विषय - आठवणीतील राखी पौर्णिमा
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे,वेड्या बहिणीची वेडी ही माया
खरंच बहिणींसाठी आजच्या सारखा खास दिवस नाही.भावाबहिणीच्या प्रेमळ व तितक्याच खट्टा मिठा नात्याला भावनांचे,आपुलकीचे रंग देणारा हा सण..माझा भाऊ किती कर्तुत्ववान आहे हे सांगतांना बहिणीचा उर भरून येतो.तीचा भाऊ मोठा असो की छोटा पण कायम तिची पाठराखण करत असतो..
माझा भाऊ आज मुंबई सारख्या शहरात एचडीएफसी बैंकेत नोकरीला आहे ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.माझ्या आठवणीत रहाणारी राखी पौर्णिमा आहे माझं लग्न झाल्यावरची पहिली राखीपौर्णिमा.....माझा भाऊ वयाने माझ्यापेक्षा लहान आहे पण कौतुकाची गोष्ट ही की तो कायम मोठ्या भावासारखा कायम पाठीशी असतो.अनेक प्रसंगात मदतीला धाऊन येतो.माझं लग्न झालं त्यानंतर पहिल्या राखीपौर्णिमेला माझा भाऊ(त्याला मी भैय्या म्हणते)तो सकाळी घरी आला..आदल्यादिवसापासूनच त्याला भेटायची उत्सुकता होती. त्यावेळी तो मुंबईला इंडसइंड बैंकेत नोकरीला होता..त्यामुळे भेटीची ओढ खूप होती.त्याच्यासाठी गुलाबजामचा बेत केला होता.पहिल्याच राखीपौर्णिमेला काय बेत करायचा म्णून खूप विचार केला आणि आठवलं त्याला गुलाबजाम प्रचंड आवडतात...मग काय मी व सासूबाईंनी हाच बेत केला..चटणी,कोशिंबीर,भाजी,पोळी,वरण,भात,गुलाबजाम असा त्याचा आवडता स्वयंपाक मी केला.तो आल्यावर नेहमी प्रमाणे हसून खेळून सगळ्यांशी बोलला.मला मनात जणू आनंदकारंजे उडत होते.मला नेहमी ताई अशीच हाक मारतो.त्यादिवशी तो ताई म्हणत होता व मी मनात आपण आता लग्न झालेली स्त्री म्हणजे मोठी बाई झालो असा काहीसा भाव झाला होता..त्याला जेवू घातलं नंतर ओवाळायचा कार्यक्रम झाला.ओवाळतांना डोळ्याच्या कडा पाणावल्या..खरंच पाठचा भाऊ असणं हे किती सुखद असतं ते जाणवलं..आता महत्वाचा प्रसंग आला त्याने गिफ्ट काय आणलं असेल? तशी माझी अपेक्षा नव्हती पण तो दिवस हक्काचा ...म्हणून उत्सुकता...त्याने गिफ्ट रॅप करून आणलं होतं..मी उत्सुकतेने ते फोडलं ...आणि अविश्वसनिय...माझं सर्वात आवडतं ब्रॅंडचं फास्टट्रॅकचं घड्याळ!! मी शहारले नी डोळ्यात पाणी जमा झालं...त्याला नोकरी लागून फार दिवस नव्हते झाले पण ताईसाठी तिची आवड ओळखून प्रेमाने त्याने ते घड्याळ मला हातात घातलं..नवरोबा लांबून हा प्रसंग कौतूकाने पहात होते..मी सहज वळून पाहीलं.."काय बाबा मज्जाए एका माणसाची" असा भाव होता...मी मनोमन खूश झाले...तो थोडावेळ बसला नी लगेच घरी जायला निघाला...मन गहिवरून आलं..भावाला कधी मनातलं सांगावं लागत नाही..मनातलं ओळखतो..ताई परत लवकरच येईन म्हणाला...मी अश्रू रोखून ठेवले..तो गेल्यावर मन रिकामं ,उदास झालं..फोनवर बोलतांना स्वतःला सावरलं..
असा आठवणीतला तो राखीपौर्णिमेचा सण संस्मरणीय ठरला...
Comments
Post a Comment