अविस्मरणीय तीर्थयात्रा
भाग १
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
कुठल्याही अनुभवाला प्रभावीपणे शब्दांकीत करण्यासाठी प्रतिभा शक्तीचा हात असतो म्हणतात.. देवी शारदेला वंदन करून मी ह्या तीर्थयात्रेचा अनुभव शब्दांकीत करत आहे..साधारण मे महिन्यातच आमचं अयोध्या दर्शन यात्रेचा विषय निघाला. राम हे माझं आवडतं दैवत त्यामुळे मी नाही म्हणन्याचा प्रश्नच नव्हता..लवकरच टिकीट बूक झाले व आम्ही यात्रेच्या तयारीला लागलो.. माझे आई वडील मुली व इतर कुटूंबीय असे २३जणांची यात्रा ठरली.. यात लहान मोठी अगदी शाश्वत (वय वर्षे अडीच)ते ७१ वर्षाचे मामा असे आम्ही तिन पिढ्यातले सदस्य यात्रेत होतो..प्रवास रेल्वेने होणार होता म्हणून जय्यत तयारी होती.. खाण्याचे पदार्थ, फळे, पावसाळा आहे म्हणून छत्र्या, रेनकोट, स्वेटर , कपडे, सर्व गरजेच्या वस्तू घेऊन आमचा लवाजमा १ तारखेला रात्री ९ वाजता पुणे स्टेशनला पोहोचला.. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह होता..पण रेल्वे १ तास लेट आली नी आम्ही थोडे हिरमुसलो..शेवटी आमची सुपॉल एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली नी हुश्श झालं.. नंतर एकेक जण रेल्वेत चढला..रेल्वेत सामान ठेवण्याची शिकस्त करत माझा भाऊ व सर्व पुरूष मंडळी आमची काळजी घेत रेल्वेत बसले..सर्वजण मग गप्पा गोष्टी करत,गाण्याच्या भेंड्या खेळत आनंदात प्रवास करू लागले..खान्यापिण्याची चंगळ होती..सगळ्यांनीच च्याऊ म्याऊचे चविष्ट पदार्थ सोबत आणले होते..रेल्वेत एकत्र प्रवासात किती मजा येते हा एक अनुभवण्याचा विषय आहे..
अनेक स्टेशन पार करत रेल्वे तब्बल २४ तासांनी प्रयागराज स्टेशनवर पोहोचली.. तिथे आमची यात्रा कंपनीची ट्रॅव्हलर आधीच पोहोचली होती.. संपूर्ण यात्रेचे नियोजन या कंपनीकडे दिले होते..नाश्ता,जेवण,चहा, महत्वाच्या तीर्थस्थानांना भेट देणे.तसेच, हॉटेलमध्ये झोपण्याची सोयही त्यांच्याकडेच होती. जेवण व हॉटेल याबाबतीत कंपनीने विशेष काळजी घेतली म्हणून प्रवासात कोणी आजारी पडले नाही..
प्रवासात पहिला टप्पा होता त्रिवेणी स्नान..तीर्थराज प्रयाग!येथे रात्रीचा मुक्काम होता..दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून संगमावर स्नानास जायचे होते..
*१. प्रयागराज*
प्रयागराज हे उत्तर भारतातील गंगा यमुना सरस्वती यांच्या संगमावर वसलेलं प्राचीन धार्मिक स्थळ. याचेच नाव अलाहाबाद..येथिल अलाहाबाद युनिव्हर्सिटी प्रसिद्ध आहे.. या स्थळावर तीन महानद्या एकत्र येत असल्याने त्या त्रिवेणी संगमात स्नान करण्याचे प्राचीन धार्मिक महत्व असल्याने सर्वांनी तिथे बोटीतुन जाऊन संगमावर स्नान केले.. अत्यंत उबदार जलप्रवाह व शांत वाहणाऱ्या नद्या पाहून तन मन पवित्र झाले.. गंगा यमुनेच्या त्या उबदार कुशीत जणू क्षणभर जगाचा संपर्कच तुटला..वेगळाच अनुभव होता.. कदाचीत तो शब्दबद्ध करता येणारच नाही इतका अध्यात्मिक व गुढ!..गंगे पुनातु माम् म्हणत स्नान पूर्ण झाले..दूर दूर पर्यंत दिसणारी गंगा,यमुना आणि गुप्त सरस्वती येथे मी दीपदान केले.. प्रवाहात दीप सोडतांना जणू कोणीतरी तो दिप हातातून ओढलाय असं क्षणभर वाटलं..जणू गंगेने दिप स्विकारला..माझे भावभोळे मन कृतकृत्य झाले..लांबपर्यंत तो दिवा प्रवाहात वाहत जातांना मी पहातच राहिले..मन त्या पवित्र नद्यांच्या प्रवाहात विरघळले..भावविभोर झाले..
प्रत्येक हिंदूचं गंगेशी यमुनेशी असलेली नाळच मला उलगडत गेलं..किती अब्द अब्दं बोलतात ह्या नद्या आपल्याशी! जणू शरारातील रूधिरच होऊन त्या वाहत असतात आपल्या तन मनात कायम..मी पहात होते ते नयनरम्य संगमाचे मनोहारी रूप..कितीतरी वेळ मनात साठवत राहिले..आजुबाजूचा कोलाहल ऐकू येईनासा झाला..संगमाशी तद्रूप होऊन गेले..
तिथून जवळच असलेल्या अक्षयवटाचे दर्शन झाले..हा मी पाहिलेल्या आजवरच्या वटवृक्षापैकी सर्वात मोठा वटवृक्ष होता..विशाल बुंधा, जणू ६ ते ७ वटवृक्ष एकत्र मिळून तयार झालेला, बहारदार हिरव्याकंच पानांनी नटलेला, स्वतः रामचंद्र व सीतामाईने पूजा केलेला हा वृक्षराज पाहून डोळे तृप्तं झाले.. असं म्हणतात प्रयल काळातही हा वृक्ष नष्ट होत नाही.. युगानुयुगे तो उभा आहे .. हिंदू याला पुरातन प्राचीन व पवित्र वृक्ष का मानतात ते पाहताच कळाले.." वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालम् मुकूंदम् मनसा स्मरामी" हा श्लोक याच विशाल वटवृक्षाच्या पानावर झोपलेल्या बालमुकूंदाला स्मरूनच केलेला आहे हे ऐकले होते.. त्या जुन्या परंतू तितक्याच पवित्र ऋषितुल्य वृक्षराजाला पाहून मन सद्गतित झाले ..तिथून पाय निघेना..
त्यानंतर जवळच्याच बडे हनुमान मंदिरात झोपलेल्या बलभीम हनुमंताचे दर्शन घेतले..आतमध्ये अतिशय पवित्र वातावरण होते..अनेक पानाफुलांनी भरगच्च आवरणात हनुमंत जवळजवळ झाकला गेला होता..पान फुलांच्या,धूप दिपाच्या सुंदर सुगंधी वातावरणात दर्शन झाले आणि प्रसाद घेऊन पुढिल प्रवासासाठी निघालो..
क्रमशः
Comments
Post a Comment