विषय-पितृपक्ष समज गैरसमज
✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी
आपली संस्कृती श्रद्धेला,कृतज्ञतेला खूप महत्वाचे स्थान देते.कारण, मानवाचे जगणे हे सार्थ ठरवण्यात ही श्रद्धा व कृतज्ञता खूप महत्वाचा वाटा उचलते.मनुष्य प्राणी हा नुसता प्राणी नसून मानव्य जपणारा,संस्कृती जपणारा जीव आहे,हे त्याचे वेगळेपण आहे.माणसाला जगतांना त्याच्या अनेक पिढ्या जी मोलाची भर या जगात घालत असतात ती शब्दांनी व्यक्त करता येणे केवळ अशक्य.मानवी उत्कांती म्हणजेच पिढ्यान पिढ्या घडत आलेले सकारात्मक बदल.मग ते रहाणीमान असो की जीवनशैली.बदल हे सकारात्मक घडले की समाज सुखी होण्याकडे प्रवास करतो.हे आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी व अभ्यासाद्वारे समजू शकतो.ही भौतिक जगण्याची लढाई सुकर होते ती पुर्वजांनी केलेल्या अनेक अभ्यासांमुळे,वैज्ञानिक शोधांमुळे त्यांच्या अध्यात्मिक संशोधनामुळे.आपण अनुभवत असलेले हे सकारात्मक बदल अनेक पुर्वजांच्या कठोर मेहनत,शिस्त,परिश्रम,त्यांच्यातिल अभ्यासू वृत्ती,गुणवत्ता याचा परिपाक आहे.हे समजून घेतांना खरंच आपण या पितृऋणातून कधीतरी मोकळे होऊ का? खचितच नाही हे उत्तर येईल.हे नैसर्गिक सत्य आहे.म्हणूनच आपला उदात्त धर्म आपल्याला देवाइतकच पितृऋण मानायला सांगतो.किती उदार व विशाल दृष्टीकोन यात सामावलाय हे नीट अभ्यास केला तर लक्षात येईल.आपले पुर्वज खरोखर अत्यंत विद्वान होते म्हणूनच ही संकल्पना उदयास आली व पिढ्यान पिढ्या पाळली जाते.
हे श्राद्धकर्म म्हणजे घरातील मृत व्यक्तिप्रित्यर्थ केला जाणारा कुलाचारच आहे.मृत व्यक्तीला सद्गती मिळावी हा महत्वाचा विचार त्यामागे आहे.गीतेतही ह्याबद्दल माहीती आहेच.पितरांना सद्गती मिळाली की ते पुढिल पिढ्यांना आशिर्वाद देतात व त्या पिढ्या वैयक्तिक आयुष्यात व समाजजिवनातही यशस्वी होतांना दिसतात.जेथे श्राद्धकर्म होत नाही तेथे पितरांचा शाप लागतो व पिढ्यान पिढ्या दुःखी आयुष्य जगतात.यामागचे कारण म्हणजे पितृऋण न मानणारी पिढी पितरांना सद्गती देऊ शकत नाही व आत्मे तळतळत राहून घराणी लयास जातात.हे आपल्या धर्मात सांगितले आहे.यामागिल विचार सहजस्पष्टच आहे की आपले कर्तव्य केवळ पोटापुरते पाहून स्वार्थी जीवन जगणे नसून पितरांनी केलेल्या कष्टावर आपण गुजराण करत असतो ते ऋण मानणे ही महत्वाची गोष्ट त्यामागे आहे.
याबाबत कावळा व तत्सम जे गैरसमज पसरलेले आहेत ती फार मोठी धूळफेक व बौद्धिक दिवाळखोरी आहे.आपला सनातन हिंदू धर्म ज्या शास्त्रीय व अध्यात्मिक बैठकीवर अचल आहे त्यांनी पिंडदान,कावळा या गोष्टींना सडेतोड उत्तर दिली आहेत.कावळा हा एकाक्ष म्हणूनही ओळखला जात.त्याला मृत झालेल्या व्यक्तीचा आत्मा दिसत असल्यामुळे त्यालाच पिंड ग्रहण करण्याचा मान आहे.हा जीव नैसर्गिक दृष्ट्या अशाच अन्नावर जगतो.त्याला पंचपक्वान्न देऊन उपयोग नाही.श्राद्धात पंडदान करतात कारण पितरांचे आत्मे ते सुक्ष्म रूपात येऊन ते ग्रहण करतात व शांत होतात.
श्राद्ध ह्याचा मुळी अर्थच श्रद्धेने केलं जातं ते कर्म.म्हणूनच प्रत्येकाने हा विधी जाणीवपुर्वक करावा व आपल्या पितरांना शांती द्यावी.हीच आपली त्यांना आदरांजली.पितृस्मरण हे आपले कर्तव्य समजून दरवर्षी पार पाडावे म्हणजे आपण पितृऋणातून मुक्त होऊ.
Comments
Post a Comment