नमस्कार, 

प्रिय शब्दसखी

सौ. स्वरूपा सुबोध कुलकर्णी 

"ती अशी घडली "


 साधारण चार वर्षांपूर्वी नवरात्रौत्सवात माझ्या शेजारी एक उंच, गोरीपान, सडपातळ, सुंदर, हसतमुख व्यक्तिमत्व असलेली एक स्त्री येऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज झळकत होते,गोऱ्यापान देहावर गडद रंगाची साडी खूप शोभून दिसत होती. चेहऱ्यावरचा हलकासा मेकअप तिच्या शालिनतेची साक्ष देत होता. सगळ्यांशी गोड आणि शांतपणे बोलण्याने तिचे पावित्र्य आणि निर्मळ मन डोकावताना दिसत होते. तिथे आमची ओळख झाली. हीच ती स्वरूपा कुलकर्णी.

      अतिशय संस्कारक्षम आणि अध्यात्माचा गाढा पगडा असलेल्या दीक्षित कुटुंबात कुमारी स्वरूपाचा जन्म झाला. आणि" पहिली बेटी धनाची पेटी "ह्या उक्तीप्रमाणे घरात लक्ष्मीची पाऊले उमटली. आजोबांच्या शिकवणुकीतून स्वरूपा वाढायला लागली.

     तिचा जन्मछत्रपती संभाजीनगरचा,माहूरची "रेणुकामाता" ही त्यांच्या घरची कुलदेवता .म्हणून रेणुका प्रदीप दीक्षित.तिच्या अगोदर तिच्या आईला एक लहान मुल होऊन ते पंधरा दिवसातंच वारलं...न्युमोनियामुळे,

 आणि  त्यानंतर स्वरूपाचा जन्म झाला.त्यामुळे घरात सगळ्यांची लाडकी. घरात नवसाने झालेल्या बाळाचा काय थाट असतो तो तिने पुरेपूर अनुभवलाय. लहानपणापासूनच  आजोबा,

आई,बाबा, तिचा लहान भाऊ यांच्या लाडाकोडात वाढलेली ती  खूपच भाग्यवान ठरली..याचे प्रमुख  कारण होते स्वरूपाचे आजोबा! ते त्याच्या दीक्षित घराण्याचे गुरू होते.त्यांनी गुळवणीकर महाराजांची दिक्षा घेतली होती.ते अत्यंत करारी,बुद्धिमान,तापट तरीही प्रेमळ,धार्मिक व सात्विक वृत्तीचे होते.ती खूप भाग्यशाली आहे कारण खूप वर्ष आजोबांचा सहवास तिला लाभला.तशी आज्जी फार पुर्वीच वारल्यामुळे तीला मात्र तिने फोटोतच पाहिलं.आजोबांची गुरूउपासना, संध्या, जप,पुजा वयाच्या नव्वदीपर्यंत अखंडपणे चालू राहिली.ते अतिशय कडक शिस्तिचे व वक्तशिर स्वभावाचे होते..तिला त्यांच्यामुळे लाभलेले धार्मिकतेचे संस्कार जन्मोजन्म पुरतिल इतके सखोल आहेत..तिचे आई व बाबाही त्यांच्याच तालमित पक्के झालेले त्यामुळे त्यांचाही धार्मिकतेकडे विलक्षण ओढा आहे..ते शुद्धशाकाहारी,सात्विक,निर्लोभी,उदार,विलक्षण प्रेमळ असे संत वृत्तीचे होते.त्यांच्या परोपकारी,समोरच्यावर सहज प्रेम करण्याच्या वृत्तीला ती खूप मोठं मानते..कारण ते फार दुर्मिळ आहे.आईबद्दल बोलताना ती म्हणते,आईने घरातल्या कामवाल्या बाईलाही कधी उपाशी ठेवलं नाही व येणाऱ्या जाणाऱ्यांना कायम प्रेम देत रहाणं तिनं कधी थांबवलं नाही.तिचे बाबा स्टेट बैंकेतून सर्विस करून रिटायर झाले पण आयुष्यात पैसा म्हणजे विनाकारण उधळायची गोष्ट असे कधी त्यांनी शिकवले नाही.कायम अंथरूण पाहून पाय पसरावे,आपले ते इतरांनाही द्यावे,अतिलोभ टाळावा,फुकट कोणाचे घेऊ नये,खोटे कधी बोलू नये,सदासर्वदा देवाची आठवण ठेवावी,करता करविता तोच आहे ही शिकवण ते शब्दातुनच नव्हे तर आचरणातुनही अधिक ठळकपणे त्या दोन्ही भावंडांवर करत गेले.

         स्वरूपा सुरूवातीला शाळेत  बाईंच्या भितीने जायचे टाळू लागली .पण म्हणून तिला घरात कोणी मार दिला नाही की कानउघडणी केली नाही.उलट वेळोवेळी तिला त्या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर यावं म्हणून प्रयत्न केले गेले.तिला कुठेही प्रेशर आणून शाळेत गेलंच पाहीजे हा हट्ट केला नाही.तिची काळजी इतकी होती की बाईंना वेळोवेळी सांगायचे की ती हुशार आहे घरी अभ्यासही करते पण शाळेत यायला घाबरते..त्यानंतर दुसरीच्या बाई बदलल्या व  बेलसरे बाई आल्या.त्या आवडत्या झाल्यामुळे तिचे शिक्षण सुरळीत झाले व ती पुढे व्यवस्थित शाळेत रूळली .आधिपासूनच अभ्यासात हुशार होती .पण तिची शरिरप्रकृती नाजुक होती..आई बाबा,आजोबांना फार चिंता असायची हीचं पुढे कसं होणार..तिने जेवायलाही फार त्रास दिलाय.तिची तब्येत नाजूक .तशी ती हडकूळीच पण पुढे कॉलेजला गेल्यानंतर तब्येत छान सुधारली.

     तीच्या संपुर्ण जडणघडणीत ही शाळा नावाची संस्था फार सखोल परिणाम करून गेली..कुलकर्णी बाई,देवपाठक बाई,मुळे बाई आणि इतरही अनेक शिक्षिका मनावर चांगले संस्कार कसे घडतील याबाबतीत जागरूक राहिल्या.तिने शाळेत असतांना अनेक स्पर्धा गाजविल्या.बक्षिसं मिळवली.शाळेत स्कॉलर म्हणून नाव कमवले..                         स्वरूपा चित्रकला,निबंध,वक्तृत्व,

रांगोळी,हस्तकला,यात आघाडीवर होती.वर्गात मॉनिटर ही होती...पहिला-दुसरा क्रमांकही मिळवला..तीच्या अभ्यासाचे ,बक्षिसांचे नातेवाईकांना,कॉलनीतल्या लोकांना,घरातल्यांना खूपच कौतुक होते.

              लहानपणीच घरपोच पुस्तकांची लायब्ररी असल्यामुळे वाचन भरपूर झाले जे आज होऊ शकत नाही याचे तिला फार वाईट वाटते..पुस्तके माणसाला चौफेर ज्ञान देतात..घडवतात.ती पुस्तकांना  गुरूच मानते.ती जे काही सुंदर लिखाण करू शकते ते या पुस्तकांचीच कृपा.

         स्वरूपा कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्यांदा तिथल्या मोकळ्या वातावरणाला संकोचली.नंतर मात्र रूळली .तिला मुलं व मुली एकत्र पहाण्याची कधी सवयच नव्हती कारण तीच शिक्षण कन्या शाळेत झालेलं.पण नंतर कॉलेज जिवनातील  ही मुक्तता तरीही अभ्यासातली शिस्त तिला हविहवीशी वाटली. तीच वागणं बोलणं मुलिंमध्ये मोकळं असलं तरी मुलांशी मात्र दोन हात लांबच..ती रंगरूपाने सुंदर असल्याने कॉलेजमध्ये मुलं मागे लागणे हा प्रकारही तिला अनुभवावा लागला ..पण नंतर थट्टा मस्करीत ती त्या मुलांना दुर्लक्ष करत गेली..

         ती सायन्स अर्थात विज्ञान शाखेची विद्यार्थिनी त्यामुळे अभ्यास खूप व मेहनतही..ती बारावी झाल्यावर त्याच सरस्वती भुवन महाविद्यालयात पुन्हा B.sc.computer साठी प्रवेश घेतला..स्वरूपा प्राध्यापकांची लाडकी विद्यार्थीनी बनली.कारण लेक्चर अटेन करणे,नोट्स काढणे,इतरांना मदत करणे या गोष्टींमुळे ती विद्यार्थीप्रिय व मैत्रीणींचीही आवडती झाली..तिला कॉलेजमध्या दुसऱ्या वर्षी "मिस एस.बी."ही स्पर्धा जिंकता आली. गायन,लेखन,परिक्षा,डिबेट अर्थात संवादातुन चर्चा,व्यक्तिगत मुलाखत या सर्व स्तरात सिलेक्ट होऊन लास्ट राउंडला जिंकली ..तीला माननीय गिरीशजी ओक या अभिनेत्याकडून बक्षिस व प्रमाणपत्र मिळाले..पुढे तिसऱ्या वर्षी ती कॉलेज कॅंपस इंटरव्ह्यु मधुन सिलेक्ट होऊन "स्टार माझा" या मराठी वाहिनीला जॉईन झाली , तेही मुंबईत..महालक्ष्मी रेसकोर्सरोडवर ऑफिस होतं.तिला सगळ्यांनीच खूप खूप शुभेच्छा दिल्या..तिने ४ महिने जॉब केला...खूप शिकायला मिळालं.ती एव्हडा कमी कालावधीत तिथे राहिली ,पण सगळं जग जिंकल्यासारखं वाटलं.तिला स्वतःविषयी वेगळाच आत्मविश्वास वाटला..त्या क्षणापासुनच तिथल्या वातावरणात ती समरसून गेली व पुढचा प्रवास अतिशय थक्क करणारा घडला...राजिव खांडेकर सर,मिलींद खांडेकर सर,चंद्रशेखर सर या त्रयींना ती कधिच विसरू शकत नाही.ती त्या अनमोल अनुभवांसाठी देवाची कायम ऋणी आहे.असे ती बोलताना म्हणाली.

   नंतर आजारपणामुळे जॉब सोडावा लागला.नंतर औरंगाबादला एम एस्सी बायोटेक्नॉलॉजीला नंबर लागला.तीने एक वर्ष केलं. पण आजोबा जाण्याचा जबर धक्का बसला,ती कोलमडली.परिक्षा अभ्यास जमला नाही ती फेल झाली. पण हार नाही मानली पुढे जॉब अनेक ठिकाणी केले.स्वावलंबी रहाणे तिला नेहमीच आवडले.

      मग लग्न जमले हे सांगताना स्वरूपा भरभरून बोलत होती.तिचा श्री.सुबोध कुलकर्णींशी विवाह जमुन आला.सुबोध कुलकर्णीचा वाढदिवस २३ सप्टेंबरचा आणि स्वरूपाचा जन्म २३ सप्टेंबरची म्हणून दरवर्षी ते दोघे एकच केक कापत आले आहेत. वाढदिवसालाही व एनिव्हर्सरीलाही.जोडीदार देखील दिलदार व प्रेमळ स्वभावाचा मिळाला..सासू सासरे समजूतदार असे ती म्हणते.

त्यांचा व नातेवाईकांचा सपोर्ट तर फार उत्साहवर्धक आहे..प्रेमळ सासर व आदर्श माहेर म्हणून हा जिवनप्रवास सुरळीत चालूये..अर्थातच तिची भगवंतावर नितांत श्रद्धा आहे.सद्गुरू,राम व कृष्ण खरे शिल्पकार आहेत,असे ती मानते.

        तीच्या या सुंदर जीवनप्रवासात देवानी तीच्या पदरात तीन वर्षांच्या अंतराने एकापाठोपाठ एक अस्मानीच्या गोड पऱ्या घातल्या आणि तिचे आयुष्य अधिकच सुंदर झाले.मुलींना घडवण्याचा अनुभव विचारल्यावर ती म्हणते,

 आजच्या काळातील पालकांना आवडणारी व प्रिय गोष्ट म्हणजे तुम्हाला "मुलगी" असणे.पहिली "ओवी" जन्माला आली स्वरूपाचे मिस्टर जाम खूश झाले.अख्ख्या हॉस्पिटलमध्ये जिलबी वाटली.ओवी जशी जन्मली तेंव्हा फक्त १ सेंकड रडली असेल..आणि दुसऱ्याच क्षणाला आपले मोठ्ठे मोठ्ठे काळेशार डोळे टूकटूक करत आजूबाजूचे जग पाहू लागली. पण ओवीला घडवतांना फार त्रास कधी झालाच नाही.ती मुळातच समजुतदार,अभ्यासू,शांत.

         दुसरी आर्या मात्र तब्येतीने कडक.तीची कधी काळजी नाही वाटली.तिला वाढवतांना एक गोष्ट कळाली की तिच्या अंगी बरेच मुलांचे गुण आहेत.अगदी कणखर.घरातली छोटी छोटी कामं ती वयाच्या तिसऱ्या वर्षापासून करते.

    मुली म्हणून दोघीही समजुतदार आहेत, ही पालक म्हणून तिला समाधानाची बाब वाटते.मुलींची छोटी मोठी आवड जपतांना त्यांनी सात्विक, पौष्टीक अन्न खावं हा आई म्हणून तिचा अट्टहास.त्या दोघींना बाहेरच्या फास्टफुडची सवय लागू नये याची ती आई म्हणून खूप काळजी घेते.त्याही बाहेरचं जास्त कधी मागत नाहीत.त्या अजुन लहान आहेत म्हणून प्रयोग यशस्वी होतात.पण भविष्यातही त्यांनी सकस अन्न खावं असं तिला मनोमन वाटतं.जगतांना येणाऱ्या चढउतारांसाठी त्यांना तयार करायचे आहे.त्यांचा अभ्यास घेतांना एक गोष्ट कळते ओवीची व आर्याची स्मरणशक्ती चांगली आहे. नटण्या-मुरडण्याची हौस दोघींमध्येही उतरलेली बघून मजा वाटते."ओवी ज्ञानेशाची आणि आर्या मोरोपंताची" ह्या उक्तीप्रमाणे स्वरूपाने आपल्या मुलींची नावे ठेवली आहेत.आर्या ५ वर्षांची व ओवी ८ वर्षांची...पण स्वभाव मात्र खूप वेगळे..तिला आई म्हणून ओवीतला समंजसपणा व आर्यातला नटखटपणा दोन्हीही सुखावतात.

 ह्या तीच्या बोलण्यावरून स्वरूपाचे सुजाण पालकत्व लक्षात येते.

              स्वरूपा मला भेटली ती 

शब्दसोहळ्याच्या लेखनामधून आणि 

तीची लेखनप्रतिभा, लाघवी बोलणे ह्यावर मी भाळले,आणि मैत्रीचा हात पुढे सरकवला. ती मला तीच्या लेखनातून उलगडत गेली.

     "शब्दसोहळा" च्या स्वलिखित महिलांच्या लेख वाचनाचा कार्यक्रम गुगल मीट द्वारे घेण्यात आला,त्यात मी सहभागी होते. तिथे तिचा स्मार्ट फोनचे महत्व सांगणारा लेख ऐकला. खरं सांगायचं तर ह्या स्मार्टफोनमुळे आणि त्यावर केलेल्या लिखाणामुळे तिची व माझी मैत्री बहरत गेली.

     शब्दसोहळा समूहाच्या मैत्रिणींच्या साथीने आपले लेखनकौशल्य वाढीस लागले. तुझ्या सुंदर आणि प्रतिभावान लेखनाने तुझे पैलू उलगडत गेले. अभिवाचनस्पर्धेतील सहभागाने एकमेकींच्या पुस्तक प्रेमाची आवड समजली. स्वरूपाचा वाचन अभ्यास खूप चांगला आहे. ते तीच्या लेखनातून स्पष्ट होते. मोबाईल वर केल्या जाणाऱ्या तांत्रिक गोष्टीचे व्यवस्थित आकलन होते.  निरनिराळ्या अभिवाचनाची तंत्र तिच्याकडे शिकायला मिळतात.  स्वरूपा खूप निर्मळ मनाची असल्यामुळे मनात कोणताही किंतु न आणता तिला मिळालेली बक्षिसे, तिला झालेल्या आनंदाबरोबर सगळ्यांशी share करतेस ना, ती तिची अदा मला आवडते.तिची कॉटन कपड्यांबद्दलची आवड,रंगाची निवड ही सुद्धा वाखाणण्या सारखी आहे, हेही मी जवळून अनुभवलं.तुझे वाचन आणि लेखन दोन्हीही खूप उत्कृष्ट आहे. "माझिया मना" ह्यातून तिची सोज्वळता झळकली. "मी कशी घडले" ह्या लेखनातून तिचा लग्नाआधीचा प्रवास सुखावून गेला. "पहिलं प्रेम" ह्यातून तिची रसिकता तरळली, "एका लग्नाची गोष्टीतून" तिची निरागसता आढळली. सौंदर्य ह्या विषयाच्या लेखनातून पावसाच्या सौंदर्यात चिंब भिजणारी स्वरूपा मला आवडली. जणू पाऊस आला की स्वरूपा आठवल्याशिवाय राहत नाही.हुरहूरमध्ये उमटलेले मातृत्वाचे वात्सल्य अवर्णनीय आहे.आर्या आणि ओवी भाग्यवान आहेत. साहित्यिकांच्या मैफिलित  शांता शेळकेंच्या रूपात आवाजाचे माधुर्य तरारले. सुंदर ते ध्यान ह्या अभंगाचे निरूपण ऐकताना खरंच सांगते, तुझ्यासाठी त्या ओळी म्हणाव्यासा वाटल्या "सुंदर ते ध्यान "जे मला मैत्रीण म्हणून लाभले."निर्माल्य" ही कथा हृदयाला स्पर्शून गेली. एवढ्यात तीच्याकडून लिहिल्या जात असलेल्या कविता अप्रतिम आहेत. तसेच लहानपणा पासूनच स्पर्धाबद्दलचे प्रेम उत्कृष्ट सादरीकरण आणि प्रथम श्रेणीतले यश वाखाणण्याजोगे आहे. आताच तीच्या कल्पनांच्या छटांनी गुंफलेले " मन मोगरा मोगरा" हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले.नवीन वाटचालीकडे पहिले पाऊल उचलले त्याबद्दल खूप शुभेच्छा. पुस्तकाचा प्रकाशनसोहळा 

समर्थभक्त मोहनबुवा रामदासी ह्यांच्याहस्ते झाला.दासबोध, मनोबोध, समर्थबोध ह्या परीक्षा देखील उत्कृष्ट श्रेणित पास झाली, ह्यातून तिची अभ्यासूवृत्ती स्पष्ट पणे दिसते.गावातील वेगवेगळ्या उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असतो. सध्या तिने 64 जणींना घेऊन भिशीचा समूह तयार केला आहे. त्याचे नियोजन ती उत्कृष्टपणे सांभाळते. 

        अशी प्रत्येक कौशल्य उत्तरोत्तर वाढत राहो, तुला भरपूर यश, कीर्ती, दीर्घायुष्य मिळो,ही देवापुढे विनम्र प्रार्थना करते 🙏🏻.

 तुझीच मैत्रीण -सौ नम्रता संजय कोरडे.😍

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न