*मन तृप्तं झाले आहे तुझ्या* *दर्शने।* 


- सौ. स्वरूपा कुलकर्णी

     

      जेंव्हापासून समज आली तेंव्हापासून( माहेरील )घरातील धार्मिक वातावरणाचा मनावर घट्ट पगडा  होता व आजही आहे. मनाची घडणच इतकी सुंदर झाली की साधू संतांचे विचार, भक्तिगीते, गीता, रामरक्षा पठण , सत्संग यामुळे मन सतत अंतर्मुख होत गेलं. ही किमया माझ्या आजोबांची व आई बाबांची!

           लहानपणापासूनच तिर्थयात्रांना अनेकवेळा जाणे झाले.तो प्रत्येक अनुभव  वेगळा आहे. मध्यंतरी आळंदी व देहूला जाण्याचा योग आला.तो अनुभव खरं तर शब्दात मांडणं कठिण आहे. कारण संतांचा सहवास आत्मिक पातळीवर समाधान देणारा असतो. तो शब्दांनी व्यक्तं करता येणार नाहीच. पण तरिही निर्गुण निरहंकार परमात्म्याला आपण सगुण रूपात पान फुले वाहतोच ना तशी ह्या अनुभूतीला शब्दबद्धं करण्याचा प्रयत्न आहे.

      **देवाचिये द्वारी उभा* *क्षणभरी।तेणे मुक्ति चारी* *साधियेला।हरी मुखे म्हणा हरी* *मुखे म्हणा।पुण्याची* *गणना कोण करी।।* 

* 

   ज्ञानोबा माऊली सहज ओवी लिहून जातात.समाधीस्थळी जाणवणारी शांतता इतकी विलक्षण आहे की मनही शांत व प्रसन्न होतं. समाधी जवळच असलेला अजान वृक्ष, सिद्धेश्वराचं दर्शन, जवळच असणारी ज्ञानोबा माऊलींनी इतर भावंडांसोबत चालवलेली भिंत, कालभैरव मंदिर हे सगळं डोळ्यात साठवतांना मनावर काहीतरी दैवी कोरलं जात होतं. ती नुसती स्थानं नाहीत तर सुंदर अध्यात्मिक अनुभूतीची स्थळं आहेत.सकाळच्या प्रसन्न वेळेत झालेले ते दर्शन थेट पांडूरंग भेटीचाच आनंद देऊन गेले. तिथे खाल्लेला प्रसाद अत्यंत चविष्ट वाटला हे सांगायलाच नको.

     नंतर देहूला जायला निघालो. कारमध्ये मी 'सुंदर ते ध्यान' व ' श्री अनंता मधुसूदना' ही भजनं म्हंटली. त्या अभंगातली आर्तता नकळत माझ्याही गळ्यातून उमटत होती. देहूला तुकोबारायांच्या विठ्ठल मंदिरात अत्यंत प्रसन्न मनाने दर्शन झाले. ते मंदिर मनाच्या गाभाऱ्यात कोरले गेले. यापुर्वीही देहूचे दर्शन घेतले होते पण यावेळीचा अनुभव शब्दांपलिकडचा होता. निराळीच अनुभूती देणारा होता. तुकोबाराय सदेह वैकुंठात गेले त्या वैकूंठ भूमीवरील मंदिरात अतिशय शांतता जाणवली. खूप वेगळंच समाधान होतं. नंतर इंद्रायणी काठावर आलो. राधाकृष्णाचं दर्शन घेतलं. त्या काठावर जाणवलेलं पारलौकीक समाधान तर केवळ अवर्णनिय! रखरख उन्हातही इंद्रायणीच्या प्रवाहावरून वहाणारा शितल वारा तन व मनाला इतका थंडावा देत होता की देहाने तिथे होतो खरे पण मन मात्र ईश्वरचिंतनात मग्न झाले तद्रूप झाले. जणू झाड जसे स्वतः उन्हात राहून सर्वांना सावली देते तसे संत या भौतिक जगात रखरखलेल्या उन्हात अलौकीक समाधानाची सावली देतात. ती अमिट असते. 

   देहूचे गाथा मंदिरही फार सुंदर आहे. संपूर्ण तुकोबांची गाथा भिंतीवर संगमरवरावर कोरली आहे. मध्यभागी तुकोबारायांची सुंदर मुर्ती आहे. जणू आलेल्या प्रत्येकाचे स्वागत करून प्रेमाने विचारपूस करणारी ती सुहास्यवदन मुर्ती लक्ष वेधून घेते. संपूर्ण देहू प्रवास अध्यात्मातील एक नवी पायरी पुढे गवसणारा ठरला. विलक्षण आंतरीक समाधान देणारा ठरला.

    तुकोबा व माऊली म्हणजे जणू संत परंपरेतील मायबाप आहेत याची परत एकदा जाणीव झाली..

  आता म्हणावे वाटते-

   *मन तृप्तं झाले आहे तुझ्या दर्शने।*

Comments

Popular posts from this blog