हळदी-कुंकू
©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी
मकर संक्रमण उत्सव म्हणजे गोड गोड तिळ-गुळ खाण्याचा व लुटण्याचा सण! लहानग्यांनी पतंग उडवण्याचा सण तर आम्हा बायकांसाठी तर निव्वळ आनंद सोहळाच जणू! चांगला महिनाभर चालणाऱ्या ह्या सणात हळदी- कुंकवाचे आमंत्रणं स्विकारणे व घरीही मैत्रिणींना बोलावून हास्य फवारे उडवणे हा जणू परिपाठच! हिची साडी कशी, तिची साडी कशी, हिचे ब्लाऊज कोणी शिवले ते हिचा मेक अप लई भारी पर्यंत नानाविध चर्चांना ऊत येतो. बायकाच त्या ऐकणार का कोणाचं?.छोट्या गावांमध्ये हळदी कुंकवाची वेगळीच मजा असते. बायका मनमुराद हास्स्यकल्लोळात वाण लुटतात व आपल्या सौभाग्यासाठी रोज नवनविन शृंगार लेऊन सजतात. किती हौशीने रोज नव्या घरी आमंत्रणं स्विकारत आपल्या मैत्रिणीचे कौतूक, तिची सजावट बघायला जातात. जगणं खरंच किती तिळ- गुळासारखं गोड आहे हे हसत खिदळत स्विकारतात. नाव घे , नाव घे करत मैत्रिणीला चिमटे काढतात. माझा नवरा किती प्रेमळ आहे हे सांगण्याची लाजरी खूण म्हणजे उखाणा ! सण सौभाग्याचा पण घरात नवरा नको अशी काहितरी विचीत्र अवस्था होते पहा आम्हा बायकांची. अहो का म्हणून काय विचारता एव्हड्या नटून थटून मैत्रिणी येणार म्हणल्यावर नवरोजी लांबच बरे , नाही का?😄 अशा खट्याळ आम्ही बायका नवरोबांना जरी दूर ठेवत असलो तरी मैत्रिणींमध्ये मात्र त्याचेच गुणगान करत असतो.
घरात हळदी कुंकवाच्या दिवशी लेकिला हाताशी धरून सुंदर रांगोळी काढली जाते. कधी एकटीनेही हे काम करावं लागतं. यात तिच्या कला कौशल्याची चांगलीच परिक्षा असते. अगदी सगळ्यांपेक्षा वेगळी काढण्याची अहकमिहक. त्यात सौंदर्यदृष्टी महत्वाची. घरातली टापटीप, स्वच्छता, सगळं सगळं आवरलं जातं. संक्रांतीची छोटीशी सजावट घराला सौंदर्य प्रदान करते.संध्याकाळ जवळ येत गेली की केशर मिश्रीत दुधाचा गंध दरवळू लागतो. हळूहळू निमंत्रीत मैत्रिणी येऊ लागतात. मग पायरीवरूनच आपल्या हुशार, स्मार्ट मैत्रिणीच्या कलासक्त सजावटीची, रांगोळीची वाखाणणी सुरू होते. मग आपला अतिशय बुद्धीकौशल्याने केलेला मेक अप व साडी पेहराव सावरत घरची लक्ष्मी हसतच आपल्या घरी आलेल्या लक्ष्मीचे स्वागत करते.मग हास्याचे हलवे फुटतात.एका पाठोपाठ एक मैत्रिणी येत रहातात. खूप खूमासदार चर्चांना नुसता ऊत येतो. गप्पांमध्ये संध्या रजनीत कधी परावर्तीत होते कळतही नाही.
खरंच, ह्या संक्रमण उत्सवात ती आज समाधानी का होते? कारण तिच्या लाडक्या मैत्रिणींनी तिच्या कलागुणांची मनमुक्त प्रशंसा केलेली असते. तिचं कोडकौतूक करणाऱ्या ह्या सख्या म्हणजे तिच्या जगण्यातील गुळाचा गोडवा असतात. त्या हास्यरंगात ती तिचे सुख वेचते. सुखाचे अनेक कंगोरे तिच्याभोवती रिंगण घालतात. ती आज मनस्वी सुखावते. कधी नवऱ्याची,कधी मुलांची,कधी सासूसासऱ्यांची ती आज मैत्रीणींच्या मुक्त अवकाशात आपले चांदणे शोधते. आज तिच्या सुखाला तिचीच नजर लागते की काय असे वाटून ती सहज आरशात बघते. नी अवकाशीचा चंद्र आज आपल्या सुखापुढे फिका वाटू लागतो. ती आज ह्या भरल्या संसारात सुखी संसारात नवऱ्याचे रूप मनात साठवत सुरेख लाजते. जणू गाणे गाते- ऊंच माझा झोका..
Comments
Post a Comment