अविस्मरणीय तिर्थयात्रा

भाग ४

   - सौ. स्वरूपा कुलकर्णी


  चित्रकुटहून वाराणसीला सुखरूप पोहोचलो. रात्री जेवण करून विश्राम केला आणि पहाटे लवकर आवरून काशी विश्वेश्वर दर्शनासाठी निघालो..


   *४.काशी(वाराणसी)* 

    "काशीस जावे नित्य वदावे" अशी एक म्हण आहे.. म्हणजे "मी काशीला चाललोय" असे रोज जरी म्हणले तरी काशीस गेल्याचे पूण्य मिळते असे म्हंटले जाते. काशी ही सप्त मोक्षपुरीतील एक नगरी..ही नगरी भगवान भोले शंकरांची पवित्र धरा आहे.येथे महादेवांचा "बुलावा" आल्याशिवाय येणे होत नाही. काशी हे भगवान शंकरांच्या त्रिशुळावर स्थित नगरी मानली जाते..तप:साधनेची, वैराग्य व भक्ती यांचा अभुतपूर्व संगम असणारी, मोक्ष देणारी प्राचीन नगरी म्हणून सर्व हिंदूंना परिचीत आहे..तसेच १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणूनही शिवलिंगाचे दर्शन घेणे फार महत्वाचे मानतात..

     सर्वप्रथम आम्ही काशी विश्वनाथाच्या हॉटेलपासून मंदिराकडे टांग्याने गेलो. पावसाची रिमझीम चालूच होती.इकडे श्रावणमास चालू असल्याने बऱ्यापैकी गर्दी होती.. आम्ही गेलो त्यादिवशी गुरूवार होता. दर्शन पासेस असल्याने सहज दर्शनासाठी मंदिर परिसरात गेलो.. अतिशय स्वच्छ, पांढऱ्या शुभ्र संगमरवरी फरश्यांवरून चालतांना वेगळाच आनंद होत होता..मन अगदी प्रसन्न झाले.. दर्शन रांगेत उभे राहीलो..माझ्या हातात बिल्वपत्र,फुले व जल होते..१० च मिनीटात विश्वनाथासमोर उभे राहिले.. सोन्याच्या पत्र्याने मढवलेली काळ्या पाषाणाची दगडी पिंड नजरेस आली नी मन कृतार्थ झाले..शिवशंभूचा गजर करत हातातील बेलफूल व जल वाहिले व पुढे सरकले..येथिल दर्शनात संपूर्ण मंदिर परिसरातच एक चैतन्य व पवित्रता भरलेली होती.. मंदिराचा कळसही सोन्याने मढवलेला होता..तेथिल आवारातच श्री अन्नपूर्णा मातेचे अत्यंत तेजस्वी मंदिर होते..बघताक्षणी नतमस्तक व्हावे अशी देवी अन्नपूर्णा पाहून मन कृतार्थ झाले. तेथे रूद्राक्ष प्रसादरूपात मिळाला.. येथेच बऱ्याच वर्षांपासून गाजत असलेले ज्ञानवापी हे पवित्र मोक्षदायक स्थळ मुस्जितीच्या आत होते..बघून हळहळ वाटली..मोदी सरकार त्यादृष्टीने पूर्ण प्रयत्न करत आहे व लवकरच ती महीदेवाची जागा आपल्या ताब्यात येणार आहे हे कळले होतेच..त्या भागाचे लांबूनच दर्शन झाले..नंतर जवळील विशालाक्षी देवीचे मंदिर पाहिले व देवीचे दर्शन घेतले.कमळपुष्पावर विराजमान देवीचे सुंदर नयनमनोहर दर्शन झाले..तेथेच मागे नवग्रहांचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा केली.. मग गंगेच्या घाटावर आलो.येथिल गंगेचं रूप इतकं नयनमनोहर आहे की पहाताच नतमस्तक होतो..येथिल अहिल्या घाटावर माझ्या वडिलांनी व इतर पुरूष वर्गाने श्राद्धकर्म केले..पाण्यात पिंडदान केल्यावर ते सगळे बोटीने घाटावर आले. नंतर मी तसेच प्रियंकाने आपापल्या आई वडिलांचे पाय गंगोदकाने धूतले..ओवी आर्यांनीही आजोबांचे पाय धुतले..ते धुतांना गंगेचे महात्म्य पुनःपुनः मनावर ठसत होते.. नंतर बोटीने आम्ही जवळील १५ ते २० घाट पाहिले..असी घाट, ललिता घाट, दशाश्वमेध घाट,मुंशी घाट, तुलसी घाट(येथे तुलसीासांनी रामचरितमानस लिहीले) असे अनेक पवित्र घाट पाहिले..बोटीत असतांनाच जोरात पाऊस सुरू झाला व आम्ही सगळे रोमांचित झालो..वर ताडपत्री असल्याने  भिजलो नाही पण मन गंगेचं ते पावसातील हिंदकळणं बघून चिंब झालं.जणू मोत्याचे  थेंब बनून जलधारा तिला न्हाऊ घालत होत्या..कितीतरी वेळ तिला पाहून मन तद्रूप झाले होते..नजर जाईल तिकडे गंगेचे ते विशाल पात्र पाहून क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता..येथे काशीत ती किती शांतपणे वहाते जणू शिवशंभूंचे चरण धूते.. भाविकांचे पाप स्वतःत सामावून घेते..गंगेचं पाणी पावसाने जरा मातकट दिसत होतं पण प्रदुुषित नव्हतं..योगी व मोदी सरकारमुळे गंगेच्या शुद्धिकरणाचे अनेक फायदे दिसत होते..येथेच मी गंगेची ओटी भरली..दीपदान केले..स्वस्तिर्भवतू चा आशिर्वाद नकळत मनावर उमटला..

       तिथून आम्ही परत हॉटेलवर आलो.जेवण केलं नी परत बिर्ला टेंपलला गेलो..येथेही पवित्र शिवदर्शन झाले.तिथल्या पुजाऱ्याने माझ्या हातीत शिवाला वाहिलेले बिल्वपत्र सहजच हातात दिले..मी बघतच राहिले.." शिवप्रसाद" मन दर्शन घेतांना कृतज्ञतेने भरून गेले.. नंतर आम्ही साडी खरेदीसाठी निघालो..सगळ्या महिलावर्गाने उत्साहात खरेदी केली.मी काशी घाटाचे काठ असलेली सुंदर जांभळ्या रंगाची बनारसी सिल्क साडी घेतली.. त्यावरची दिव्यांची 

बुट्टी विशेष वाटली.. नंतर काशीतील प्रसिद्ध चाट खाण्यासाठी खाऊगल्लीत गेलो..गोपी हाऊसमध्ये चाट खाऊन परत हॉटेलकडे वळलो..रात्री २.३० ची ट्रेन असल्याने बॅग पॅक करून बसलो..आणि सुखरूप ट्रेनने घरवापसी झाली..

     अशाप्रकारे ही यात्रा सुफल संपुर्ण झाली.. तर मंडळी,माझ्यासोबत तुम्हीही यात्रा अनुभवली असेलच..इथेच थांबते..मनापासून तुम्हाला जय श्री राम। हर हर महादेव।।जय गंगे हर हर गंगे।।पापनाशिनी गंगा मैय्या की जय।।


समाप्त।

Comments

Popular posts from this blog