।।श्री गीताजयंती।।

           ।।  जय श्री कृष्ण।।

जगातील सर्वच धर्मग्रंथात गीतेचे स्थान अद्वितीय आहे. खरे पाहता गीतेला भारतीय धर्म,दर्शन आणि संस्कृती यांचे प्रतिक व प्रतिनिधी स्वरूप म्हणता येईल. तरी पण गीतेत विद्यमान असलेले सत्य केवळ भारतीयांसाठीच मर्यादित नसून ते कोणत्याही देशातील, काळातील, जातीतील,वर्णातील,आश्रमातील व संप्रदायातील माणसांसाठी सारखेच उपयुक्त आहे. कारण गीता ही सार्वभौम,सार्वजनीन अशा सत्य सिद्धांताचेे प्रतिपादन करते. 

   आपल्या सनातन धर्माचे मूळ म्हणजे वेद. इतर सर्व धर्मग्रंथ या वेदात प्रतिपादन केलेल्या धर्माला समजून सांगण्यासाठीच रचण्यात आले.विषयवस्तूच्या दृष्टीकोनातून वेदांचे २प्रमूख विभाग मानण्यात येतात.कर्मकांड व ज्ञानकांड.कर्मकांडात यज्ञादी कर्मांचा व ज्ञानकांडात ब्रम्हविद्येचा व आत्मज्ञानाचा समावेश होतो.ज्ञानकांडातच उपनिषदांचा अंतर्भाव होतो.उपनिषद हा वेदांचा अंतिम उपदेश असल्याकारणाने त्याला "वेदांत" ही संज्ञा मिळाली आहे. गीतेत शेवटी 'इति श्री मद्भगवद्गीतासू उपनिषत्सू' असे म्हटले आहे. त्यामुळे ते एक उपनिषद अर्थांत वेदांचा अंतिम उपदेश अथवा सार आहे.

  गीतेत परब्रह्म विषयक ज्ञान निहित असल्यामुळे ती ब्रम्ह विद्या आहे.त्याबरोबरच त्यात ज्ञान प्राप्ति चा उपायही  सांगितला असल्यामूळे ते योगशास्त्रही आहे.

 गीता ही सर्वशास्त्रमयी आहे.श्रीमद्श़कराचार्यांच्या शब्दात ती 'समस्त वेदार्थसारसंग्रहभूत आहे'.मोहमग्न अर्जुनाला कुरूक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्री कृष्णांनी जे ज्ञान प्रगट केले तीच ही भगवद्गीता आहे. 

   गीता सुगीता कर्तव्या किमनैः शास्त्र विस्तरैः।

या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनीःसृतः।।

   -स्वतः भगवान विष्णुंच्या मुखकमलातून प्रगटलेली गीता समजून घ्यावी.इतर शास्त्र विस्तार करण्याची गरजच काय?

गीतेत 'कर्म-ज्ञान -भक्ती'या त्रिसूत्री ची ओळख करून देण्यात आली आहे.गीता आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास करीत आपल्या अंतिम लक्ष्याकडे  अर्थात सस्वरूपप्राप्तीकडे नेते.जीवनात स्वधर्माच्या यथायोग्य आचरणाने ईप्सित साध्य होते.फळाची अपेक्षा न करता आसक्ती सोडून ईश्वररार्पन भावाने स्वकर्म करत रहाणे यामुळे चित्तशुद्धी होते.शुद्ध चित्तात ज्ञान प्रगटून मनुष्य भवबंधनापासून मुक्त होतो.गीतेतील उपदेशाचा हाच प्रमुख प्रवाह आहे. 

  आपण हाच अनमोल ठेवा अभ्यासला पाहीजे.चिंतनात ठेवला पाहिजे व नित्य जिवनात आचरला पाहीजे.गीता जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण हाच नियम ठेवून जिवनाचे ध्येय साध्य केले पाहिजे...

   ।। इति  कृष्णार्पनमस्तू।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न