एक बिल्व शिवार्पणम्..
- सौ. स्वरूपा कुलकर्णी
श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिवालयात पुजेसाठी गेले होते. स्वच्छ पांढरे कपडे घालून माझ्यासारख्या अनेक स्त्रिया पुजेसाठी अगदी उत्साहात २ -२ तास रांगेत अगदी शांत बसल्या होत्या. राहात्यातील हे शिवालय तसं जुनंच.अगदी माझ्या आजेसासूच्याही पुर्वीच्या पिढीचं. दिसायला बाहेरून अगदी साधंसंच. पण गाभाऱ्यात मात्र पावित्र्यं जपलेलं..आतुन खूप वेळ रूद्राचे पवित्र मंत्र कानावर पडत होते..मन शांत करत होते..गुरूजी व बाहेरील स्त्रीयाही तन्मतेने त्या मंत्रांशी एकरूप झाल्या होत्या.मीही तितकीच तन्मयतेने विभोविश्वनाथाचे ते पवित्र रूद्रं ऐकत ओम् नमः शिवायचा जप करत बसले होते. बऱ्याच प्रतिक्षेनंतर शिवपूजेसाठी आत जाता आलं.गाभारा खूप मोठा नव्हता पण ४ जणी एकत्र पूजा करू शकतील इतका मोठा नक्कीच होता.समोरच पुर्वी कधिही न बघितलेली सुरेख अशी त्रिमुखी ब्रह्मा,विष्णू महेशाची ती पिंड मनाला आकर्षून गेली.तिनही देवता कोरलेली ती पिंड किती वेगळी वाटली मला! पिंडीवर अखंड पडणारी अभिषेकपात्रातील जलधारा!मुखाने नकळत ओम् नमःशिवाय जप!.मन अधिक पवित्र व नकळत गंभिर होत गाभाऱ्यातील पवित्रतेशी एकाकार झालं. सोबत आणलेली फुलं वाहिली. बिल्वदल वाहतांना त्या कोवळ्या हिरव्या बेलाच्या पानाला पिंडीच्या अग्रभागी वहातांना एक बिल्वं शिवार्पणम् म्हणत ओम् नमः शिवायचा जप चालू होता.,शिवामुठीसाठी तांदूळ घेऊन शिवपिंडं अधिकंच तजेलदार झाली.गाईच्या तूपाचा दिवा लावल्यावर शिवशंभू जणू पिंडीतच प्रकटलेत असेच वाटत राहिले.धूपाचा गंधं दरवळला. लवधवती विक्राळा ब्रह्मांडे माळा असं आरतीत म्हणतांना शिवपूजनाला आगळीच परिपूर्णता मिळाली. गाभारा आरत्यांनी भरून गेला. सगळं यथासांग पार पडलं.मन संसारतापातून सहजच दूर झालं होतं. नकळत अलिप्तं झालं होतं. शिवशंभू हा साध्याभोळ्या पुजेनेही प्रसन्न होणारा देव..म्हणून मला अधिक प्रिय. पूजेनंतर सौराष्ट्रे सोमनाथंच हे स्तोत्रं म्हंटल्यावर प्रसन्नता वाटली. पूजा आटोपली तरी गाभाऱ्यातून बाहेर पडावेसे वाटेचना. मन जणू शिवमय झाले होते ही शिवकृपाच होय.
तसा शिव जितका शांत तितकाच कोपी. पण राग आला तरीही लवकर शांत होणारा देव. भक्तांना मात्र त्याचा पूर्ण वरदहस्त! भक्त निर्मळ अंतःकरणाने जे मागेल ते देणारा इतका भक्ताभिमानी देव दुसरा नाही. तशी मी रामरायाची भक्तं म्हणून वैष्णव पण सद्गुरू अनुग्रहीत व रामरायाचे गुरू म्हणजे भगवान शिव म्हणून शैवही! हरीहरांचं ऐक्य पुरातन आहेच व तितकंच ते विलोभनीयही आहे. भक्तांची लाडकी देवता शिव असो की राम अंतिम प्रणाम निर्गुण निराकार परब्रह्मालाच जातो हे त्रिवार सत्य आहे.
श्रावणातली शिवपूजा हा माझ्यास़ारख्या शिवउपासकांसाठी पर्वणीच आहे.तसेच रूद्राचंही या श्रावणात विशेष महत्वं आहे. रूद्र म्हणजे शिवाचे अश्रू. शिव म्हणजे पवित्रता, शुचिता.तसेच ज्ञानमयी मूर्ती. त्याच्या पवित्रं नेत्रातून निघालेले अश्रू म्हणजे रूद्रं. हे रूद्राभिषेकाचे मंत्रं शिवाला शिवालयात जेंव्हा ऐकवले जातात तेंव्हा तो अतिप्रसन्न होतो. जलाभिषेकाने गाभारा पवित्र होतो तसेच तन व मनही पवित्रं होत जाते. शिवालयातील पूजा म्हणजे पूर्णपरब्रह्म शिवाला केलेली भक्तिभावपूर्वक प्रार्थना व ही प्रार्थना ऐकलीच जाते ही माझी अनुभूती आहे..
.
माझी शिवशंभूची नित्यप्रार्थना-
शिवाकांत शंभो शशांकार्ध मौले।
महेशान् शुलिन् जटाजुटधारीन्।
त्वमेको जगद्व्यापको विश्वरूप।
प्रसीद प्रसीद प्रभो पूर्णरूप।।
Comments
Post a Comment