विषय- रासलीला
लेखिका -सौ.स्वरूपा कुलकर्णी
श्रीकृष्ण परमात्म्याचे संपूर्ण चरित्र म्हणजे अनेक अद्भूत व दिव्य लिलांचा सागर आहे.जितका आपण आतमध्ये शिरकाव करू तितकं खोल आपण जातो व एक नविन अनोखी दुनिया नजरेस येते.जग कृष्णलिलेला समजू शकत नाही याचं मुख्य कारण हे की जगाची दृष्टी विकार वासनांनी बरबटलेली आहे तर जगदीश्वर कृष्णाची लिला संपूर्ण विकाररहीत,वासनारहीत कृती आहे.ती समजण्यासाठी आधि मन कृष्णाला संपूर्ण शरणागत हवं.नंदनंदनाची लिला ही दैवी लिला असल्याने ती निष्कलंक आहे.रासलीला ही अशाच दैवी लिलांपैकी एक आहे.यात गोपी व कृष्ण यांच्यातील दिव्य अशरीरी प्रेमभावनेने युक्त लिलांचे वर्णन आहे.मुळात गोपिका म्हणजे कुणी सर्वसामान्य गवळणी नसून वेदांतील ऋचाच आहेत.ज्या अत्यंत भावभक्तिने कृष्णाला शरण आलेल्या आहेत.वेदांमध्यही परमात्म्याच्या स्तुती गाणार्या ऋचा आहेत.पुर्वजन्मीचे सिद्ध,योगी,पुण्यात्मे यांची मनोकामना पुर्ण करण्यासाठीच भगवंताने या अवतारात गोपिकांचा कान्हा बनण्याची लिला केली.
पुराणात असे वर्णन आहे की एकदा गोपिकांनी कृष्णाला आपणच आमचे पतिदेव व्हावे अशी मनोकामना व्यक्त केली.तेंव्हा कृष्णाने ती मान्य केली.एकदा शरद पौर्णीमेच्या रात्री कृष्णाची मधूर बन्सीची धून ऐकून आधिच आपले चित्त ज्या कृष्णाला अर्पुन बसलेल्या होत्या त्यांनी आपले सगळे कामधाम टाकून वृंदावनाकडे धाव घेतली.भागवतात वर्णन आहे की काही गोपिका दूध तापवत होत्या,काही बाळाला दूध पाजत होत्या,काही नवर्याची चरणसेवा करत होत्या,काही डोळ्यात काजळ भरत होत्या.ती मधूर बासरीची ध्वनी कानावर पडताच जसे गाईंचे कळप संध्याकाळी गोठ्याकडे धाव घेतात तशा त्या कामदग्ध गोपी कृष्ण प्रितीत जगाला विसरून कान्हाकडे धावत सुटल्या.त्या सगळ्या कृष्ण ज्या झाडावर बसून बासरी वाजवत होता तेथे पोहोचल्या.कृष्णाने बासरीवादन थांबवले.सस्मित मुद्रेने त्यांचे स्वागत करून कृष्ण म्हणाला,'हे गोपिकांनो,एव्हड्या रात्रीच्या समयी या घनदाट जंगलात तुम्ही यायला नको होतं.तुमच्या अशा वागण्याने घरचे काळजीत पडले असतील.तुम्ही आल्या पावली परत जा.हे वागणे शोभादायक नाही'.यावर कामदग्ध गोपी स्फुंदू लागल्या.कारण त्यांनी कृष्णाला आपलं सर्वस्व मानलं होतं.त्या परत जायला तयार होईनात हे बघून कान्हाने प्रसन्न चित्ताने रासलीलेचा संकल्प केला.त्या मैदानावर प्रत्येक गोपी सोबत कान्हाने आपल्या कृष्णरूपाची अनेक रूपे बनवून अद्भूत दिव्य असा महारास खेळला.जे बघायला आकाशस्थ देवतांची गर्दी झाली.पुष्पवर्षाव झाला.कृष्ण व गोपी वेगळे राहीलेच नाही.रासमंडळाच्या मध्यभागी कृष्णाची प्राणसखी राधा व कृष्ण परमात्मा रास खेळत भानरहीत झाले.अत्यंत प्रेमभावाने हा रास खेळला गेला.आकाशात चंद्रमा आपल्या १६ कलांसह उपस्थित होता.भगवंताची ही भव्य दिव्य रासलीला म्हणजे प्रत्येक जीवाचे परमात्म्याशी असलेले अनन्य भावबंध.ही रासलीला म्हणजे अशरीरी,दिव्य,वासनाविरहीत भगवंताशी खेळला गेलेला खेळ आहे.ही रासलीला म्हणजे कामक्रीडा नव्हे.कारण समस्त गोकुळजनवासी अर्थात सर्व भगवत्भक्त कान्हाशी तन मन धनाने बाधले गेले होते.त्यात निष्पाप भोळा भाव होता.जेंव्हा गोपिकांना गर्व झाला की कान्हा फक्त आमच्याशीच रास खेळतोय त्याक्षणीच सर्वांना सोडून फक्त राधेसोबत तो अदृश्य झाला.गोपिका वेड्यापिशा झाल्या.कृष्ण दिसत नाही म्हणून भांबावून गेल्या.इकडे राधाकृष्ण प्रेमक्रिडेत असतांना राधेलाही थोडासा अहंकार झाला की मीच फक्त कान्हाची आहे.तेव्हड्या विचारांनी तिच्या मनात प्रवेश करताच कान्हा तिथूनही अदृश्य झाला.या लिलेचा अर्थ कान्हाला अहंकाररहीत प्रेमच खेचू शकते.मनात वाईट गोष्टींचा प्रवेश झाला की कान्हा समोर असुनही दिसत नाही.पश्चातापाने राधा व गोपिका विलाप करत असतांना कान्हा परत समोर आला.अशाप्रकारे ही रासलीला ६ महिने चालली.प्रत्यक्षात ती एकच रात्र होती परंतू काळ पुढे धावायचंच विसरल्यामुळे ६ महिने रासलीला चालली असं भागवतात सांगितलंय.
या लिलेचा अर्थ नीट पाहिला तर लक्षात येईल की देवाला अनन्य भक्तीच प्रिय आहे.त्याचं होण्यासाठी तनमनधन अर्पण करावं लागतं.राधाकृष्ण हीच रासदेवता आहे.त्यांच्यातले अद्वैत हीच आध्यात्माची परिसीमा आहे.तेच या लीलेचे गुह्य रहस्य आहे.
Comments
Post a Comment