विघ्नविनाशक मंगलमुर्ती मोरया🙏
©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा।।
संपूर्ण विश्वाचा निर्माता, विद्येचा अधिपती, बुद्धीची देवता, सर्व विघ्नांचे निवारण करणारा विघ्नेश, सर्व कलांची निर्मिती करणारा कलाधीश अशा मंगलमुर्ती गणेशाचे शुभागमन होत आहे. त्याच्या कृपेने समाजात चाललेल्या अपप्रवृत्ती नष्ट होवोत, सर्वत्र सुख, समाधान व शांती नांदो ही मोरया चरणी प्रार्थना🙏
हे संपूर्ण विश्व ज्या प्रणवातुन उत्पन्न झाले त्याचे साकाररूप म्हणजे श्री गणेश. हा गणेश समस्त ब्रह्मांड व्यापून उरलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनीही फार सुंदर शब्दात त्याचे यथोचित वर्णन केले आहे.
ओम् नमोजी आद्या।
वेदप्रतिपाद्या।
जय जय स्वसंवेद्या।
आत्मरूपा।।
ज्ञानेश्वरांनी हे आद्य तत्व, वेद जिथून निर्माण होतात ते स्थान, स्वसंवेद्य तत्वाला गणेश म्हणून पुजले आहे. ज्ञानेश्वरीची सुरूवातच येथुन होते. ज्ञानदेवांना स्पष्टच म्हणायचेय की हा गणेश जो आपण पार्थिव रूपात पुजतो तो मुळात परब्रह्म तत्वच आहे. त्याला ना आदी ना अंत. ते सदासर्वकाळ उपस्थित असणारे तत्व आहे. त्याला निर्गुण निराकार म्हणुनही संबोधतात नी सगुण साकार म्हणुनही पुजतात. जगाला ज्याचा उद्गम शोधता येत नाही त्या परमात्म तत्वालाच गणेश म्हणून संबोधतात.
संत रामदास स्वामीही मनाच्या श्लोकात
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा।
अशीच सुरूवात करतात.
ही एकाचवेळी सर्व गुणरहीत व सर्व गुणसंपन्न गजाननाची मुर्ती भक्तासाठी सर्व कला, विद्या व बुद्धीचे आश्रयस्थान आहे.
अशी ही सकल गुणमंडित गणेशाची मुर्ती भक्तांचे दुःख तत्काळ निवारण करते. निर्गुण निराकार परब्रह्माने स्वतःच्या स्पंदनातुन हे विश्व व माया निर्माण केली. ती सर्वगुणमयी माया नश्वर आहे. पंचभुते त्यातुनच प्रसवली.त्यापासून जग निर्माण झाले.या पृथ्वीतत्वापासुन १० दिवस पार्थिव गणेश पुजला जातो.ही मृत्तीकेची गणेश मुर्ती म्हणजे परब्रह्माला पुजण्याची अनोखी रीत चालत आली आहे. तो गुणातीत गणेश जणु भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी मातीतुन साकारतो व सर्व भक्तांना कृपाशिर्वाद देतो.
जसा हा विघ्नविनाशक गणेश मातीतुन तयार होतो तशीच त्याला आपल्या प्रेमळ भावभक्तितुन भक्तगणही विविध नावे त्याला देतात. कोणी गणू म्हणतं कोणी बाप्पा तर कोणी मोरया. त्यात बाप्पा हे फार जिव्हाळ्याचं नामकरण झालेलं.सर्व शक्तिमान प्रभूला बाप्पा म्हंटलंय..किती गोडवा यात भरलाय.. त्यातुन निर्माण होणारी भावगंगा मनाला फार फार सुखावते. ह्या दहा दिवसात हे अधिकच जाणवत रहातं. तो सर्वज्ञानविज्ञानसंपन्न विश्वेश्वर जेंव्हा चिमुकल्या मुलांच्या हातुन सेवा करून घेतो तेंव्हा अधिक भावतो अधिक आपला वाटतो. गणेशाची रूपे आपल्या मनाला किती आकर्षित करतात हे सांगायलाच नको. तो एकदंत, गजानन, परशुहस्त, धुम्रलोचन, सिद्धीविनायक, लंबोदर, वक्रतुंड, मयुरेश्वर,भालचंद्र अशा अगणित रूपात समोर येतो. कलाकार तर विविध कलाविष्कारातुन गणेशाची भावविभोर करणारी रूपं सादर करत असतात. तो सर्व कलाप्रविण देव आपल्यासारख्या सर्वसामान्यांत येऊन प्रेम व भक्तीचे रेशमी धागे विणतो. बाप्पाला किती मोदक खाऊ घालू, किती आरत्या म्हणू , किती सजावट करू असे भक्तांना होऊन जाते. भक्तांचा प्रतिपालक देव गणेश आपल्या आशिर्वादाने समस्त विघ्नांचे निवारण करतो. सर्वत्र सुबत्ता येते. सर्व संकटे नष्ट होतात.धनधान्यसंपत्तीचा लाभ होतो. यश, किर्तीचाही लाभ होतो.
अशा या मंगलमुर्ती गणेशाला कोटी कोटी नमन🙏🌺
Comments
Post a Comment