हुरहूर 


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी



    "आई, राहिल न हो आर्या शाळेत, रडणार नाही न जास्त" असे सकाळपासून दहादा सासूबाईंना बोलले असेन..पण

आज मनाने मी फार बैचेन होते..सगळं कळत असुनही दाटून आलेली काळजी बिलकूल लपवू शकत नव्हते..सतत डोळे घड्याळाकडे लागलेले..

        हो,आज तिचा शाळेचा पहिला दिवस...संपूर्ण सुट्ट्याभर तिला "शाळेत जायचंय बरं का आर्या आता ,शहाण्या मुलीसारखं वागायचं,हट्ट करायचे नाहीत " असे उपदेशाचे डोस पुरवत होते..तिच्या नव्हे पण माझ्याच मनाला वाटलेली भिती तिला कळू न देता जणू स्वतःलाच दर दिवसाला समजावत होते...हो ,आर्या आता मोठी झालीये,आता शाळेत जाणार..बघता बघता दुपट्यातली माझी  आर्या आता  शाळेत जाणार,डब्बा खाणार, कविता म्हणनार,बाईंचे व शाळेचे कौतूक सांगणार ..किती नी काय कालच्या दिवसापर्यंत हेच विचार मनात घोळत  होते..

        आज आर्याचा पहिला दिवस तसेच ओवीचाही लॉकडाऊननंतर पहिलाच दिवस शाळेचा...किती धांदल उडाली माझी...सगळ्या सुट्ट्यात अनेक रेसिपी पाहून ठेवल्या होत्या...रेसिपींचे पुस्तक पण घेतलं कारण काय तर दोघींना डब्यात छान छान पदार्थ खाऊ घालायचे..डब्बा संपलाच पाहिजे..पहिल्या दिवशी डब्यात त्यांच्या आवडीची मटकीची उसळ पोळी दिली..आज मी प्रथमच स्वयंपाक केल्यासारखा जीव ओतून स्वयंपाक केला..आईंनी दोघींना आंघोळ घातली...मग मी त्यांना ड्रेस घातले..भांग पाडले..केसांत पीन लावली..पावडर लावून हा मेक अप  आवरता घेतला..या सगळ्यात आर्याचे रडणे मात्र चालूच होते...मी एकीकडे तिला समजावत होते नी मनातल्या मनात आवंढे गिळत होते...कसं राहील माझं बछडं मला सोडून ३ तास..मला काळजीने घेरलं होतं पण वरवर मी दाखवू शकत नव्हते...कसंबसं मनावर दगड ठेऊन त्यांना माझ्या गाडीवर बसवलं.. शाळा जवळंच म्हणून बरं होतं..हुरहूर दाटून तशीच गाडी चालवत होते..शाळा आली...अगदी नवख्या विश्वात मी दोघींसह प्रवेश केला..ओवी न रडता वर्गात गेली पण आर्या मात्र रडून रडून डोळे लाल करत होती...काय सांगू मैत्रीणींनो कसा प्रसंग होता..खरं म्हणजे आता हसू येतय पण त्या घडीला मला माझेच अश्रू थोपवणं कठीण झालं होतं..तरीही  मन घट्ट करून तिला मॅडमच्या हवाली केलं...तीचा आक्रोश चालू होता...गेट लावून घेण्यात आलं ..मी तशीच मागे वळून न बघता निघाले..कासाविस झाले...कसं सावरावं स्वतःला कळेचना..मन मोठं चमत्कारीक अवस्थेत गेलं..घरी आल्यावर आईंना सांगतांना हुंदका अनावर झाला..आईंनी मात्र समजावलं...मन हलकं केलं.."अगं पहिलाच दिवस आहे आज ,म्हणून रडली ती,हळूहळू होईल सवय तिला शाळेची..काळजी करू नकोस.." मी दाटलेला गळा थोपवून धरला..खरंय त्यांचं ,पहिला दिवस हा असतोच वेगळा ..कठोर वाटणारा तरीही महत्वाचा..न चुकवता येणारा...मन द्विधा मनःस्थितीत होतं...तिच्या मॅडम तिला रागवणार नाही ना ती रडली म्हणून? ,माझ्या मनात एक ना दोन प्रश्नच प्रश्न ...ती राहील की नाही शाळेत या प्रश्नाने मात्र मला घामच फुटला होता...एक तर एव्हडी मोठी शाळा त्यात चिमुरडी आर्या मला कसतरीच झालं..हुरहूर वाटत होती कसं होणार ..ती परत शाळेत गेलीच नाही तर?घाबरली तर?मीच गुन्हेगार ठरणार ...माझ्या मनाची अशी ही भ्याड स्थिती पाहून नवरोबा समजूत घालत होते..पण मनाला लागलेली हुरहूर हाताबाहेर गेली होती...घड्याळ्याचे काटे आज हलतच नव्हते जणू..किती संथ झाले हे काटे आज ...

       १२ वाजण्याची वाट पहात आम्ही सगळे वरवर शांत पण मनाने हुरहूर करत होतो..कधी सुटेल शाळा?

         अखेर पावणे बारा वाजले मी आधिच १० मिनीटे शाळेत पोहोचले ..आर्या कुठे दिसतेय म्हणून नजर भिरभिर झाली...शाळा सुटल्यावर घोळकेच्या घोळके गेटबाहेर येत होते..माझी नजर मात्र फक्त आर्याला शोधत होती..अखेर त्या समोरच्या घोळक्यातून अगदी हसत हसत माझं लेकरू माझ्याकडे येत होतं..केव्हडा आनंद त्या नजरेत सामावलेला..मीही किती आतूर व उत्कंठेने तिला जवळ घेतले..उचलून कडेवरच घेतले...किती पप्प्या घेतल्या...ती रडवेली होत म्हणाली ," आई तू मला का सोडलंस एकटीला, का नाही आलिस गं मला घेऊन जायला..मी किती वाट पाहिली तूझी" मी म्हंटलं,"अगं बाळा मला किनई त्या मॅडमनी थांबूच दिलं नाही इथं..घरी पाठवून दिलं मग काय करणार..घरी जावं लागलं...पण आता आले नं मी तुला न्यायला"ती हसली. तिला ते पटलं..निरागस बाळ ..तिला भेटून माझाही जीव भांड्यात पडला ..मी सुखावले...किती अब्द अब्द अनुभवलं तिला कडेवर घेतल्यावर!आता ती अनोखी हुरहूर शांत झाली  होती ...मी सुटले..हुश्श्श😊

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न