#मातृदिन

Repost

      -सौ.स्वरूपा कुलकर्णी


प्रिय आई, 

      पत्र लिहीण्यास कारण की, तुझा माझा पत्र संवाद होण्याची ही पहिलीच वेळ. लग्न व्हायच्या आधी तुला सोडून रहाण्याचा प्रसंग क्वचितच आला. लग्न झाल्यानंतर मात्र तुझ्या फोनची कायम वाट पाहिली आणि आजही पहाते. लहानपणापासून मला देव धर्म याविषयी कायम सांगणारी तू माझ्या मनात कायमच श्रद्धेचा अखंड नंदादीप आहेस. यासोबतच तुझा प्रेमळ स्वभाव सतत हवाहवासा वाटतो. आजही वाटतं तुझं साधं, सोज्वळ, सुंदर भोळं रूप देवघरात देवाशेजारी ठेवावं व त्या परमेश्वराला म्हणावं तुझ्यापेक्षाही प्रेमळ आणि माझी अहोरात्र काळजी करणारं एक माणूस आहे बरका माझ्या जगात. 

  नेहमी कपाळी मोठ्ठं कुंकू लावणारी, सदा वेणीच घालणारी, गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र घालणारी माझी ईश्वराचेच दुसरं रूप घेऊन आलेली आई, खरच तुझ्या मुलीचे तू वैभव आहेस. कारण स्वतः पलिकडे माझ्यावर प्रेम करणारी तू, तुझ्या सोशिक स्वभावामुळे माझी आदर्श झालीस जणू माझी संपत्ती झालीस. 

  फोनवर बोलतांनाही आधी जावयाची, मुलाबाळांची चौकशी करणारी तू त्यांच्यासाठी नवस सुद्धा करतेस. किती ते तुझे वेडे प्रेम. या जन्मी तरी उतराई नाही होऊ शकत. सदैव संकटात आणि एरवीही देवाचे पाय धरणारी तू आमच्यात कीती संस्कार बीज रोवलेस ते नकळे. तुझी दुखणी आजारपणं पण कायम कुलाचार कुलधर्म न विसरता सांभाळणारी तू खरी संस्कृती रक्षकच आहेस. मनात तूझे विचार आले की कायम वाटत रहात आई देवाने तुला माझी आई का बनवलं असेल तर त्याच प्रेमळ ईश्वराची ओळख करून देण्यासाठीच. तूला प्रतीईश्वरच म्हणावे ईतकी तू माझ्यासाठी केलयेस झिजलियेस. धन्य तूझी ईश्वर निष्ठा नी भैय्या व माझ्यावरील प्रेम. बाबांची सगळ्या सुख दुःखातील सहचारिणी, तुझ्या तिनही नातवंडांची आज्जी, प्रसन्न हसरी, सदा सरळमार्गी विचार करणारी आई तुला नमन करण्याचा आजचा दिवस.. 🙏 आपला ईश्वर म्हणजे आई हे समजून घेण्याचा व त्या मातृ शक्तीला गौरवण्याचा दिवस, तूला साष्टांग नमन आई, (सुखाचं रहा हा तुझा आशिर्वाद जणू प्रतिसादासाठी दिलास परत)

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न