आई
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
आज ठरवलं तुझ्याबद्दल लिहावं.. नेहमी सगळ्यांबद्दल लिहीते आज तुझ्यावरही लिहीता येतं का ते बघावं.. नेहमीप्रमाणे मोबाईलवर बोटं फिरवत राहिले..पण .. पण लिहू कशाकशावर असा विचार येताच मन गलबलून गेलं..खरं सांगते डोळ्यात पाणीच आले..किती सात्विक तुझा चेहरा पटकन समोर आला..जसं तूझा चेहरा नजरेसमोर आला तसं माझं बालपण आठवलं.. किती सुंदर दिसायचीस.. साधी कॉटनची साडी, मोठं ठसठशीत कुंकू, काळेभोर डोळे, दाट काळ्या भिवया, गहूवर्णी पण तुकतूकीत तेजस्वी चेहरा जणू रेणुकामातेचंच प्रतिबींब.. गळ्यात काळ्या मण्यांचं सुंदर मंगळसुत्रं, अतिशय सज्जन भोळा स्वभाव असं सगळं सगळं डोळ्यासमोर आलं.. किती सुंदर भजनं म्हणायचीस..त्यातही रेणुकामातेचं " माहूरगडावरी गं माहूरगडावरी गं तुझा वासं" हे भजन किती तन्मय होऊन म्हणायचीस.. नवरात्रात व इतरही कुलधर्मात तुझी लगबग, काळजी आजही आठवते.. तू आम्हाला मारल्याचं कधी आठवत नाही... शाळेत एकदा मला त्रास दिलेल्या एका मुलीला मारल्याचं आजही आठवतं.. किती चिडली होतीस तिच्यावर की माझ्या लेकराला का मारलंस म्हणून..
तुझं प्रेम, तुझी माया अथांग आहे आई..शब्दांच्या पोकळ बुडबूड्यांनी तुझं "आईपण" मला काय कोणालाही वर्णन करता येणार नाही.. आई ही नेहमी आईच असते.. पण माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी आलेल्या प्रत्येकीला आई हा केव्हडा मोठा आधार असतो हे सांगायलाच नको.. आई तू केलेले संस्कार जगभरातील मौल्यवान चिजवस्तूंहून कैक पटींनी श्रीमंत आहेत.. त्या श्रीमंतीने माझं मन- बुद्धी -विचार घडवले, एक चांगला माणूस म्हणून घडवले..
लहानपणी मी तब्येतिने किती नाजूक होते..बऱ्याचदा आजारी असायचे.. पण तूझ्या व बाबांनी रात्र रात्र केलेल्या सुश्रुषेने मी बरी व्हायचे.. डॉक्टर व दवाखाना याच्याशी माझं घट्ट नातं असल्याने नेहमीच घरात औषधांचा रतिब असायचा.. तूही न कंटाळता मला काळजीने औषधं वेळेवर द्यायचीस.. जेवण न जाणारी मी , तब्येत नाजूक अशी मी असुनही अभ्यासात मात्र हुशार होते, दिसायला सुंदर होते म्हणून तूला किती आवडायचे. तू मला कायमच भरभरून प्रेम केलेस भैय्यापेक्षाही काकणभर जास्तच! तू आहेस होतीस म्हणून माझं बालपण अत्यंत सुखात गेलं.. मला मुलगी म्हणून कधिही कसलीच कमी पडली नाही की बंधनं नव्हती..जी बंधनं होती ती प्रेमापोटी हती. .. आज सासरीही तुझ्या भरभक्कम पाठिंब्यामुळे मी सुखात आहे..हा पाठिंबा मनोबळाचा आहे, संस्करांचा आहे.. तुझे हे देणे " न ऋण जन्मदेचे फिटे" या न्यायाने परत करता येत नाही हे अगदी खरे .. पण खरं सांगू तूला या वयात मला खूप खूप आनंदी पहायचेय.तू कायम समाधानी आहेसच पण तुझा नको ती काळजी चिंता करण्याचा स्वभाव मात्र कमी करायचाय..तुझ्यासाठी जमेल ते सगळं करायचेय...तसे भैय्या व आश्विनी तुझी छान काळजी घेतातच .. तू आज तुझ्या नातीत जेव्हडी खूश दिसतेस तेव्हडी इतर कशात दिसत नाहीस.. ते दृश्य अत्यंत रमणीय असते.. बाबांची अतोनात काळजी करणारी तू मला आधुनिक सती सावित्रीच वाटतेस..इतक्या वर्षांचा सहवास तुमचा पण आजही त्यांच्या आधी कधी जेवत नाहीस, त्यांच्या आजारपणात खूप काळजी करतेस व काळजी घेतेस.. तुझे गुणदोष सर्व माहिती आहेत गं ,तूही हाडामांसाचा माणूसच ना पण तुझ्या अथांग वात्सल्यामुळे मी कधीही तुझ्यापुढे देवाला मोठेपण देणार नाही.. तू तूच आहेस गं.. माझी प्रेमळ, साधीभोळी "आई"!!!
Comments
Post a Comment