विषय : संध्याकाळ


कवयित्री-सौ.स्वरूपा कुलकर्णी


उघडून पंखा रंगांचा,

संध्या येई अवकाशी,

पक्षी परतती कोटरात अन्

गाई जाती गोठ्याशी...


सुर्य बुडाला डोंगरी अन्

रंग सांडले पाण्यावरती,

निळा सावळा काठ दिसे मज,

संध्याराणी सुकूमारी...


रंगबावर्या कळ्या उमलती,

मुक्त खुळ्या फांद्यांवरती,

अल्लड साज तो नक्षत्रांचा,

मनमोहक भासे एकांती..


हळूच विळखा संध्येचा हा,

सभोवार मग दाटून येतो,

मुक्तपणे मी हळवा एकटा,

रिक्त तिच्या ओंजळीत होतो...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न