अविस्मरणीय तीर्थयात्रा

 भाग २

- सौ. स्वरूपा कुलकर्णी


   काही दुर्मिळ योग हे पुर्वीच ठरलेले असावेत असा योग अयोध्येच्या रामलल्लाच्या दर्शनाचा होता.. राममंदिर झाल्यापासून सारखे वाटत होते की रामाचे दर्शन कधी होईल..ती ओढ शब्दात सांगता येण्यासारखी नाहीच खरी..हिंदूंचं रामाशी असलेलं नातं खरंच कुठल्याही दाखल्याने सिद्ध करायची गोष्टच नाही..तो सर्वांच्या आत बसलेला आत्माराम आहे तोच परमात्माही आहे.. राम व कृष्ण ही दैवतं जणू आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत.. 

     आम्ही सायंकाळी अयोध्येत पोहोचलो.. रामदर्शनाचे पासेस काढले होतेच.. मनातली दाटून आलेली भावावस्था कधी रामदर्शन घेईल अशीच होती..तिथल्या लोकल रिक्षाचालकाने आम्हाला सीतेचं रसोईघर, रामसीतेची हनुमानाची काही मंदिरे दाखवली.. पण मन मात्र रामाचे दिव्य दर्शन घेण्यासाठी आसुसले होते.मग रिक्षाचालकाने रामलल्लाच्या भव्य मंदिर कॉरिडॉरजवळ आम्हाला सोडले.. भव्यता,रमणियता,सौंदर्य अशा तिनही गोष्टींनी सुसंपन्न अशा त्या मंदिर आवारात पोहोचताच राम नामाचा एकच जयघोष झाला.. भरभर पावलं पडत होती..मधे मधे सिक्यरिटी चेकिंग होत होते..गर्दी फारशी नव्हतीच..पास असल्यामुळे तर आम्ही सहजच मुख्य मंदिराच्या आवारात पोहोचलो..आजुबाजूचे खांबांचे कोरीवकामाचे सौंदर्य वाखाणण्यासारखेच होते.दशावतार, स्वस्तिक चिन्ह, सुर्यचिन्ह, विविध धर्मचिन्ह कोरलेली होती..ठिकठिकाणी दिव्यांचा लखलखाट..पायऱ्या चढतांना मनात नामजप चालूच होता..भेटी लागे जीवा लागलीसे आस अशी ती अवस्था..संध्याकाळी ७.३० -८ची ती वेळ अन् अखेर दर्शनाचा तो दुर्मिळ क्षण आला..एका भव्य संगमरवरी चौथाऱ्यावर कोरीव काम केलेली, दुरूनही हसतमुख दिसणारी रामाची बालमुर्ती दिसली..क्षणभर ह्रदयाचे ठोके थांबले..मी वास्तवात त्याला पहातीये की स्वप्न आहे हे समजायला अवघड गेले..तो सावळा राम दुरून हसून माझ्याकडे बघतोय ही जाणीव होऊन पुन्हा पुन्हा रामरक्षेतील श्लोक म्हणू लागले..त्यावेळी खरंतर किती वेळ लावलास रे मला भेट द्यायला म्हणून त्याच्याशी भांडायचे होते पण तेंव्हा ते विचारच आले नाही..एक विलक्षण प्रसन्नता दाटून आली..गम्मत म्हणजे डोळ्यात पाणी आलंच नाही..खूप बरं झालं नाहीतर तो स्पष्ट दिसलाच नसता ना😊..रामाच्या मुर्तीला श्रावणी सोमवार म्हणून पांढरे वस्त्र घातलेले होते..(उत्तरेत सद्ध्या श्रावण चालू आहे) गळ्यात निरनिराळे सुंदर आभूषण, सुंदर पुष्पमाला होत्या.. गाभाऱ्याची शोभाही अलौकीक होती..पण सर्वात उठावदार वाटले ते त्याचे वत्सल डोळे नी सस्मित वदन.. नकळत तो मनात कोरला गेला ..तिथून पाय ओढवेना ..गर्दी नसल्याने तब्बल १० मिनीटे मुर्तीसमोर  रेंगाळलो..सिक्यरिटी वाल्यांनीही घाई केली नाही..म्हटलं  ही तर रामईच्छा🙏 पुढे वर पायऱ्या चढत राम दरबाराचे दर्शन झाले.. इथे राम,सीता, लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न,हनुमंत अश्या पांढऱ्या पाषाणात घडवलेल्या अप्रतिम मुर्त्या होत्या..राम सीता मुर्त्या तर अतिशय सुंदर,देखण्या व डौलदार होत्या..कमनिय शरिरयष्टी,सुंदर पेहराव,नाना अलंकार, आशिर्वादासाठी समोर उघडलेले हात इतके सुंदर आहेत की जणू सजीव राम व सीता आपल्याला आशिर्वाद देत आहेत असा भास होतो..किती भरीव कोरीव काम व अप्रतिम रंगसंगतीमुळे गाभारा व रामपंचायतन ह्रदयात कायमसाठी कोरलं गेलं.. 

     तिथून मन पुढे जाण्याची इच्छा करतच नाही पण नाईलाजाने पायऱ्या उतरत भव्य पटांगणात आलो.. मंदिराचा अतिभव्य कळस व त्यावर मुक्तपणे लहरणारा भगवा ध्वज खरंच काय नी किती वर्णन करावं?सिक्युरीटी गार्डच्या मदतीने मंदिर परिसरातील इतरही सुंदर  मंदिरं पाहीली..श्रीगणेश, हनुमान,अन्नपुर्णा माता, सुर्य मंदिर ..सगळीकडेच कमालीची स्वच्छता, शुन्य धूळ, हिरवे लॉन्स,प्रकाशाची सुंदर योजना, परिसरातील  लखलखते खांब जणू हा आधुनिक रामदरबार प्राचीन रामदरबाराप्रमाणेच डोळे दिपवणारा वाटतो..प्रत्येक हिंदूने एकदा तरी दर्शन घ्यावे असे हे भव्य राममंदिर योगी व मोदीजींमुळे अतिशय सुरक्षित व सुयोग्य व्यावस्थापनाचे प्रतिबींब ठरले आहे.. येथे येणारा प्रत्येक भाविक धन्य होतो..स्वतःला भाग्यवान समजतो..

     या राम दर्शनाने कृतकृत्य झालो ..भावविभोर अवस्थेत बाहेर आलो..खरंच जन्माचे कल्याण झाले ..ही मोक्षपुरी चिरंतन समाधान देऊन गेली..

    जय श्री राम।जय जय सियाराम।बजरंगबली की जय।

Comments

Popular posts from this blog