विष्णूप्रिया एकादशी


©️®️ सौ. स्वरूपा कुलकर्णी


     मंडळी, एकादशी म्हंटलं की उपवास, पंढरपूर किंवा वारी असं चित्र डोळ्यासमोर येतं. पुराणांमध्ये एकादशीविषयी खूप महत्वपूर्ण कथा व माहिती आलेली आहे.सर्वप्रथम एकादशी हे एक व्रत आहे आणि ते विष्णूला अत्यंत प्रिय आहे ही महत्वाची माहिती मिळते. जो एकादशी नेहमी करतो तो वैकुंठाला जातो असे म्हणतात. एकादशी बद्दल माझं वैयक्तिक उदाहरण सांगते. दोन वर्षांपुर्वी आषाढी एकादशीपासून मी ह्या व्रताला सुरूवात केली. बऱ्याच अनुभवी लोकांकडून व पुस्तकांमधून तसेच लहानपणापासून घरातल्या वातावरणामुळे एकादशी ह्या व्रताबद्दल विलक्षण कुतूहल होतं. मोठी एकादशी तर करतच होते पण वर्षातील सगळ्या एकादश्या कराव्यात अशी आस मनाला लागली. तशी मी विष्णूभक्तंच पण एकादशीचा उपवास निभवेल का नी दरवेळी तो लक्षात राहिल का असा मनात प्रश्नं होताच. पण तो निभावणे आपल्या हातात नसुन प्रत्यक्ष हरीच त्याची काळजी घेतो हे मला थोड्याच दिवसात कळाले. आपण चुकूनही एकादशी विसरत नाही व उपवासही चांगला निभावतो हेही मला पुढे कळत गेले.खरंच हे माझे क्रेडीट नाहीच, ही त्या हरीचीच कृपा. एकादशीचा दिवस माझ्यासाठी इतर दिवसांसारखा कधीच नसतो. त्या दिवशी मन व शरीर आतुन आपसूकच पवित्र वाटते. देवाची आठवण हटकून होते. एकाग्रता वाढायला मदत होते. ईश्वरभक्ती साध्य होण्यासाठी खरोखर एकादशीसारखं दुसरं व्रत नाही.

      अध्यात्मिक प्रगती करण्यासाठी साधकांनी नित्य उपासना करावीच पण हेही व्रत आवर्जुन करावं. मला ह्या २ वर्षात जाणवलेली मनःशुद्धी तसेच आंतरीक समाधानाची अनुभूती फार विलक्षण आहे. ती शब्दात मांडता येण्यासारखी नाहीच.

एकादशीला हटकून लवकर जाग येते. आन्हिक उरकली की पूजेला बसते. देवाला उद्वार्चन अर्थात उटण्याने घासते. देवाला आंघोळ घालून वस्त्राने पुसते. गंध, बुक्का लावून स्तोत्रं म्हणते.आरती झाली की मन प्रसन्न होते.त्यानंतर पांडूरंगाष्टक व साईनाथ स्तवनमंजिरी म्हणते.दिवसभरात एकदा विष्णूसहस्रनाम ऐकते. दिवसा व रात्री हलका आहार घेते. उपवासाच्या पदार्थांचा हल्ली फार सुळसुळाट झालाय. तिकडे दुर्लक्ष करून उपवासाचे हलके पदार्थ मोजकेच खाणे ही शरीरशुद्धीसाठी फार महत्वाची बाब आहे. ह्या गोष्टी लहानच पण मन व शरीर शुद्धी करतात. अंतःकरण पवित्र करतात. तुम्हालाही ही अनुभूती हवीये का? तुम्ही स्वतः एकादशी करून अनुभव घेऊन बघू शकता.हरी तुमची वाट पहातोय😊

जय जय रामकृष्ण हरी।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न