तो, ती आणि  कोल्ड कॉफी ...


लेखिका- सौ. स्वरूपा कुलकर्णी


   कॉलेजला जायला राधा निघाली. तो होताच तिचा पाठलाग करत मागे येणारा. तिलाही सवयच झाली होती त्याची. ती तशी अबोलीचं फूल पण समोर तो दिसला की कळी खुलायची तिची.ती व तिच्या मैत्रिणी आणि तो कॉफी शॉपमध्ये भेटायचे. जवळपास रोजच.तो असला की ती नकळत कॉन्शिअस व्हायची व आज आपला अवतार ठिक तर आहे ना म्हणून हळूच मोबाईलच्या स्क्रीनकडे नजर टाकायची. तोही बोलता बोलता तीला कोपरखळी मारत पोट धरून हसवायचा. मग तिची खळी अजुनच खुलायची. " हाय तेरी अदा" म्हणत मनातच तिला मिठीत घ्यायचा. ती व तो कायमच एकमेकांविषयी मनामध्ये जास्त व समोरासमोर कमी असे बोलत होते. एकमेकांचा खूप आदर करत होते. तीचा स्वभाव मुलांमध्ये रमण्याचा नव्हताच कधी. पण हा मुलगा मात्र तिच्या मुलांविषयीच्या गैरसमजाला फाटा देणारा होता. तो म्हणजे श्रीरंग होताच निगर्वी, हुशार, सभ्यही होता. मनाने तिच्यात गुंतून बसला होता. खरंतर दोघांनाही एकमेकांचा सहवास हवाहवासा होता. कॉफीशॉपच्या बहाण्याने होणाऱ्या गाठीभेटी त्यांना हलकेच मोरपीस फिरवल्यासारख्या रम्य वाटत होत्या. 

      हे कॉलेजचं शेवटचं वर्षं. दोघांचेही पुढचे करिअर प्लान ठरलेले. पण ..पण आता पुढे आपली भेट कशी होणार म्हणून हुरहूर लागलेले ते दोघे आता प्रत्येक भेटीत हळवे होऊ लागले. 

     एक दिवस नयना राधेला बोललीच.

    " राधा, अगं काय हे? एव्हडं गुंतणं बरं नाही कोणात. तो तुला आवडतो पण अजुन त्याचं व तुझं करिअर व्हायचंय. लग्न बिग्न दुरची गोष्टं नी तू अशी काय नर्व्हस होतेस तो दिसणार नाही म्हणून"..

    राधा- " नयन, अगं मी माझ्याही नकळत त्याच्या प्रेमात पडलीये. आणि हे खरंय की त्याच्याशिवाय राहू शकत नाही" 

     

नयना-" व्हॉट? प्रेम? अगं तू काय राधा नी तो काय कृष्णाचा अवतार का? असं प्रेमबीम सब झूट असतं गं. नको अडकूस त्याच्यात. तू पूर्ण ओळखतेस तरी का त्याला..वेडी मुलगी" 

   असं म्हणत नयनाने राधेला जोरात टपली मारली व वेड्यात काढले. पण राधा मनातुन त्यालाच आपला हिरो मानत होती. 

       त्यादिवशी सेंड ऑफ झाल्यावर राधा कॉफीशॉपमध्ये जाऊन बसली. तिने मैत्रिणींना सांगितले नव्हते. ती एकटीच रोजच्या टेबलवर विचारमग्न अवस्थेत बसली होती. इतक्यात तिला त्याच ओळखीच्या सेंटचा वास आला. तिने पाहिले तर श्रीरंग समोर बसला होता. हसतच म्हणाला- " काय मग मॅडम आज कॉलेजचा शेवटचा दिवस कोल्ड कॉफी मागवू का?" तिने हो नाही म्हणायच्या आत त्याने २ कोल्ड कॉफी मागवली. ती थोडीशी रूसली. पण उगाच त्याची नजर टाळत दूर खिडकीकडे बघत राहिली. बाहेर मस्त गार वारं सुटलं होतं. संध्याकाळ रमणीय वाटत होती. श्रीरंग आज पहिल्यांदाच तिच्याशी मनमोकळेपणाने तिच्या नजरेत नजर देऊन बोलत होता. कॉलेजची सहज म्हणून झालेली मैत्री आज नात्याच्या नाजुक वळणावर येऊन थांबलेली. 

   " राधा"

  तो खूप प्रेमाने म्हणाला. ती विलक्षण शहारली. इतक्या प्रेमाने तिला राधा कोणीच म्हणालं नव्हतं. ती एकीकडे सुखावली पण तितकीच गडबडून गेली. आता हा काय प्रपोज करतो की काय या विचाराने गोंधळली.

 श्रीरंग तिच्या सुंदर हावभावामध्ये तन्मय झाला. किती घाबरली ही आपल्याला म्हणून तोही पुढे काय बोलावं म्हणून तिचा अंदाज घेऊ लागला. 

 तेव्हड्यात वेटरने कोल्ड कॉफी आणून त्यांच्यामध्ये ठेवली. दोघेही त्याक्षणात सावरले. ती आज काहीच बोलत नाही म्हणून तोच पुढाकार घेत बोलला- " राधा, मी उद्यापासून तुला दिसणार नाही गं रोज रोज. माझा पुढचा प्रवास वेगळाए. मी  परदेशात नोकरीसाठी जाणार आहे. माझे अपॉईंटमेंट लेटर कालच आलेय. मी नाही दिसणार गं उद्यापासून तुला" 

 तो अतिशय हळवेपणाने तिला बोलला. तीच्या डोळ्यात पाणीच आले. डोके बधिर झाले. कसं शक्यये याच्याशिवाय दिवस काढणे. ती मनातुन कासाविस झाली. शब्दच फुटेना तिला. त्याने तिच्या आवडीची कोल्ड कॉफीच का मागवली ते तिला समजले. ती तोंडावर हात ठेऊन ओक्साबोक्शी रडू लागली. श्री रंग हतबद्ध झाला कारण ती अशी रिअॅक्ट करेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. तो क्षणभर भांबावून गेला. मग सावरत तिच्या हातांना आपल्या हातांनी पकडत तिचे डोळे पुसत तिच्या हातात रूमाल देऊन -" राधा असं नको वागूस गं. मी तुला  रडतांना बघू शकत नाही गं" राधा उठून सरळ त्याच्या मिठीत गेली. श्रीरंग तिच्या त्या प्रचंड आवेगाने मारलेल्या मिठीमुळे शहारला नी तितक्याच आवेगाने तिला राधा,माझी राधा म्हणत  तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत अनेक वर्षांचे दाटलेले भावनांचे लोट मोकळे करत, तिला मिठीत घट्ट पकडत, स्फुंदत राहिला. तिही जवळजवळ त्याच्याच भावनांत एकरूप होत कोल्ड कॉफीला अजुनच कोल्ड करत हमसत राहिली.नंतर दोघेही डोळे पुसत भानावर आले.दोघेही कोल्ड कॉफी पीत एकमेकांचा सहवास अनुभवत ते क्षण मनात साठवत संध्याकाळ अजुन रोमँटीक करत एकमेकांचा निरोप घेत घराकडे परतले. पण त्यादिवसापासून तो  परत कॉफीशॉपला आलाच नाही. तो कुठे गेला याचा तिेने खूप शोध घेतला. पण व्यर्थ.

   तो असा निघुन गेल्यावर ती स्तब्धं झाली. नकळत अबोल झाली. अश्रुंविना जगत राहिली.पुढेही तिचं शिक्षण नोकरी एकीकडे चालू राहिलं पण लग्नाचा विषय निघाला की ती अबोल होऊन विषय टाळत राहिली. मध्ये ४ ते ५ वर्षांचा काळ गेला. तीची आई वडिलांना खुप काळजी वाटत राहिली. पण ती  मात्र तशीच येणारा काळ कंठत श्रीरंगची वाट पहात राहिली. तो परत येईल या आशेवर दिवस काढत राहिली. 

    दिवस रात्र तीला ती कोल्ड कॉफी सोबतची संध्याकाळ आठवत राहिली. जगणं रूक्षं झालं होतं. ती कोमेजून गेली होती. सगळे तिची काळजी करत होते. पण श्रीरंग काहीच न बोलता का  निघुन गेला हे तिला समजत नव्हते. 

   अचानक एक दिवस तिला पत्रं आले. अक्षर श्रीरंगचेच होते. ती मनोमन सुखावली. त्यात फक्त एकच ओळ होती- " संध्याकाळी कॉफी शॉपवर भेट"

     तीने संपूर्ण दुपार आसवांनी भिजून काढली. तो येणार म्हणून ती सुखावून गेली. इतक्या दिवसांची प्रतिक्षा आज फळाला येणार म्हणून ती कमालीची अस्वस्थं झाली. तो येणार म्हणून वाट पहात राहिली. अखेर संध्याकाळ झाली. तिने पटापट कपडे बदलत आवरून रिक्षाने कॉफीशॉप गाठले. तो आता कसा दिसत असेल याचे चित्र मनात रंगवत जुन्या त्याच टेबलजवळ येत बसून राहीली. इतक्यात तो येतांना दिसला.अतिशय शांत पावलं टाकत तो आला. पण अंगात कोणतेच त्राण नसणारा तो तिच्यासमोर डोळ्यातले अश्रु दाबत म्हणाला." राधा , मी थोड्याच दिवसांचा सोबती आहे. दुर्दैवाने मला कॅन्सर आहे हे मी तुला सांगू शकलो नाही. आता फक्तं एक शेवटची इच्छा आहे इथली कोल्डकॉफी तुझ्यासोबत प्यायची नी तुझ्या घट्ट मिठीत जायचं, घेशील ना मला जवळ?" राधा गोठून गेली नी त्याच्या मिठीत शिरत ओक्साबोक्शी रडत राहिली. पण दोनच क्षणात त्याची हालचाल नाही म्हणून वर पाहिले तर त्याचे निर्जीव डोळे पाहून ती गारठली नी नियतीच्या अघोरी खेळात ती हरली..अन् उभ्या उभ्याच तिही कोसळली..ती कोल्ड कॉफी अजुनच कडवट झाली..

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न