ती आणि चाळीशी


©️®️- सौ. स्वरूपा कुलकर्णी


     हिरव्यागार झाडाची कोवळी पानं पाहिली की आतुन एक सुखद शिरशिरी येते.कारण, हा त्या झाडाचा सृजनोत्सव असतो. नवनविन पानांनी सजलेली झाडाची काया विलक्षण सुंदर दिसते. पोपटी पानांची सळसळ सुखद वाटते.

 एका तरूण पोपटी पानांसारखी 'तीही' सुंदर असते.षोडशवर्षीय, नवयुवती किती सुंदर, मोहक, चंचल भासते नाही?. तिची चाल बदलून जाते. निसर्गाचा हा मनमोहक बदल तिचे आयुष्य व्यापून टाकतो. तीचं बोलणं, दिसणं,हसणं साधं नजरेनं कटाक्ष टाकणंही बदलून जातं. सुंदर होतं. ती मुळातच सुंदर असेल तर मग तरूण वयात तर किती सुंदर असेल हे सांगूच नये.अशातंच लग्नं झालं तर मग काय विचारता, तरूणीचे तन मन नव्या नव्हाळीने ताजे तवाने होते. तीच्या तरूण तुकतुकीत अंगकांतीवर सोनेरी तेज फाकते. हिरवा चुडा, मोगऱ्याचा गजरा, साजश्रृंगार, हिरवी काठपदराची साडी सगळंच नवचैतन्य प्रकटते.ती तिच्या नवऱ्याची लाडकी साजरी नवयौवना किती अल्लड, लाघवी लोभस असते. खरंच, रम्य ते दिवस. मग हळूच त्यांच्या संसारवेलीवर फळ लागते. सुंदर चिल्ल्यापिल्यांनी घर भरून जाते. तिचे व त्याचे जग अधिक सुंदर बनते. हळूहळू ती तरूणी तिशीकडे झुकते. घर जबाबदाऱ्या आल्याने थोडी थोडी मोठी होत जाते. वय जणू समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूसारखं हातातून निसटून जात असतं.. संसाराची वेल बहरत असतांना चोरपावलांनी कधी चाळीशी येते ते कळतंच नाही. तीचा गुडघा नकळत दुखरा होतो. पण वय प्रौढत्वाकडे झुकत असलं तरी मन कुठे प्रौढ असतं, ते तर तरूणच असतं..अगदी तजेलदार, भावविभावांच्या हिंदोळ्यावर हिंदकळणारं.. कधी रूसणारी ती तर कधी हसणारी ती..आता हळूहळू पोक्त होत जाते. नजर थोडीशी अंधूक तर कंबर जाम होते. लग्नातले ब्लाऊज आता येत नसतात. मुलं मोठी होत असतात. ती मात्र जुन्या फोटोतील तिचे लग्नातले तर कधी बालपणीचे फोटो पाहून नकळत आठवणीत हरवून जाते. तिचा लग्नातला शालू आजही तिच्याकडे बघून हसत असतो. ती मात्र आई-बाबांच्या आठवणीत हरवून जाते. चाळीशीच्या या टप्प्यावर आपले आई बाबा तिला आता अजुन चांगले समजू लागतात.कारण, आयुष्यातील खाचखळगे पार करत करत आलेलं शहाणपण तीला समृद्ध करत जातं. ती आता फक्त पोक्तं स्त्री नसते तर नकळत विचारांनी समृद्धं, संकटांशी दोन हात करणारी सुजाण स्त्रीही असते. तिच्यातला हा बदल म्हणजे तिच्यातल्या कोवळ्या पोपटी पानाचे हिरव्यागार पानात बदललेले रूप असते. ती " तीच" तर असते .. फक्तं रूप वेगळे..अधिक सुजाण , अधिक सक्षम, अधिक सुंदर..

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न