पुस्तक परीक्षण 


सौ. नम्रता संजय कोरडे.



"मन मोगरा मोगरा "हे पुस्तक सौ.स्वरूपा कुलकर्णी ह्या नवोदित लेखिकेचे पहिले पुस्तक आहे, वाचता वाचता जसे पुढे पुढे वाचत जातो, जणू आपण रिकामी परडी घेऊन बागेत शिरतो आणि आणि एक एक फुल तोडून परडीत टाकत जातो त्याप्रमाणे एकानंतर एक लेख वाचत जाताना भासते. संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याकडे सुगंधी मोगऱ्याची परडी भरून असल्याची जाणीव होते. हे मी स्वतः वाचताना अनुभवले. लेखिकेने लेखनामधील वैविध्य जपले आहे.

ह्या पुस्तकाला अध्यात्मिकतेची सुंदर किनार आहे. भक्ती चा हळुवार स्पर्श आहे. राम,कृष्ण, सरस्वती, सद्गुरू ह्यांचे विविधतेने नटलेले वर्णन वाचताना मन भक्तीरसात बुडते. सात्विकतेने सुंदर रेखीव नक्षीकाम केल्यासारखे लेखन आहे. भावनांचा सूर अतिशय नाजूक रेशीम धाग्यांनी गुणगुणला गेला आहे. लेखनातील निर्मळ आणि शुद्ध उस्फुर्त विचार त्या पुस्तकातील प्रत्येक लेखाला सौंदर्य बहाल करते आहेअसे वाटते.लेखिकेच्या मनातील भावना तीचा स्वभाव ह्याचे दर्शन लेखनातून घडते. निसर्गातील पानांफुलांच्या वेगवेगळ्या छटा रेखाटताना निसर्गप्रेमी लेखिकेचे भाव जाणवतात.तसेच पहिली परी,ऋणानुबंध, माझिया मना, निर्माल्य ह्या लेखातून विषयांचे प्रगटिकारण वाचकांच्या मनात उतरविण्यास लेखिका यशस्वी झाल्याची जाणीव होते. म्हणूनच ह्या पुस्तकातील सुंदर लहान लहान लेख वाचताना नक्कीच आपले मन मोगऱ्यासारखे सुगंधित होते ह्यात मला शंका नाही. 

    लेखिकेचा हा लेखसंग्रह मनातील विविध भावनेच्या कल्पनांच्या छटांनी गुंफलेला" शब्द फुलांचा मोगरा" आहे. या लेखसंग्रहात एकूण चाळीस लेखांचा समावेश आहे. त्यात विविध प्रकारच्या कथा, प्रवास वर्णन, लघुकथा, अध्यात्मिक लेखनाचा अंतर्भाव  झालेला आहे." भेटी लागे जीवा " या लेखात वारी आणि भक्ती यांची सुरेख असे अद्वैत मांडले विशेष म्हणजे दोन्ही लेख वेगवेगळे आहे. एक वारीतील भक्ती भावाचे दर्शन घडवते.दुसरा समर्थांचा मनाच्या श्लोकातून भक्तीचे महत्त्व अधोरेखित करतो. मैत्री या छोट्या लेखात मैत्रीचे स्वरूप व भाव मानवी मनाच्या प्रत्येक टप्प्यावर कसे हे ओझरतपणे सांगून जातात तर "शब्दाविना कळले सारे "या कथेत मनाचा एक कोपरा कसा प्रकट होतो वा होत नाही या द्वंद्वातील अनुराधा व विनय या दोन व्यक्तींच्या आपणास खिळवत ठेवतात. तसेच" गुंतता हृदय हे" आणि "माझिया मना "या दोन लेखातून स्त्री हृदयातील भावना व्यवस्थित वाचकांच्या मनात उतरविण्यात लेखिका यशस्वी झाल्यात यात शंका नाही. 

         रक्षाबंधन, दिवाळी, कोकणातील अंगणाचे वर्णन, गणेश वंदना, सरस्वती वंदना, तिरुमला तिरुपतीचे प्रवास वर्णन यात सुद्धा लेखिकेचे तेवढ्याच ताकदीचे लेखन वाचकांना वाचायला मिळेल.

 भावभावना प्रेम भक्ती यांचा उत्कृष्ट मिलाफ या लेखसंग्रहात झालेला दिसतो. मन हे मोगऱ्याच्या रूपापेक्षा त्याच्या गंधावर अधिक भाळते. अगदी तसेच या पुस्तकातील विचार अनुभव या द्वारे मन उल्हासित होते.

 हे नातं अनोख व तरल मधूर आहे. लेखिकेच्या लेखन प्रतिभेने मनही सुगंधित व प्रसन्न होते. लेखिकेचा जगाकडे परमेश्वराकडे बघण्याचा स्वच्छ व निर्मळ दृष्टिकोन प्रतीत होतो. लेखातील विविधता मनस्पर्शी असून आपण कुठेही शब्दबंबाळ होत नाही हा  विश्वास या पुस्तकाने वृद्धिंगत होतो.

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न