घर
सौ. स्वरूपा कुलकर्णी
गेल्या काही महिन्यांपासून आमच्या फ्लॅटचं रिनोव्हेशन अर्थात नुतनीकरण करण्याचा विचार चालू होता. आम्ही नवरा बायको रोज त्याबाबत चर्चा करायचो. खरं म्हणजे नुतनीकरण करतांना खर्चाचा विचार करत होतोच पण त्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी रहावं लागणार हा विचार तितकाच महत्वाचा वाटत होता. २ वर्षांपुर्वीच मिस्टरांनी त्यांच्या काकाचे जुने घर विकत घेतले तेही अगदी हौस म्हणून. कारण काय तर त्यांची लहानपणची जुनी आठवण होती व घर अगदी स्वस्तात मिळाले म्हणूनही. मग फ्लॅटचे रिनोव्हेशन करायचे तर पूर्ण होईपर्यंत कुठेतरी रहावेच लागणार म्हणून राहात्यातल्या या गावातील घरालाच प्रथम पसंती होती. हे घर म्हणजे ३ मोठ्या खोल्या, पाठिमागे भरपूर मोकळी जागा आणि टुमदार असा जुन्या पद्धतीचा बंगला. लहानपण सोडलं तर नेहमीच फ्लॅटमध्ये आयुष्य गेलेल्या मला हे जरा नविनच व कुतूहलाचं होतं. तसं गावातल्या मैत्रिणी भरपूर आहेतच पण समोर व बाजूला फारशी ओळख नसल्याने जरा वेगळं वाटलं. घराला जुन्या पद्धतीच्या लाकडी, लोखंडी डिजाईनच्या खिडक्या. ह्या घराचेही पुर्वीच रिनोव्हेशन केलेले असल्याने स्वच्छता होतीच. मागचा मोकळा भाग पत्र्यांच्या शेडने व गेट केल्याने छान वाटला. घरातल्या फरशा जुन्या पद्धतीच्या काळसर करड्या रंगाच्या. बैठक मोठी , स्वयंपाकघरही मोठं, देवघरालाही वेगळी जागा, झोपण्याची खोली त्यामानाने लहान. घरातुनच गच्चीवर जायला जीना. ह्या सगळ्या गोष्टींनी घर बनतं हे खरंच पण ते भौतिक वर्णन. खरं घर बनतं ते तिथली सकारात्मक स्पंदनं, वास्तूचे ठिकाण, थोडक्यात तिथे गेलं की कुणालाही बरं वाटणं हे मला फार महत्वाचं वाटतं.
या घराच्या जवळच मुरलीधर मंदिर, श्रीराम मंदिर, दत्त साई मंदिर अशी सुंदर देवळे आहेत. तिथल्या आरतीच्या नादाने संध्याकाळ सुंदर होते. मुरलीधर मंदिरातील मुर्त्या तर केवळ अप्रतिम. जवळच गोशाळा. हे मंदिर माझ्या मैत्रीणींचेच. त्यामुळे मंदिराविषयी वेगळीच आत्मियता वाटते. गाईला गोग्रास देतांना मन प्रसन्नतेने भरून जातं. गाय व वासरू पाहून माझं भावूक मन आतुन समाधानी होतं. तिथली झाडं, फुलं, पानं फार उर्जा देतात. श्रीराम मंदिर थोडं डागडुजीला आलेलं पण मुर्त्या अतिशय सुंदर व मनमोहक. श्री दत्त साई मंदिर तर आम्हा सर्व सख्यांच्या आनंदाचा केंद्रबिंदूच. नेहमीचे ब्राह्मण महिलांचे कार्यक्रम, समितीचा वर्ग, इतरही छोटे मोठे कार्यक्रम इथे अत्यंत भक्तिभावाने साजरे होतात. तसं पाहिलं तर राहात्यात येऊन मला १२ वर्ष झाली पण गावात रहातांना वेगळाच अनुभव घेत आहे. फ्लॅटचं आयुष्य कमालीचं वेगळं व बंगल्यातील आयुष्य नित्य नविन घडामोडींनी भरलेलं.
तसं राहाता हे तालुक्याचं गाव. शिर्डीपासून ५ किलोमीटरवर आणि साईंचा सहवास लाभलेलं गाव म्हणून प्रसिद्ध. मी स्वत्ःला भाग्यवान समजते कारण शिर्डीचे साई व साकुरीचे उपासनी बाबा आम्हाला फार जवळ. नेहमी दर्शन होत रहाते. त्यांच्या कृपेने संसार फुलत गेला हीच भावना राहिली.
नविन घर हळुहळू मनाचा व जगण्याचा ताबा घेत आहे. मनातल्या हिंदोळ्यावर जुन्या घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यात विसावा शोधत रहाते. मनाला भावलेली इथली जुन्या वळणाची अनवट वाट मनाला भावतेय. जगणं समृद्धं करतेय. इथल्या छोट्या छोट्या बदलांना मन आता सहज स्विकारत आहे. जगण्यातील या घर नावाचे रेशमी पदर हळूहळू विणत आहे. नविन अनुभवांच्या धाग्यांनी, हसण्याचा आवाजांनी, मुलींच्या धिंगाण्यानी, जुन्या आठवणींनी, मे महिन्यात कधी न पडणाऱ्या पावसाच्या धोधो बरसण्यानी, मातीच्या वासांनी, गरमीने घामाने चिंब झालेल्या अंगानी. किती नी काय बोलतेय इथली हवा, इथल्या भिंती, खिडक्यांना खिडकी न म्हणता गवाक्ष म्हणावं असं खरंच वाटत रहाते. इथले श्रावण, गौरी गणपती, सण वार , व्रत वैकल्य किती सुंदर साजरे होतील असे मन पंख लावून आत्ताच भविष्याचा वेध घेत रहातेय. मैत्रीणी नुकत्याच घर बघुन गेल्या, घराचं कौतूक करून गेल्या खूप छान वाटलं. वाटलं मैत्रीणींचे असे थवे न् थवे माझ्या घराला सहज लागताहेत हे किती सुखद, आल्हाददायक! नात्यांची श्रीमंती वाढवणारे.
इथलं जगणं खरंच साधंभोळं पण तितकंच आनंददायक. तसेच, अध्यात्माची आवड असणाऱ्या माझ्या मैत्रीणींचे जवळ असणे हे खरे आनंदाचे ईश्वराचेच देणे.जगण्याचा प्रवास अधिक रंजक, सुंदर बनवणारी इथली माणसे व घरच्यांची साथ नविन वास्तू जणू म्हणतेय तथास्तू, तथास्तू, तथास्तू!!
Comments
Post a Comment