आत्मशोधन...

 

          ✍🏻 सौ.स्वरूपा कुलकर्णी



    जग ही ईश्वरनिर्मित कलाकृती आहे हे डोळस नजरेने पाहिल्यावर सहज लक्षात येते.ईश्वराने माणसाला देह दिला, मन दिले व बुद्धीही दिली.या जगात आलेला प्रत्येक जीव चांगलं जगण्यासाठी प्रयत्नशील असतो.माणूस कायम समुहात रहाणेच पसंत करतो.त्याला जगतांना सापडत नाही तो आनंद.जो शोधण्यासाठी त्याची अखंड धडपड असते.हा आनंद सर्वत्र भरलेला आहे याची त्याला जाणिवच नसते.तो अहोरात्र आनंदाच्या शोधात व्यर्थ शिणत असतो.मुख्य गोष्ट ही असते की तो जगात येऊन समोरच्या प्रत्येक गोष्टीला ती जशी आहे तशी न पाहता स्वतःला भासेल तसा तिचा अर्थ लावत जातो.तिथेच तो फसतो.कारण समोरची गोष्ट मुळातच वेगळी असल्याने त्याला सत्य दिसू शकत नाही.ईश्वर सर्व स्थितीत सर्व काळात आपल्या आत व बाहेर उपस्थित असतो.गरज असते आपला दृष्टीकोन बदलण्याची.तो आनंदस्वरूप परमात्मा सर्वांचा असल्याने त्याला शोधणे तसे अवघड नाही.गरज आहे ती सत्यशोधनाची.तो सर्वत्र आहेच पण तुम्ही डोळ्यांवर झापड लावून बसलात तर त्याचे दर्शन कसे होणार?जसे दिवसा सुर्य सर्वत्र प्रकाश देतो पण तुम्ही खिडक्या दरवाजे बंद करून म्हणालात की मला तर प्रकाश मिळतच नाही तर ह्यात दोष तुमचा आहे,सुर्याचा नाही.

       संपूर्ण विश्व ईश्वराधीन आहे.त्याच्या इच्छेनेच सर्व घटना घडतात.तो सर्व साक्षी अंतर्यामी आहे.त्याच्यापासुन काहीच लपत नाही,लपवले जाऊ शकत नाही.ही अध्यात्माची पायरी आहे.एक एक पायरी चढतच ईश्वरापर्यंत आपण एक दिवस पोहोचू शकतो.माझ्यातला मी गवसला की ईश्वरदर्शन होते.कारण तो व मी वेगळे नसून एकच आहोत ही जाणीव जेंव्हा होते तेंव्हा खर्या स्वरूपाची आपल्याला ओळख होते.हे आत्मशोधन कळले की मोक्ष वेगळा उरतच नाही.

  जीवन संपल्यावर परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे भक्तीमार्ग.यातही ज्ञानाचीही कास धरावी असे सर्व साधू-संतांचे म्हणणे आहे.आत्मशोधनाने जीवन सत्य गवसते व  हा आत्मा काय आहे?,हा परमात्मा कोण आहे? ह्याचे ज्ञान होते.तीच जीवनानंतरची व जीवन जगतांना मिळालेली आनंदाची गुरूकिल्ली आहे.

     श्रीमद्भगवद्गीता,समर्थांचा दासबोध, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे ग्रंथ अद्वैताचा पुरस्कार करतात.अर्थात तो ईश्वर व मी यात मुळीच भेद नसुन आम्ही एकच आहोत.यातच सार्या सृष्टीचे,जीवांचे एकात्मिकतेचे रहस्य सामावलेले आहे.जीव व शिव एकच पण मायेच्या पडद्यामुळे वेगळे झाले.तोही एक आभासच.तो अज्ञानाचा पडदा दूर झाला की सत्य गवसते व ईश्वरदर्शन घडते. ज्ञानमार्गानेच जीवाचे अज्ञान लयाला जाते.तो अंतरबाह्य बदलतो व आत्मस्वरूपात स्थिर होऊन त्याच  आनंदात सदा मस्त रहातो.हीच जीवाची आनंदमय अवस्था आहे,ज्यात तो मुक्त होतो.मायेचे भय जाऊन मोक्षलक्ष्मीला प्राप्त करतो.     

              🌸   🌸    🌸

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न