'घन ओथंबून येती'
कवयित्री- सौ.स्वरूपा कुलकर्णी
घनगर्द त्या राईमधुनी
पायवाट ती हिरवी हिरवी,
मी निघाले एकटीच त्या
उंचच उंच डोंगरावरी...
मध्ये मध्ये किरणांची सोबत
मधूनच वाहतो झरा अवखळ,
पायी माझ्या मध्येच झोंबती
पाती हिरवी काळीसावळी.....
माझी चाल झाली झप झप
गाठाया निघाले ते ध्येयशिखर,
उत्साह अदम्य श्वासामधला
वेगळा सुखाचा प्रवास माझा....
अवचित आला अंधार क्षणभर
मागे पुढे रातकिडे कर्र कर्र,
मी मात्र वाट पहात राही
कधी दिसेल तो कळस सुंदर....
मध्ये लागले मोकळे रान ते
दिसले अवकाश धुसर निळे हे,
पण अवचित त्यात आले
घन निळे सावळे डोक्यावर...
घन ओथंबून येती
मी शहारले क्षणभर,
फिरूनी माझी वाट चालते
दिसले सोनेरी शिखर अचानक...
मी नाहले नखशिखांत सारी
घन कोसळे अविरत मजवरी,
जणू वर्षाव जलधारांचा
ध्येयपुर्तीचा उत्सव सारा...
Comments
Post a Comment