भक्ती

   ©️®️सौ. स्वरूपा कुलकर्णी


     परमेश्वराच्या निर्गुण निराकार तत्वाला सगुण साकार करण्याची ताकद ज्या गोष्टीत आहे ती म्हणजे भक्ती! प्रेम, स्नेह, माया, ममता, दया, जिव्हाळा या आणि अशा सर्व सुंदर भावनांचा एकत्रित परिपाक म्हणजे भक्ती! भगवंत भक्ताशिवाय परिपूर्ण नाहीच मुळी. अहो म्हणून तर हा मायेचा पसारा आहे.वैकुंठातही देव नाही नी कैलासातही नाही जिथे भक्त भक्तिने त्याचे गायन करून रंगुन जातात तिथे मी असे तो सांगतो.भक्ती हा सर्वस्वी पूर्ण शरणागतीचा विषय आहे. कारण जिथे मी मावळला तिथेच भक्तीचे शिखर. मग भक्त असो की भगवंत एकमेकांत मिसळून गेले की भक्तीचे दिव्य रंग उजळून निघतात.

 भगवंत नेहमीच भक्तीच्या शोधात असतो. खरा सच्चा प्रार्थनेचा सूर ऐकला की त्याचे कान टवकारतात. अशा ठिकाणी तो आवर्जुन असतोच असतो. भावनांनी भगवंताला प्रेमाने पुजने मग तिथे वरवरच्या साधनांची गरज नाहीच. भक्ताने आर्ततेने घातलेली साद त्याला जागवते. शुद्ध पवित्र मनाने केलेली मानसपुजाही त्याला चालते. करोडपती व्यक्तीने केलेली साग्रसंगित पुजा त्याला मोहीत करत नाही तर अश्रुधारांचा प्रेमवर्षाव त्याला अतिव प्रिय आहे. भगवंताची मर्जी राखायची असल्यास मोठ्या मोठ्या साधनांची दक्षिणा त्याला नकोय तर हवंय तुमचं सच्च ह्रदय, त्याच्या भक्तीने समर्पित झालेलं मन. तो इथेच आहे तुमच्या माझ्यात! पण तुम्हाला हवा असेल तर आळवून बघा, आर्ततेने साद घाला लगेच बिलगेल. नेहमी सोबतच असतो फक्त लक्षं नसतं आपलं. त्याला नकोय  तुमचा मोठेपणा, भपका तर हवंय साधासुधा सच्चा प्रेम भक्ती भाव! निरपेक्ष प्रेम! ज्याला जमलं हे त्याला जगाचा चमचमाट नाही भुलवू शकत. करोडो सुर्यांची आभा ज्याच्यापुढे फिक्की पडते तो दिव्य परमात्मा ज्याला या जगण्यात गवसला तो खरा भाग्यवान तोच खरा भक्तं!! 

     भगवंताचे रूपच आनंदमय, प्रेममय म्हणून भक्तीही आनंदमयी परमात्म्याची सेवा.तो आनंदघन कधीतरी घरी येवो नी मला आपलंसं करो हीच भक्ताची कामना. 

     भक्ताच्या ह्रदयात नित्य निवास करणारा सच्चिदानंदघन परमात्मा हेच भक्तीचे स्थान. भक्तिविण मुक्ती कशी मिळणार हे सत्यच पण इथे मुक्ती हवी कोणाला एकदा भक्तीचा अपूर्व रंग चढला की देवा तुझ्या भक्तिविण काही देऊ नको हेच सारे संत मागतात. भगवंत अशाच भक्ताची वाट पहात त्या विटेवर उभा आहे. ताटकळत, युगानुयुगे!!

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न