चाहूल

 चाहूल


✍🏻सौ.स्वरूपा कुलकर्णी


          

          दरवर्षी ऋतुचक्र त्याच्या त्याच्या गतीने फिरत असते...सहज विचार केला अरे, जर हे ऋतुरंग दिसलेच नसते तर माणसाचं आयुष्य किती एकसुरी नी बेरंग झालं असतं...तोचतोचपणाने आयुष्य बेसूर झालं असतं...आयुष्यात असणारी ऊन -सावली ,थंडी ,पाऊस हे सगळं असणं किती सुखदायी आहे..ऊन आहे म्हणून सावलीला महत्व ...एकमेकांच्या अस्तित्वामुळे माणसाचं आयुष्य म्हणजे सप्तरंगी इंद्रधन्युष्यासारखं मनमोहक झालंय..ऊन्हाची काहीली सहन करतांना परत पावसाळा येणार याची चाहूल सुखावून टाकते..त्या प्रतिक्षेतही एक वेगळाच आनंद लपलेला असतो...कडकडून भूक लागल्यावर मिळणारे जेवण नुसते उदरभरण करत नाही तर समाधानाची तृप्ती मनास देऊन जाते..सुख नुसतं आयतं समोर येऊन चालत नाही,त्यासाठी दुःखाचे चटके आधी बसावे लागतात...आधी हाताला चटके तेंव्हा मिळते भाकर हे खरंय..कडक ऊन्हनंतरची सावली शरीरासोबत मनही शांत करते...दुःखाची झळ आधी लागणे महत्वाचे..आधी दुःखाची काहीली झाली की हळूहळू लागणार्या सुखाच्या चाहुलीने मनुष्य भावनांनी चिंब होतो..थोडा नम्र होतो..त्याच्या मनाला सात्विकतेची झालर येते..ईश्वराविषयी कृतज्ञता भरून येते...विकारांपासून किंचित सुटका होते..दुःखाच्या गर्तांनी भांबावलेले मन त्या सुखाच्या चाहूलीचा आधार घेऊ पहातं..जीवनात नवचैतन्याचे वारे वाहू लागतात..तेच आयुष्य आता परत सुखावह होऊन जातं..

    सुखदुःखाचा हा हिंदोळा प्रत्येकाच्याच आयुष्याचा भागच आहे...पण ती चाहूल...जी दुःखानंतर सुखाची आशेची किरणं निर्माण करते,त्याची गोष्टच निराळी...ही चाहुल नवनिर्मितीची,नवचैतन्याची,उल्हासाची मुहूर्तमेढ रोवते..आयुष्य उजळून टाकते...घनघोर निराशेने व्यापलेले मन हळूहळू स्वच्छ व्हायला लागते..निरभ्र...पुन्हा नवी उर्जा ,नवी उमेद घेऊन माणूस जीवनाशी संघर्ष करायला तयार होतो...आशेचे बळ घेऊन तो जीवनरूपी रणांगणात उतरतो...केव्हडा निर्धार घेऊन तो उतरतो जणू पुर्वी कधिही न पाहीलेले त्याचे रूप सगळ्यांना प्रत्ययाला येते...एक अदम्य उत्साह त्याला जीवन जगण्याची प्रेरणा देतो...हीच मानवी जीवनाची कहाणी ..हारून न जाता परत परत लढायला सिद्ध होणे..म्हणूनच प्रतिक्षा आहे त्या चाहुलीची...सुखद बदलाची..नवसंजिवनीची...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न