स्वागत दिपावलीचे..
©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी
मंडळी, काय म्हणता? झाली का दिवाळीची तयारी? आवराआवरी झाली का? आणि हो फराळाची तयारी झाली का? नक्कीच झाली असणार! हो ना?
संपूर्ण वर्षभरातील सर्वांचा सर्वात आवडता व मोठा सण म्हणजे दिवाळी. मग उत्सवात काही कमी नको म्हणून जोरदार तयारी होते. काहींची कपड्यांची शॉपिंग, मग ऑनलाईन नाहितर ऑफलाईन.. त्यात प्रत्यक्ष खरेदीचा आनंद लुटणारी मंडळी रसिकच म्हणा, सहसा ती गंडवली जात नाहीत😃, जुना आकाशकंदिल धूळ झटकून नव्यासारखा होस्तर फडके मारून साफ झालेला असतो😄, किंवा जुना फारच खराब झालाय म्हणून नव्याचे आगमन, त्यावर घरच्यांमध्ये बरीच चर्चा😀, दिवाळी आहे म्हणून नविन वस्तुंचे घरात आगमन 😍, यावर्षी साडी नको म्हणता म्हणता २-३ साड्यांची खरेदी 😄, मुलांमध्ये नविन गॅजेटसाठी बाबांना मस्का लावून गळ घालणे 😄, मुली व गृहिणींचे रांगोळ्यांचे विविध डिझाईन्स मनात घोळवून ठेवणे, काही घरात नविन कार खरेदी किंवा मोठ्या वस्तूंची खरेदी, नविन प्रॉपर्टीची खरेदी अशा अनेकानेक गोष्टी म्हणजे दिवाळी!
किती किती लक्ष दिवे स्वतः जळून पहाणाऱ्याला आनंद देतात , नाही?. हे दिवे पहाणाऱ्याच्या मनातही लक्ष लक्ष दिप उजळवतात आणि दिवाळी सजवतात. विविध रंग रांगोळीचे मनाला हर्ष उल्हास देतात. घरादारावरची तोरणे मन प्रसन्न करतात. दिवाळी खरोखर तन मनावरील धूळ झटकते. दशदिशा प्रकाशाने उजळून टाकते. दिव्यांची आरास व तितक्याच लक्ष दिव्यांना डोळ्यातून व्यक्त करणारी गृहलक्ष्मी, लहान मुले, कर्ती पुरूष माणसे,तरूण युवक युवती आजोबा आजी हे खरं दिवाळीतलं वैभव व चैतन्य! तनानेच नाही तर मनानेही साजरी होते ती दिवाळी! जगणं सार्थकी लागल्याचे क्षण म्हणजे एकत्र कुटूंबाने आनंदात साजरी केलेली दिवाळी. जगण्यासाठी नवी उर्जा व प्रेरणा देणारा तो प्रियजनांचा सहवास किती आश्वासक! जणू लक्ष्मीही आपल्या घरादारातून सहज वावरत असावी. प्रेमाची दिवाळी साजरी करायला हक्काची, जिवाभावाची नाती लागतात. तोच खरा आनंद व तीच खरी समाधानाची दिवाळी.
काय मग मंडळी, तुम्हीही साजरी करताय ना?आनंदाची दिवाळी?
Comments
Post a Comment