प्रेमाच्या गावा जावे..


©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी


    मनाच्या बंगल्यात अनेक अडगळीच्या खोल्या असतात. काही सुंदर, निटनेटक्या, आवरलेल्या तर काही अस्वच्छ, गलिच्छ, घाणेरड्या. व्यक्तिपरत्वे त्या जागा वेगवेगळ्या रंग रूपाने नटलेल्या. मनातल्या जागांची खासियत ही की डोळ्याने पाहिलेले, ग्रहण केलेले तसेच पंचेंद्रीयांनी अनुभवलेले भावविश्व फार सखोल टिपत रहाते. स्मृतींच्या रंगीत कपाटात बंद होते. स्वच्छ, सुंदर , पवित्र असं सापडलं की माणसाची अनुभूती सुखद होते. तेच वाईट आठवांनी मन दुःखीही होते. रंगबिरंगी आठवणींच्या खोल्या बालपण,तारूण्य, प्रौढावस्था अशा मानवी जीवनाच्या टप्प्यांचा कोलाज सांभाळत पुढे पुढे जात रहाते. पण काही स्मृती इतक्या जबरदस्त गोंदलेल्या असतात की मन त्या आठवणी समोर आल्या की तिथेच थांबून जाते. काही केल्या पुढे जात नाही. जणू त्यावेळी काळ थांबून जातो. 

     प्रेम, द्वेष, राग, अपमान, मोह, हत्या, अपघात अशा काही गोष्टींचा मनावर विलक्षण परिणाम होत रहातो. त्या जखमा विसरता विसरत नाही. जगण्याचे कितीही टप्पे पुढे गेले तरी मन तिथेच घोटाळत रहाते. का होते असे?मानसशास्त्रीय  कारणे खूप असतील पण मला वाटतं की मन संवेदनशील असल्यामुळे अनुभवांचे शस्त्र मन नावाच्या अदृश्य देहावर सपासप वार करतात. व्यक्ती जितकी जास्त संवेदनशील तेव्हडा परिणाम अधिक. 

 ही अनुभवांची गाठोडी हळूच उलगडून त्यावर हळूच फुंकर घालणारा व मलम पट्टी करणारा प्रेमळ माणुस भेटला की वेदनांची आच कमी होते. जगणं अधिक सुसह्य होतं. संघर्षाचा काळ त्या प्रेमळ व्यक्तीमुळे सुखद होतो. 

      हाच धागा पकडून मला वाटतं आजच्या तरूण मुलांनी/ मुलींनी व्हॅलेंटाईन डे साजरे करावेत की नाही हा वादाचा मुद्दा बाजुला ठेवू पण प्रेम व्यक्त करणं ही खूप गरजेची गोष्ट असते. निराश, उदास मनाला टवटवीत बनवायला प्रेमाची फुंकर खूप मोठे औषध आहे. जगण्यातील सौंदर्य हे प्रेमाचीच कारागीरी आहे हे कधितरी लक्षात येतेच नी जवळच्या जीवास जीव देणाऱ्या माणसाला सहवासातील प्रत्येक क्षण  जगण्याचा सोहळाच आहे हे ध्यानात येते. प्रेमाचा कुठला एखादा सण साजरा करण्यापेक्षाही प्रत्येक क्षण प्रेमाने जगणे महत्वाचे.आपल्या पत्नीला, पतीला किंवा प्रियकराला प्रेयसीला कुठल्याही मोठ्या गिफ्टची गरज नसते तर हवा असतो तिचा प्रेमळ सहवास, निर्मळ व खरा. प्रेमाची व्याख्या करता येत नाही पण प्रेम असेल तर मन नावाची दुनिया खूशहाल होते तर प्रेम नसेल तर मन मेलेच म्हणून समजा. त्याला पुन्हा जीवंत करायची संजीवनी बुटी म्हणजे प्रेमच! हे त्रिकालबाधित सत्य आहे. आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचा गाभा प्रेमच आहे. हे सत्य स्विकारूनच जीवन वाळवंटाचे नंदनवन बनते हे मात्र खरे!!


हमे तुमसे प्यार कितना 

ये हम नही जानते

मगर जी नही सकते 

तुम्हारे सीवा...

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न