*श्री रामकथा सुफल संपूर्ण*
राम का गुणगान करीये,
रामप्रभू की भद्रता का,
सभ्यता का ध्यान धरीये...
काही अनुभव हे शब्दातीत असतात तसा काहीसा अनुभव राष्ट्र सेविका समितीच्या तीन दिवसीय रामकथेतुन मला मिळाला.राम हा आनंदाचा गाभा आहेच आणि स्मरण चिंतनातुन तन,मन,बुद्धी पवित्र करतो. ह्या रामकथेतुन मिळालेला पिंपळस ग्रामवासियांचा सहवास अनमोल होता. कथा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जसे रामाने सेतुबंधन केले व हजारो वानरांचे हात त्या कार्यास लागले तसेच राहाता शाखेच्या कार्यवाहिका व इतर सेविकांच्या परिश्रमामुळे कार्य निर्विघ्न पार पडले.
तीन दिवसीय कथा करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. रामेश्वर महादेवाच्या पावन सहवासात वाल्मिकींची गोड रामकथा सांगण्याचे भाग्य लाभले हे केवळ वर्णनातीत! गावातील वृद्ध महिलांनी पहिल्या दिवशी अनेक भजनं गायली. त्यात त्या तन्मय होवून गेल्या होत्या. सर्वांनाच कथेत रामजन्माचा आनंद मिळाला. श्रोत्यांची एकुण संख्या ४४ होती. लहान मुलींचीही उपस्थिती होती. संघबंधूंचेही माईक व्यवस्थेत सहकार्य लाभले. दुसऱ्या दिवशी सीता स्वयंवरात तिची सासरी पाठवणी होतांनाचा प्रसंग सांगतांना बऱ्याच महिला भावनिक झाल्या. सीता कशी होती हे वर्णन ऐकतांना त्या गुंगून गेल्या. दुसरा दिवस कथा २ तास चालली पण श्रोते न कंटाळता उलट भारावून गेले होते.एकुण उपस्थिती ५२ होती.नंतर आरतीही जोषात झाली.तिसऱ्या दिवशी ऋचा ताई रिसबूड (शाखा विस्तारिका) हीचीही उपस्थिती लाभली. कथेतील हनुमंतराय व युद्ध प्रसंग सगळ्यांनाच कथेत गुंतवून गेला. कथेच्या सुरूवातीला एक वृद्ध महिला माझ्याजवळ येऊन डोळ्यात पाणी आणून म्हणाली की ताई, घरात लग्न जमत नाही काय करू फार कष्टी झालेय काही उपाय सांगा. मी त्यांना आपल्या मनीची इच्छा रामरायाला सांगा तोच ती पूर्ण करेल असे सांगितले. माझ्यासाठी हा भावनिक प्रसंग होता. एका सेविकेने दोन दिवस आपल्या आईलाही कथेसाठी सोबत आणलं होतं. तसेच एका सेविकेने येऊन मला सांगितलं की २० मिनीटांच्या वर मला मांडी घालून खाली बसता येत नाही पण कथेत मी २ तास सलग बसले कळलच नाही..ही रामरायाचीच कृपा! संघ बंधूंनी समारोपाला एकादशी असल्यामुळे फराळाचा चिवडा , राजगिरा लाडू व केळ प्रसाद ठेवला. कथेनंतर माझा ह्रद्य सत्कार झाला. माझ्या सासूबाई व मुली उपस्थित होत्या. खरंच रामकथेने अत्यंत समाधान दिलं. महिनाभरापासूच मन रामचिंतनात मग्न झालं होतंच.. समारोपाला मन केलेल्या परिश्रमांचं चीज झालं हा भाव मनात रेंगाळत राहिला. कथा संपल्यानंतर आता परत उद्या काही कथा नसेल व या प्रेमळ आज्यांची व महिलांची भेट होणार नाही म्हणून हुरहूर लागली.
रामकथा ही प्रत्यक्ष राम व हनुमंतच पूर्ण करून घेतो हा अनुभव येथे आला..मी धन्य झाले रामराया🙏
।।श्रीरामार्पणमस्तू।।
Comments
Post a Comment