स्त्री शक्ती व समाज

   परमेश्वराने जग निर्माण केलं ते मुळमायेपासून.म्हणजे पुरूष व प्रकृती हेच प्रथम पुरूष व स्त्री.त्यांच्या संयोगातून हे ब्रह्मांड निर्माण झालं.निसर्गत:च ते दोघेही मानव योनीतही परस्पर पुरकच राहिले.जग कितीही बदलले तरी ही परमेश्वराची जोडी अखंडपणे कार्य करते आहे.हा पुरूष प्रकृतीचा खेळच जगात अनेक घडामोडी करत असतो.मानव योनीत नर व मादी हा इतर प्राणीवर्गासारखा भेद नसून तो पुरूष व स्त्री असा  आहे.म्हणजेच मानवाला जन्मतःच मन व बुद्धी मिळालेली असल्यामुळे ते दोघेही इतर प्राण्यांपेक्षा निश्चितच वेगळे व असामान्य आहेत.

     प्राचीनकाळी मानवाने निसर्गशक्तीलाच दैवत मानले. शेतीचा शोध हा मानवीजीवनातील सर्वांत क्रांतिकारक शोध. शेतीमुळे माणसाचे भटके जीवन स्थिर झाले आणि धरणीच्या ठिकाणी असलेल्या सुजलाम सुफलाम या गुणांची ओळख झाली. तेव्हापासून मातृदेवतेच्या पूजेचे महत्त्व वाढले. स्त्रीकडेही बीजधारणेचा गुण असल्यामुळे तिलाही आदिशक्ती मानून तिच्या मूर्ती बनवून तिला मखरात बसवून तिची पूजा केली जाऊ लागली. कालांतराने पुरुषसत्ताक व्यवस्था वाढत गेली आणि एकीकडे स्त्रीची पूजा, तर दुसरीकडे तिचा छळ असा दुटप्पीपणाही वाढत गेला. स्त्रीचे कितीही शोषण झाले असले, तरी तिच्यामुळे आपल्याकडील कुटुंबव्यवस्था टिकून आहे.

कुटुंबव्यवस्था हा आपल्याकडील महत्त्वाचा सामाजिक घटक आहे आणि त्याबद्दल अनेक जण अभिमानाने बोलतही असतात. या व्यवस्थेचे फायदे-तोटे आहेत; परंतु या व्यवस्थेमुळे समाजाचा डोलारा उभा आहे, हे नाकारता येणार नाही. चंगळवादी संस्कृतीमुळे या व्यवस्थेला धक्के जरूर बसत आहेत; परंतु त्याची पाळेमुळे घट्ट असल्याने तडे गेलेले नाहीत. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते खरे; परंतु संसारथाचा तोल सावरला जातो, तो स्त्रीमुळेच. पुरुषसत्तेने स्त्रीला कायम कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेवले.

    आताशा कुठे तिला कायद्याने हक्क मिळू लागले आहेत. त्या आधारे ती आपली प्रगती करीत आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण पुरुषांपेक्षा कमी नाही हे ती आज सिद्ध करीत आहे. स्त्री म्हणजे त्यागाची मूर्ती, परमेश्वराचे रूपच जणू. स्त्री म्हणजे सहनशीलतेचा कळस. संसारात तिचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवते. त‌ी नसेल तर कुटुंब कोमेजते. रात्रंदिवस कष्ट करून कुटुंबाचा डोलारा सांभाळते; पण आपल्या मुलांबाळांना त्याची झळ पोहोचू देत नाही. बहिणाबाई चौधरी म्हणतात,


अरे संसार संसार । नाही रडणं कुडनं ।


येड्या गळ्यातला हार । म्हणू नको रे लोढणं ।


संसार कसाही असला, तरी गळ्यातला हार मानून त्याचा स्वीकार करते. आज ती चुल व मूल सांभाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या हातातून हळूहळू सत्ता जात आहे, या कल्पनेनेच अनेक पुरुष पछाडलेले आहेत. स्त्री बिचारी सर्व आघाड्यांवर लढत आहे. असे असले, तरी पुरुषसत्ताक समाजाची मानसिकता अद्याप बदललेली नाही. आजही मुलींच्या जन्माचे मनापासून स्वागत होतेच असे नाही. स्त्री भ्रूण हत्येला कायद्याने लगाम घातला असला, तरी तंत्रज्ञानाचा लाभ उठवित कळ्यांना गर्भातच खुडण्याचा प्रकार लपून-छपून करणारे आहेतच. वाढत्या चंगळवादामुळे स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहणारेही आहेत. चित्रपटांतूनही अनेकदा तशाच प्रकारे चित्रण केले जाते. बलात्काराच्या वाढत्या घटना हीच बाब अधोरेखित करतात. मात्र, स्त्रियांच्या हक्कांबाबत जागरुकता येत आहे. अनेक पुरुष घरी कामात वाटा उचलत आहेत. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देत आहेत. त्यांना करिअर करण्यास प्रोत्साहन देत आहेत.


गेल्या शतकात स्त्री हक्कांबाबत झालेल्या चळवळी, स्त्रीवादाचा स्वतंत्र अभ्यास, त्याबाबतचा जागर या सर्वांचा हा व्यापक परिणाम आहे. आठ मार्चला साजरा होणारा जागतिक महिला दिन हेही याचेच फलित आहे. अलीकडच्या काळात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांचे हक्क, त्यांची कर्तबगारी, त्यांनी मिळविलेले यश या साऱ्यांच्या कथा या दिवशी सांगितल्या जातात. महिला दिनाच्या निमित्ताने ते व्हायलाही हरकत नाही. एक यशस्वी स्त्री हेच एका पुढारलेल्या कुटूंबाचं द्योतक आहे.तसेच समाजाचही!!

    



Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न