून पुजली जाते तर कधी 'पायीची वहाण पायी बरी' म्हणून दुर्लक्षली जाते.रामायण काळ असो की आजचा पुढारलेला काळ असो स्त्रीची विटंबना ठरलेलीच..कायम पुरूषांच्या पुरूषी अहंकाराला ती बळी पडते..

    रामायणात आपण पहातो देवी सीतेसारखी अत्यंत पतिव्रता स्त्री पण तिही रावणाकडे राहिली म्हणून अग्निपरिक्षा देत रहाते..त्या अग्निपरिक्षा देऊन देऊन कंटाळून गेलेली ती अखेर धरणी दुभंगून त्यात सामावून जाते..तिचा झालेला हा मानसिक छळ तसेच तिची ही घनघोर विटंबना ह्रदय कासाविस करून जाते..तिची कोणतीच चूक नसतांनाही अग्निपरिक्षा तिने दिली व स्वतः राजा रामही यात हस्तक्षेप करत नाही हे अतिशय दुःखद चित्रण आपण रामायणात पहातो..

      याच रामायणात अहिल्येसारखी गौतम ऋषींची भार्या इंद्राच्या कामेच्छू वृत्तीला बळी पडल्यामूळे गौतम ऋषींच्या शापात दगड बनते..ती परम पतिव्रता असूनही अशा पुरूषी विळख्यात अडकते..ही अतिशय शोकांतिका आहे.

    द्रौपदी सारखी पाच पांडवांची पत्नी परम पतिव्रता स्त्री असतांनाही आपल्याच पतींसमोर  वस्त्रहरणासारख्या घनघोर विटंबनेला सामोरी जाते..किती दुःखद व दुर्दैवी कहाणी!  

      अशा अनेक कथांमधून स्त्री ही पुर्वीही आव्हांनांना तोंड देत होती व आजही देत आहे हे समजते.ती आजही मुलगी, आई,बायको,सून,बहिण,सासू या विविध नात्यात भरडली जातांना आपण पहातो..तिचं वयात येणं कायम धोक्याचच वाटतं..तिने केलेली धाडसी कृत्ये समाज पटकन मान्य करत नाही..तीला  नोकरीत मिळालेली प्रमोशन पुरूषी अहंकाराला डिवचतात..ती कितीही पुरूषांच्या खांद्याला खांदा भिडवून लढो पण पगारात ती मागेच ठेवली जाते..तिला गर्भारपणातही रजा मिळायला अडचणी येतात..लग्नाच्या वेळीही तिला अनेक बाबतीत संघर्ष करावा लागतो..तिच्या जन्मापासूनच ती मुलगी आहे हे तिच्यावर बिंबवलं जातं व तिच्या भावापेक्षा तिला हक्क व अधिकारांच्या बाबतीत कायम डावं स्थानंच दिलं जातं...ती अभ्यासात कितीही पुढे असो ती भावाच्या तुलनेत मागेच ठेवली जाते..लग्न झाल्यावरही नवरा म्हणेल ते, सासर ठरवेल तेच तीचे आयुष्य असते..उतारवयातही मुलगा ठेवेल तसं तिला जगणं भाग पडतं...ही वस्तुस्थीती आजही या २१ व्या शतकातही आपण बऱ्याच ठिकाणी पहातो..ही पुरूषी आव्हानं एका स्त्रीच्या मानसिक, भावनिक, शारिरीक विकासात प्रचंड अडथळे आणतात व फुलणाऱ्या त्या कोमल कळीला अनेक जखमा करतात.तीची वाढ खूंटते व ती हतबल अवस्थेतच जीवन कंठत रहाते..केवळ मृत्यू येत नाही म्हणून जगणाऱ्या अनेक बलात्कारीत स्त्रीया आक्रोश करत मृत्युला कवटाळतात..

      ही जगण्याची आव्हानं स्त्रीला जोपर्यंत जाचत रहातील तोपर्यंत कोणताही समाज किंवा राष्ट्र विकसित म्हणवलं जाऊ शकत नाही..समाजात स्त्रीचं स्थान महत्वाचं व आदराचंच आहे हे समाजाने मान्य केलं तरच तीचा संघर्ष थांबू शकतो..यासाठी स्त्रीयांमध्ये जागरूकता हवी व पुरूषही आपल्या आईच्या वात्सल्याची जाणीव ठेऊन पुढे यायला हवा..तरच तिची विटंबना थांबून स्त्रीशक्तीचा जागर होईल व ही मुळमायेची अंशात्मक शक्ती उत्सवासारखे तिचे आयुष्य जगू शकेल..

   या शारदिय नवरात्रात हाच जागर होणे महत्वाचे आहे,म्हणूनच म्हणावे वाटते,

           नारीशक्तीचा विजय असो..आदिशक्तीचा विजय असो...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न