माझे सद्गुरू स्वामी समर्थ..


     माझ्या लहानपणी आमचं घर व मागे जुन्या पद्धतीचा वाडा होता..आमच्या घरात व ह्या  खोल्यांमध्ये भरपूर मोठं अंगण होतं.. तिथे नंतर फरश्याही बसवल्या गेल्या..एकूण १२ भाडेकरू इथे रहायचे.. पुर्वी घरात मोठी व्यक्ती म्हणजे आजोबा हे करारी व सर्वांना आदर वाटणारे व्यक्तिमत्व होते.. आम्ही सर्वजण त्यांना 'दादा' म्हणायचो.. पुर्वी शेतकी खात्यात असणारे व वडिलोपार्जित शेती उत्तमप्रकारे सांभाळणारे माझे आजोबा आम्हा सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते..घरात पुर्वीपासूनच देव धर्म निष्ठेने पाळला जात होता.. अग्निहोत्र, पूजा अर्चा, संध्या वंदना, जपजाप्य, कुलाचार कुळधर्म, सोवळे ओवळे खूप पाळले जात होते.. त्यामुळे नकळतच संस्कार तसेच झाले..आई बाबाही धार्मिक वृत्तीचेच त्यामुळे जगण्याच्या शाळेत नितीमुल्यांची पकड घट्टच राहिली.. ती आजही तशीच आहे.. एक माणुस म्हणून जगतांना ही संस्कारांची रूजवणूक कायम आधार बनून आहे..स्वतःचे चुकले की आत्मपरिक्षण करायची सवय लागली.. सॉरी सहज म्हणता येतं.. चुकलेलं सहज कबुल करता येतं.. माफी मागणं म्हणजे कमीपणा असं वाटत नाही.. समोरच्याला आदर देतांना कमीपणा वाट नाही उलट ती सहज वागणूक आहे.. जगणं देवधर्माला धरून असल्याने संकटं हरवून टाकत नाहीत ती येतात, परिक्षा होते पण मी पळून न जाता धिराने उभी असते मग काय ती  तशीच गायब होतात..हा खंबिर आधार ही माहेरचीच देण मला आहे.. 

    आमच्या वाड्यात फार पूर्वीपासून एक औदूंबर अर्थात उंबराचं झाड होतं.. या झाडाचा बुंधा इतका मोठा होता की लांबून अंधारात पाहीलं की भितीच वाटायची.. मुळात हे दत्तगुरूंचं झाड मानलं जातं त्यामुळे या झाडाबद्दल एक गुढ आकर्षणही त्यावेळी मनात होतं..जवळ जायची भितीही वाटायची पण इथे दत्तगुरूंचा निवास असतो म्हणून विशेष आदरही वाटायचा.. कळत नकळत मनातून ते आदराचं स्थान बनलं.. तशी दत्तमहाराजांची कृपा आमच्या घरादारावर तेंव्हाही होती व आजही आहेच..पण त्या धिरगंभीर वृक्षाची दाट सावली आजही स्मरते व कायम एक आधार देते.. त्या झाडाजवळ कायम उंबराच्या फळांचा सडा पडलेला असे.. पानगळही होत असे .. कुलकर्णी काकू त्या झाडाची पूजा करीत असत.आजोबाही करायचे.. मनातुन मीही त्याला नमस्कार करत असे.. तेंव्हाही व आजही हे मनावर संस्करण झालंय की दत्तगुरू आपल्या सतत पाठिशी आहेत व रहातील, जणू त्या वृक्षाच्या छायेत  त्यांनी आम्हाला खूप वर्ष आधार दिला..त्या रूपात ते भवरोगाची तिव्रता ते कमी करत आहेत असे वाटत होते व आजही स्वामींच्या रूपात ते भिऊ नकोस मी पाठिशी आहे हे हळूच सांगतात..

   तसे दत्तगुरू आधीच माझ्या जीवनात होतेच पण माझ्या आयुष्यात स्वामी कसे आले तर तो एक सुंदर किस्सा आहे.. मी माझ्या नकळत स्वामी केंद्रात आरतीला जाऊ लागले नी तिथेच सद्गुरू माझ्या जीवनात आले.. ती वेळ संधीकाळाची होतीच पण माझ्या जीवनातील गुरूकृपेची पहाट होती.. सद्गुरू जीवनात आले नी मी अंतर्बाहय बदलले.. माझे मुमुक्षत्व साधकावस्थेत रूपांतरीत झाले.. अगदी ६ वीत असल्यापासून सद्गुरू उपासना करत गेले.. आजही त्याच मार्गावर पुढे स्वामी नेत आहेत.. मी सद्गुरूंना माझ्या जीवनाचा शिल्पकार समजते कारण ते नसते तर..  तर एकच की माझं जगणं किंवा अस्तित्वच शक्य नाही.. मी त्यांच्याशिवाय हे जीवन शक्यच मानत नाही.. ते होते, आहेत म्हणून आणि केवळ म्हणूनच जीवनरथ पुढे चालू आहे..अर्जुनाचा सारथी कृष्ण तसा माझा रथ स्वामींच्या सारथ्याने चालू आहे.. मी भाग्यवान आहे की इतक्या लहान वयात ते मला भेटले व जीवन कृतार्थ झालं..ही कीमया त्यांचीच..प्रचितीविण सर्व व्यर्थ हे खरंच! 

     आजही केंद्रात गेले की त्यांची प्रेमळ वत्सल मुर्ती पाहिली की डोळे भरून येतात..नकळत हात जोडले जातात,"तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत स्वामीराया..जिथे मस्तक झुकवू तिथे तुझे चरण असू देत..तू माझी आई मी तुझे लेकरू.."  गुरूविण नसे जगी त्राता हे पुरेपूर अनुभवले आहे जे शब्दांत सांगणे फार कठिण आहे.. कारण आई पिल्लासाठी काय असते हे सगळं पिल्लू कधी शब्दात सांगू शकणार नाहीच.. आई ती आईच!  अशा सद्गुरूंची औदूंबराची प्रदक्षिणा घालतांना हा भवरोग तरून जात आहोत याची खात्रीच पटते..सासरही सद्गुरूकृपेने केंद्र जवळ आहे व दत्तगुरूंचही मंदीर जवळ आहे.. कृपावत्सल अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरू तुम्हीच आमचे गुरूदेव, त्राता, माता व पिताही तुम्हीच! कोटी कोटी प्रणाम! 

गुरूदेव दत्त।

गुरूदेव दत्त।

गुरूदेव दत्त।

श्री स्वामी समर्थ।🙏🏻

Comments

Popular posts from this blog