सांगायचं राहूनच गेलं...


प्रिय पु.लं.,

         शि.सा. नमस्कार 🙏🏻


      काही माणसं आयुष्यात अगदी जवळून भेटतात, जसे आपले आई, वडील, भाऊ, बहीण तर काही लांबची नाती जी रक्ताची असोत किंवा नसोत पण पुरेशी कळतात तर कधी नाहीही. काही माणसं आयुष्यभर भेटतच नाहीत, पण फक्त भेटतात ती पुस्तकातून! अगदी जिवंत माणसासारखी आपल्याशी मैत्री करतात, बोलतात, हसवतात, चार चांगल्या गोष्टी सांगतात आणि रडवतातही! पु. ल. तुम्ही त्यापैकीच एक! मनापासून आवडलेले व्यक्तीमत्वं.. तुमची घडणच मुळात अजब गजब..विनोदाचा ढगळ वेष अंगी घेऊन आयुष्यभर भेटलेल्या नाना रंगा-ढंगाच्या माणसांवर तुम्ही केलेली टिप्पणी आजही खोखो हसवते. तुमची पुस्तकं हातात घेतली की मी काही काळ ही भोवतालची दुनिया विसरून तुम्ही रंगवलेल्या कोकणात तर कधी मुंबईत , परदेशातही सहज फेरफटका मारते.पुस्तकांच्या पानापानांतुन तुम्ही रंगवलेले जग पहातांना " अरेच्या , किती खरंय हे" म्हणून तासन् तास गुंतून जाते. साहित्य, कला, नाटक, संगित अशा प्रांतातुन तुम्ही यथेच्छ मुशाफिरी केली. तुम्ही सामान्य माणसाची नाडी चांगलीच ओळखली होती. पु.ल. तुम्ही केलेली पदार्थांची वर्णने असोत की बहारदार निसर्गाची वर्णने असोत तुम्हाला या जगात दिसलेल्या गमतीजमती तुमच्या चष्म्यातून पहातांना फार फार भावल्या. तुमच्या भोवती नेहमी असणारा माणसांचा गोतावळा तुम्हाला जितका प्रिय होता तितका क्वचितच माणसांना तसा असेल. जगावर व जगण्यावर भरभरून  प्रेम करणारी माणसे तशी दुर्मिळंच!

     तुमचे शब्दप्रभूत्वं, माणसांची पारख, तुमची खास विनोदी शैली , सुनिताबाईंशी तुमचे नाते, मराठी माणसावर असलेले प्रेम, जगण्यातील खाचाखोचा ओळखूनही साधं तत्वज्ञान मांडणारे तुम्ही, हे केवळ अद्वितीयच! तुम्हाला सापडलेली जगण्याची पायवाट फारच कमी माणसांना गवसली. तुम्ही केलेली मुशाफिरी इतर लाखो माणसांना समृद्धं करून गेली व करत रहातील.

     माणूस हे किती अजब रसायन आहे हे तुमची पुस्तकं वाचली की सहज कळतं. विनोद किती सुरेख व सहज असू शकतो हे केवळ तुम्हीच सांगू शकता. तो विनोद कधीच बोचरा नसतो. असते ते विसंगतीवर ठेवलेले बोट. त्यातुन निर्माण होणारा प्रत्येकाला आतुन गुदगुल्या करणारा विनोद सर्व वयोगटाच्या माणसांना हसवतो. बटाट्याची चाळ,गणगोत, व्यक्ती आणि वल्ली, असामी आसामी, पुरचुंडी, एक शुन्य मी, पुर्वरंग,अपुर्वाई, हसवणूक अशा कितीतरी पुस्तकांतुन तुम्ही मला भेटलात आणि जगाची भूरळ घातलीत. मनाला स्पर्शुन जाणारी तुमची लेखनशैली न भूतो न भविष्यती रसिक वृत्तीमुळेच. तुमचा देह आज आमच्यात नसला तरी तुमची साहित्य संपत्ती आमच्या जगण्यातला महत्वाचा हिस्सा आहे. आजही मन उदास झालं तर पटकन तुमचं पुस्तक घेऊन वाचत रहावं असं वाटतं.फेसबूकवर दिसलेेले तुमचे विनोद वाचून आजही खळखळून हसायला होतं. 

     पु. लं. तुमच्यासारख्या थोर साहित्यिकाला प्रतिभेनेच वरलं होतं आणि म्हणूनच तुम्ही जिथे जाईल तेथे आनंदच वाटला. अतिशय उच्च कोटीची "माणूस" नावाच्या कलाकृतीची तुम्ही ओळखलेली नस खरंच कोड्यात पाडते व थक्कं करते. तुम्ही आम्हा माणसातली विसंगती किती सहज आपल्या लेखनीतुन उतरवलीत. तुमच्यातील माणसाची जाण व साहित्यातील सखोल जाण  यामुळे तुमचे साहित्य संजिवक व अजरामर ठरले. आमच्या थकल्या भागल्या जिवाला नवरसांचा परिपोष करणारी तुमची प्रतिभा केवळ अतुलनीयंच! 

      हे सगळं तुमच्याशी बोलायचं राहूनच गेलं.. तुम्हाला कधितरी भेटले असते तर साष्टांग दंडवत घातले असते. तुम्हाला फोटोतुन मिश्किल हसतांना पाहून नकळत अश्रु पुसते नी तुम्ही जसे समरसून भरभरून जगलात तसेच जगण्याची आस मनी बाळगते. तुम्ही सगळ्या मराठी माणसांचे लाडके आहातंच  आणि चंद्र, सुर्य असेपर्यंत रहाताल हे सांगणे नलगे.

         कळावे, 

                  तुमचीच एक निस्सिम चाहती


स्वरूपा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न