जे खळांची व्यंकटी सांडो....
पसायदान म्हणजे माऊलींचे भगवंताकडे कळवळून केलेले मागणे!! त्यात कळकळ तर आहेच पण एक उच्चकोटीच्या विचारधारेचा प्रवाह आहे. मुख्य म्हणजे समाजाविषयी त्यात आत्यंतिक मायेची भावना आहे. संतांचे हे चिरंजिवी लक्षण म्हणजे सर्वांविषयी कळवळा असणे, सर्वांचेच कल्याण व्हावे ही आंतरिक इच्छा असणे हे होय. ज्ञानेश्वर माऊलींच्या वैयक्तिक आयुष्यात लहानवयात फक्त अंधःकारच होता. समाजाची "वाळित टाकलेली मुले" अशी संभावना झेलणारी आणि लहान वयातच आई वडिलांची छत्रछाया हरवलेली ही अनाथ मुले.तरीही अशा काटेरी प्रसंगातून माऊलींचा या निर्दयी समाजाविषयीचा कळवळा कुठेही कमी होतांना दिसत नाही. सज्जनांवर तर त्यांचे प्रेम आहेच पण दुर्जनांचीसुद्धा त्यांना जास्त काळजी आहे. प्रत्यक्ष भगवंतही नाना अवतार घेऊन खल प्रवृत्तीच्या माणसांना शासन करतात पण पसायदानात ज्ञानेश्वर माऊली भगवंताकडे अत्यंत करूणार्द्र भावाने म्हणते-
जे खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे जडो।
मैत्र जीवांचे।।
'जे खळांची व्यंकटी सांडो' म्हणजे दुष्टांमधला दुष्टपणा जाऊ दे, खलप्रवृत्ती जाऊ दे पण तो माणूसमात्र राहू दे. किती ही मनाची थोरवी! समजाविषयी कळवळा!समाजाने इतक्या पीडा देऊनही माऊली भगवंतांच्या समोर तळमळीने दुष्टांच्या कल्याणाचीच मागणी करतात. त्यांना शासन कर असे म्हणत नाहीत. केवढा हा मनाचा मोठेपणा, वृत्तीची व्यापकता!
श्रीमद्भगवद्गीतेवरील टीका असलेल्या ज्ञानेश्वरीच्या पूर्णत्वानंतर शेवटी माऊली प्रामुख्याने माणसाच्या दुष्ट प्रवृत्तीला नष्ट करायला सांगतात पण कुठेच दुष्ट नष्ट व्हावेत अशी प्रार्थना करत नाहीत. " जगाच्या कल्याणा संताच्या विभूती" असे म्हणतात, तेच पसायदान वाचतांना उलगडत जाते.
"परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् ।
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
स्वतः भगवंत म्हणतात की मी युगानुयुगे दुष्टांना शासन करण्यासाठीच अवतार धारण करतो. परंतू ज्ञानदेवांसारखी संत मंडळी मात्र भगवंतांच्या वाईट लेकरालाही जवळ करतात. जसे घरात मुलांनी त्रास दिला तर बाबा त्यांना शिक्षा करतात, कधी अती झाले तर घरातून हाकलूनही देतात पण, आई मात्र त्याच लेकराला मागच्या दाराने आत घेते, प्रेमाने कुरवाळते, खाऊपिऊ घालते आणि समजावून सांगते की " बाळा, पुन्हा अशी चूक करू नको बरं, बाबा रागवतात ना! ". खरंच इतकं वात्सल्य या अखिल ब्रह्मांडात फक्त संतांकडेच पहायला मिळतं. सज्जनांना देवाचे प्रेम अधिक लाभतेच पण इतरांना त्रास देणे ही दुर्जनांची सहजप्रवृत्ती असते. त्याला ते काही केल्या सोडू शकत नाहीत, हे माऊली जाणतात. आणि म्हणूनच त्यांच्यातील हे " दुष्टत्व" गेले तर तेही सज्जन बनतील व विश्वाचे कल्याण होईल असा अत्यंत सात्विक विचार माऊलींना सुचतो हे त्यांचे केवढे सालस व सोज्ज्वळ रूप!
श्रीमद्भगवतद्गीतेतील भक्तीयोगात भक्तामध्ये कोणते गुण असल्यावर त्याचे भगवंताशी मिलन होते हे सांगतांना भगवंतांनी जे गुण अधोरेखित केले आहेत त्यात पहिलाच गुण आहे," अद्वेष्टा सर्वभूतानां।" माऊलींठायी हा गुण किती परिपक्व अवस्थेत सापडतो हे पसायदानात प्रकर्षाने जाणवते. भगवंत सांगतात, जे भक्त कधीही कोणाचाही द्वेष करत नाहीत, कोणी कितीही त्रास दिला तरी त्याला परत त्रास व्हावा ही कामना करत नाहीत तर उलट त्यांच्या कल्याणाचीच अपेक्षा करतात ते भगवंताचे होतात. अशी ही माऊली सर्व जगाची सावली आहे, हे प्रत्येक चरणावर सिद्ध होतं. गाय जशी वासरावर, आई जशी बाळावर तशी संत मंडळी दुर्जनांवर अपरिमित प्रेम करतात. त्यांना माहित आहे की आपलं चांगलं लेकरू जगात कौतुकास पात्र होईलच. पण हे जे जरा वांड लेकरू जगाकडून दुर्लक्षिले जाईल, त्याच्या परमहितासाठी बैचेन असणारी माऊली परमेश्वराला सगळ्यात आधी त्या दुष्टांचे दुष्टत्वच जावो असे मागणे मागते. दुष्टांप्रतीसुद्धा इतकी माया असणाऱ्या माऊलींच्या मातृह्रदयाची कल्पनाही करता येत नाही. भगवंतांच्याही एक पाऊल पुढे ही संत मंडळी असतात, जी जगातलं वाईट नष्ट व्हावं म्हणून प्रार्थना करतात.
धन्य ती वत्सल माऊली,
दीनजनांची साऊली।
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी संजीवन समाधी घेणाऱ्या, ज्ञान व भक्तीचा महामेरू असणाऱ्या ज्ञानदेवांना "माऊली" अशी हाक मारतो ते उगीच नाही. ज्ञान,भक्ती,प्रेम,संयम आणि क्षमाशीलता यांचा संगम असणाऱ्या त्या जगद्वंद्य माऊली ज्ञानेश्वरांना कोटी कोटी वंदन!
रामकृष्ण माऊली।
जय हरी माऊली।
सौ.स्वरूपा कुलकर्णी.
Comments
Post a Comment