अविस्मरणीय तीर्थयात्रा

भाग ३


- सौ. स्वरूपा कुलकर्णी


      रामलल्लाच्या प्रसन्न दर्शनानंतर आम्ही रात्र अयोध्येत घालवून सकाळी नाश्ता वगैरे करून चित्रकुटला रवाना झालो. 


 *३.चित्रकुट* 

         रामायणात सांगितल्याप्रमाणे रामप्रभू,सीतामाई व लक्ष्मणाने साडे अकरा वर्षे चित्रकुटावर निवास केला होता. येथेच तुलसिदासांना रामरायाने दर्शन दिले होते.सती अनसुया व अत्री ऋषींचा सिद्धाश्रमही इथेच आहे.मंदाकिनी नदी येथे शांत वहाते.

     सर्वप्रथम आम्ही कामदगिरी पर्वत येथिल कुबेराचे मंदिर पाहिले. रामरायाने रावणाला मारण्याची इच्छा मनात धरून कुबेराला कंदमूळ फळे येथेच अर्पण केली असे गाईडने आम्हाला सांगितले. रामघाट ते कामदगिरी पर्वत अंतर बरेच आहे पण रामचंद्र तिथून रोज या कुबेर मंदिरात कंदमुळ फळे अर्पण करण्यासाठी येत असत. शेवटी रावण वध झालाच हे आपण जाणतोच. त्यानंतर गुप्त गोदावरी या अद्भूत ठिकाणी गेलो जेथे आपली गोदावरी नदी गुप्तपणे रामरायांना भेटण्यासाठी येत असे. ती गुफेतून वहाते व पुढे अदृश्य होते..पाण्याचा प्रवाह थोड्याच अंतरावर वहातो असे गाईडने सांगितले..त्या गुफेत गोदावरीच्या पवित्र प्रवाहात फार फार प्रसन्न वाटले..गुडघाभर पाण्यातून चालावं लागतं..दगड,खडे,वर खाली जागा पायाला लागतात पण त्रास होत नाही हे विशेष..तेथून आम्ही सायंकाळी सती अनसुया व अत्री ऋषींच्या सिद्धाश्रमात गेलो..इथली आख्यायिका अशी की एकदा अत्री ऋषींना तहान लागली पण जवळ पाणी नव्हते.चित्रकुटचा तो दुर्गम भाग.मग अनसुयेने सगळ्या जंगलात पाण्याचा शोध घेतला पण पाणी मिळाले नाही.तेंव्हा आपल्या पतीसाठी आपण पाणीही आणू शकत नाही या खेदाने तिने आपल्या तपोबलाने गंगेला आवाहन केले. मग गंगेची धारा तिथे प्रगट झाली तीच मंदाकिनी नदी होय..आजही अत्यंत शांतपणे ती वहाते आहे..सती अनसुयेच्या आश्रमात अतिशय प्रसन्न वाटले. ब्रह्मा विष्णू महेशाने तिची घेतलेली परिक्षा व तिने त्यांना दिलेले बालकरूप हे इथेच घडले असे गाईड सांगत होता. येथेच रामप्रभू वनवासात असतांना सीतेला महासती अनसुयेने पतिव्रतेचा धर्म सांगितला..येथे अनसुयेच्या मंदिरात मला साधूबाबांनी सिंदूर प्रसाद म्हणून दिला..मी मनोभावे तो स्विकारला.. तिथून प्रसन्नभावाने आम्ही रामघाटाकडे वळलो. येथे रामचंद्रांची पर्णशाळा आहे.तसेच जानकी घाट,तुलसी घाट,केवट घाटही आहेत.रामचंद्र व सीतामाई यांच्यासाठी लक्ष्मणाने बांधलेली पर्णशाला येथे आहे(आता त्याचे मंदिर बनले आहे) शेजारीच लक्ष्मणाची कुटी आहे.वनवासकाळात येथेच लक्ष्मण रात्रभर पहारा देत जागाच असे..धन्य ती रामभक्ती! येथिल मंदिरात आजही रामरायाला फळांचाच नैवेद्य दाखवतात..कारण वनवासकाळात रामराय कंदमुळ फळांवरच राहिले.. रामरायाची व केवटाची भेट इथलीच.. रामघाटाला वळसा घेत मंदाकिनी वहाते..नावेत बसून येथिल मंदाकिनीची रात्रीची आरती पाहिली..मन तृप्त झाले.. दिपदान केले..दूरपर्यंत जाणारा दिवा पाहून समाधान झाले. दिव्यांची रोषणाई मंदाकिनीच्या पवित्र प्रवाहावर पडलेली पाहून आनंद होत होता..

     दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रकुटावरील हनुमान धारेला गेलो.आख्यायिकेनुसार लंकादहनानंतर हनुमंताच्या शरीराचा दाह शांत होत नव्हता म्हणून रामचंद्रांना त्याने विनंती केली की काहीतरी करून हा दाह थांबवा तेंव्हा रामचंद्रांनी बाणाने पाण्याचा प्रवाह तयार केला. येथिल धारा हनुमानाला अभिषेकीसारखी  सतत वहात असते..रोपवेने आम्ही त्या हिरव्यागार पर्वतावर गेलो व श्री हनुमंतरायाचे पवित्र दर्शन घेतले.तेथे हनुमान चालिसा म्हंटली..इथे दिड दोन हजार पायऱ्या आहेत. म्हणूनच रोपवेने वर गेलो..दर्शन छान झाले.. त्यानंतर स्फटिकशीलेकडे गेलो..जेथे रामरायाने वनात असतांना पहिल्यांदाच सीतेला पुष्पमालांनी श्रृंगार केला होता..पण इंद्राचा पूत्र जयंत कावळ्याच्या रूपात आला आणि त्याने सीतेच्या पायावर चोच मारली.भळाभळा रक्त वाहिले मग रागाने रामरायाने तेथिल दर्भाची काडी त्याला मारली तो दूर उडाला पण ती काडी त्याच्याच मागे वेगाने येऊ लागली. शेवटी तो रामरायाला शरण गेला. मग रामरायाने शिक्षा म्हणून त्याचा एक डोळा निकामी केला.. आजही आपण पहातो कावळा एकाच डोळ्याने पाहू शकतो.. या स्फटीकशीलेचे विशेष असे की बाराही महिने तिचे तापमान सारखेच असते. त्या शिलेला आम्ही प्रदक्षिणा घातली व चित्रकुट यात्रा सुसंपन्न झाली..

    मग आम्ही काशी(वाराणसी)कडे प्रयाण केले

Comments

Popular posts from this blog